भूक...!
भूक...!
थपथप भाकरीचा
आवाज कानी आला
अन् सताड उघड्या झोपडीच्या दारातून *तो*
हैवान आत आला....!
आत्ताच कुठे तव्यावर
भाजून निघालेली *ती* भाकरी
तुटक्या टोपलीत सावरली होती,अन तेवढ्यात...
त्या हैवानानं ती भाकरी
बाहूपाशात आवळली
अन तो नराधम तुटून पडला
त्या भाकरीवर अधाशासारखा....!
लचके तोडत होता तो
त्या मऊशार भाकरीचे अन
कुस्करत होता दोन्ही हातांनी
जीव तीचा...!
लाळ घोटणार्या *त्या* हैवानाला *ती* भाकरी
अजूनच गोड लागत होती
तसा तो पेटून उठला त्या
मायेनं केलेल्या भाकरीवर....!
चिंधड्या चिंधड्या झाल्या त्या निष्पाप भाकरीच्या
ढासळत होत्या भिंती त्या
निरागस झोपडीच्या...!
हव्यास मिटला भूक क्षमली
अन तो हसत हसत बाहेर पडला
खरकट्या तुकड्यांवर
पुन्हा एकदा कुणाचातरी
पाय पडला....!
पुन्हा एखाद्या भाकरीच्या वासनेनं
गिधाडं घिरट्या घालू लागली
मायेची भाकरी तव्यात कुठंतरी पुन्हा फुगू लागली....!