देश माझा
देश माझा
माझ्या भारताचे
गावू किती गान
हरपते भान
आनंदाने
जाती धर्म पंथ
जरी न्यारे न्यारे
समतेचे वारे
वाहे येथे
मैलावर भाषा
बदलते वेष
तरी माझा देश
एकसंध
रात्री अपरात्री
धावे सारे जन
संकटात कोण
नसे भेद
नात्यातली ओल
शब्दातुनी बोले
अजूनही चाले
गावगाडा
देशासाठी देई
सीमेवर प्राण
वाढविती शान
वीरपुत्र
ग्रंथामध्ये ज्याचे
सर्वश्रेष्ठ स्थान
विश्वामध्ये मान
संविधान
अत्त दीप भव
गौतमाचे सूत्र
कल्याणाचे तंत्र
विश्वव्यापी
देश जसा मोठा
समस्याही तश्या
सोडवाव्या कश्या
सांगे गीता
ओळखुनी काळ
शेती संगे तंत्र
शिकुनिया मंत्र
दिली गती
देश कसा माझा
राहील तो मागे
तुकडोजी सांगे
ग्रामगीता
ढोंगी साधूसंत
उगवले जरी
न्यायालया दारी
समानच
देऊ नका तुम्ही
देशाला दूषण
आपण भूषण
देशाचेच
