बोन्साय
बोन्साय
लहानपण असतेच मुळी
मऊशार पांढऱ्या लोण्यासारखे
यात आपण भरायचे रंग
संस्कारांचे, शिक्षणाचे
आणि द्यायचा हवा तो आकार,
मग प्रत्येक मुलातून घडते शिल्प
देशाच्या विकासाचे
पण.. हा पण येतो मध्ये
आपल्या आणि मुलांच्या
पाकळ्याच खुडल्या जातात फुलांच्या
टीव्ही ठरवतो जेवण्याच्या वेळा
रिमोटच्या आहारी दिवस सारा
मोबाईल म्हणजे यांचे हक्काचे खेळणे
त्यासाठी धांगडधिंगा आणि धाय मोकलून रडणे
व्हिडिओ गेम्स घुसले घराघरात
चिमणी , कावळे एकटेच अंगणात
क्रीडांगणे , पटांगणे माजली गवताने
मैदानी खेळ कसा खेळावा एकट्याने
लाडू , थालिपीठांची चव नावडती झाली आहे
शेवयांच्या जागी नूडल्सची थाळी सजली आहे
लहानपण नाहीच हो, हे तर मोठेपणाचे बोन्साय आहे
आपलेच प्रतिबिंब येणाऱ्या पिढीत दिसत आहे
मूक झालेले बालपण यांचे ,चला मुक्त करूया
चार भिंती तोडून , प्रवाह वाहता करूया
