भाकरी
भाकरी
माय बाप राबतात
उन्हा तान्हात शेतात
तेव्हा भाकरीचा चंद्र
मला मिळतो हातात.
रोज बसतो चटका
माझ्या मायच्या हाताला.
भाकरीचे दोन घास
आम्हा मिळती पोटाला
माय पोटच्या गोळ्याला
जाई सोडून कामाला.
तिचा जीव खालीवर
गोळा उठतो पोटाला.
तारेवर कसरत
रोज शोध भाकरीचा.
पोटासाठी नशिबात
येई भोग चाकरीचा.
भीक मागतो भिकारी
मनी भाकरीची आस.
कुणी करतो चाकरी
होतो भाकरीचा दास.
होऊ भाकरी आपण
अनाथांची गरीबाची.
देऊ घासातला घास
ठेवू जाण श्रमिकाची.
नको पुरण वरण
मिळो भाकरी सुखात.
नको पाप भ्रष्टाचार
नाव कमवू जगात.
