श्रावण-आपल्या आतला
श्रावण-आपल्या आतला


भिरभिर गाणे गाते कोणी
सूर पाहता ठाव नसे
अंतरात डोकावून पाहता
मैफिल सारी तिथे दिसे
अवाक् होऊनी पाहता
कोडे उलगडते अलवार
आला आला ऋतुराज
माझा श्रावण सुकुमार
केशरी प्राजक्त सड्यांनी
मग गंधित होते अंगण
हळूच हसते ऊन कोवळे
जणू सोनियाचे शिंपण
शृंगार सजले अवघे जग
नैराश्याचा सुटे विळखा
सोहळ्यांनी भरले मन
सणांचा श्रावण सखा
झिमझिम पाऊस गात्रातला
पापणीत कधी उतरतो
रिमझिम ऊब सर्वांगाला
सार्थकाचे ऊन पेरतो
सुखउन्ही नि दुःखसरी
चराचर अवघा नाहतो
ऊन-पावसाचा लपंडाव
श्रावण लपेटून घेतो