बळ
बळ
सैरभैर झाली पाखरं
कासावीस इवला जीव
कशी वाहूनिया गेली
पाखरांची चिवचिव...!
काड्या काड्यांचं घरटं
आता पडलं पालथं
महापुरासंग गेलं
झालं कसं नजरेआड....!
झुला घरट्यात होता
तान्हुल्या त्या जिवाचा
महापुरात विरला
आकांत काळजाचा.....!
निपचित देह सारा
पाऊस घेऊनिया गेला
भारी रंगात येऊन
नाच दावूनिया गेला....!
टाहो फोडीयला कुणी
कोणी फोडीला हंबरडा
नाही ओलांडीला कुणी
माणूसकीचा हो उंबरठा....!
हिरवं सपानं सपानं
पूरात वाहूनिया गेलं
खोबऱ्यावानी पाखरांचं
कसं सरणं सजलं....!
कोसळ आता पुन्हा
तुझी बघू दे रे रग
उमेदीनं उडू पुन्हा
पंखात आहे अजून बळं...!
उमेदीने उडू पुन्हा
पंखात आहे अजून बळ..