*अन्नदाता*
*अन्नदाता*
काळ्या ढेकळात राजा l
स्वप्न हिरवं पेरतो ll
बाप शेतकरी माझा l
रातं दिवस राबतो *llधृll*
किती कष्टतो झिजतो l
घाम शेतात गाळतो ll
घासासाठी रं साऱ्यांच्या l
बाप स्वतःला पिळतो *ll1ll*
रोज उपाशी तापाशी l
जितेपणी चं मरतो ll
रक्त आटवुनी बाप l
शेत शिवारी झुरतो *ll2ll*
नाही तमा संकटांची l
औत नांगर धरतो ll
धुरा जगाच्या पोटाची l
बाप लिलया पेलतो *ll3ll*
उन्हातान्हामंधी काम l
रोज पोळतो पोळतो ll
काळ तरीबी नुसता l
माझ्या बापाला छळतो *ll4ll*
कर्ज काढुनिया बाप l
माळरान फुलवितो ll
तरी कष्टाला रं त्याच्या l
भाव कवडीचा येतो *ll5ll*
अवकाळी नी दुष्काळी l
रोज रोजच पिडतो ll
नाही होत हतबल l
योद्धा होऊन लढतो *ll6ll*
स्थान कुटुंबापेक्षाही l
आधी जगाला तो देतो ll
देश म्हणून बापाला l
अन्नदाता म्हणवतो *ll7ll*
