भावभोळे भक्त
भावभोळे भक्त
आम्ही वारकरी । भजनात दंग
टाळ नि मृदुंग । निनादती (1)
चालता चालता । गजर नामाचा
विठ्ठल रायाचा । अखंडित (2)
आम्ही सारे भक्त । नसे भेदभाव
खरा भक्तिभाव । अंतरात (3)
नसतो थकवा । भेटीलागी आस
विठ्ठल आम्हांस । पाठीराखा (4)
भावभोळे भक्त । दर्शना लोटती
तृप्तही करिती । भोजनाने (5)
अश्वाचे रिंगण । तृप्त तन मन
भक्ती महिमान । विठ्ठलाचे (6)
येता पंढरीत । सार्थक वारीचे
विठ्ठल भेटीचे । समाधान (7)
