दान
दान
शिर्डीच्या देवा दान मागतो असा
आजचा दिवस गेला उद्याचा कसा
श्रद्धा सबुरीचे भान राहू दे मला
तना मध्ये मना मध्ये साई वसला
साई राम , साई श्याम ।। धृ ।।
सुख ज्याला म्हणतात शोधू रे कसा
दुःख येई नशिबाला भोगू रे कसा
दुःखाच्या या गाभाऱ्यात सुख हासु दे
रडणाऱ्या दुःखालाही सुख मिळूदे
सहनशीलतेचे वरदान दे मला
तना मध्ये मना मध्ये साई वसला
साई राम , साई श्याम ।।१।।
भीती हारण्याची देवा मारु रे कसा
मरणाऱ्या मनाला मी तारु रे कसा
कर्तव्याच्या कामा साठी बळ दे मला
झिजणाऱ्या चंदनाचे मन दे मला
मानपान नको देवा ज्ञान दे मला
तना मध्ये मना मध्ये साई वसला
साई राम , साई श्याम ।।२।।
मागच्या जन्माची ही देवा कसली रे करणी
आजच्या या डोळ्या मध्ये आलं रे पाणी
भरकटणाऱ्या या जीवाला जीवदान दे
भोग आपल्या कर्माचे हे त्याला भोगू दे
आसवांना पुसणारे हात दे मला
तना मध्ये मना मध्ये साई वसला
साई राम , साई श्याम ।।३ ।।
मिळवू किती देवा सांग उरणार काय
उरलेल्या आयुष्यात पुरणार काय
घाडीभराचे हे जीने जगू दे मला
साई राम साई श्याम जपू दे मला
गोडी तुझ्या नामाची रे लागली मला
तना मध्ये मना मध्ये साई वसला
साई राम , साई श्याम ।।४।।
।। सद्गुरु साईनाथ महाराज कि जय।।
