बीजदान
बीजदान
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
भरकटलेल्या शीडाला,
वाऱ्याचे ती भान देते..
वादळाला हसत हसत,
झुंजायचे आव्हान देते..
बेभानल्या हिरण्यमनास
मोकळंसं एक रान देते..
घरट्यामधल्या पक्ष्याला
ती भलंमोठं अस्मान देते..
धरणीसाठी आषाढाला,
सरींचे ती बाण देते..
अन श्रावणाला नभामध्ये,
सप्तरंगी कमान देते..
डोळ्यांतल्या आसवांना
ओंजळीचं पान देते..
कोंदटलेल्या स्वप्नांना
दरवळतं लोबान देते..
मरणाऱ्याला हसत हसत,
जगण्याचे वरदान देते..
तिच्या नकळत जगाला ती,
हास्याचे बीजदान देते..