ढगांची शाळा
ढगांची शाळा
आकाशाच्या प्रांगणात
भरलीय ढगांची शाळा
काळेपांढरे कापशी ढग
झालेत सारेजण गोळा
दाटली गर्दीही ढगांची
निळ्याशार आकाशात
धवल मेघांची चमकही
उठून दिसली प्रकाशात
कौतुक होऊ लागे त्यांचे
चढलाच त्यांना अहंकार
काळे ढगही बोलले मग
आम्ही सृष्टीचा अलंकार
आम्ही आहोत म्हणूनच
पडतो वसुंधरेवर पाऊस
तुमच्या चकमकीने नाही
भागत या भूमातेची हौस
धक्काबुक्की सुरू होता
फुटले काळे जलांचे ढग
गडगड करत आकाशात
हटले मागे पांढरेवाले मग
मान्य केली चूकही त्यांनी
कळुनी काळ्यांचेच महत्व
आमचा नाहीच उपयोगही
तुम्ही देता सजीवांस सत्व
बनू चला आपण सारेजण
एकमेकांचे जीवलग दोस्त
राहू आकाशाच्या अंगणात
काळेपांढरे मिळुनीच मस्त
समजावले काळ्या मेघांनी
राहूया नभातच मिळून सारे
कुट्ट काळोखात चाचपडता
तुम्हीच प्रकाश देताय ना रे
