चुकले माझे
चुकले माझे
कविता, गझला, लिहिता झालो, चुकले माझे
धुंदी मध्ये पुरता रमलो, चुकले माझे ।।१।।
स्वार्थी सारे नाते गोते, जाणत असता
नात्यांना कुरवाळत बसलो, चुकले माझे ।।२।।
सत्ता मिळता गल्ला भरती, स्वार्थी नेते
झेंडे त्यांचे घेउन फिरलो, चुकले माझे ।।३।।
स्वातंत्र्याची खात्री नसते, कळते सारे
संसारी पुरता गुरफटलो, चुकले माझे ।।४।।
आई बाबांच्या कष्टाने, मोठा झालो
अंती त्यांना विसरुन गेलो, चुकले माझे ।।५।।
भूमातेने भरभरुनी मज, सारे दिधले
'हक्कच माझा' मानत आलो, चुकले माझे ।।६।।
माझ्या साठी सुंदर सृष्टी, वेली, झाडे
स्वार्थाने ती तोडत सुटलो, चुकले माझे ।।७।।
बळ पंखामधि भरल्यावर जे, उडुनी जाती
त्यांच्यासाठी नसता झिजलो, चुकले माझे ।।८।।
'पंडित' म्हणुनी केली माझी, गणना त्यांनी
गर्वाने माझा 'मी' फुगलो, चुकले माझे ।।९।।
