अविस्मरणीय भेट
अविस्मरणीय भेट
आठवते का तुला साजणी, भेट आपल्या दोघाची
सुवर्ण क्षण ते आनंदाचे, ठेव सुखी आयुष्याची ।।धृ।।
सळसळते तारुण्य तुझे, सौंदर्याची खाण सखे
बघणारा घायाळ होतसे, जाऊ पाहे प्राण सखे
क्रीडेत आपुल्या मग्न अशी, तुला न पर्वा विश्वाची।।१।।
आम्र तरूच्या तळी शोधला, निर्मनुष्यसा *एकांत*
काव्य शारदा प्रसन्न व्हावी, साधनेत मी निवांत
दृष्टी भेट होताच भंगली, तपस्या विश्वमित्राची।।२।।
तू माझ्या, मी तुझ्याच नयनी, काय पाहिले ना ठावे
काळ, वेळ, स्थळ विसरोनी, वाटे आलिंगन द्यावे
प्रेम रसाने चिंब होउनी, तृप्ती साधावी जीवाची ।।३।।
अवखळ वाऱ्या सवे तुझ्या, हालचाल पदराची
अनावृत ती छाती पाहून, घालमेल हृदयाची
नसे वेगळी तुझी अवस्था, किमया ही तारुण्याची ।।४।।
खळखळत्या सरिता तटी, अनोखा संगम झाला
सोहळा मिलनाचा आगळा, रम्य, विहंगम झाला
*एकांत* वाटे हवा हवासा, ओढ अवीट प्रेमाची ।।५।।