अंतर्मनात माझ्या
अंतर्मनात माझ्या
अंतर्मनात माझ्या, एक कस्तुरीची पेटी
उघडायची ही किमया, करी लेखणीच मोठी
ते सूर्यदेव म्हणती, तिन्हीसांज होत आहे,
मी काळजीत माझे, हे कार्य कोण पाहे
जळते अखंड पणती, खरी हीच ती कसोटी
अंतर्मनात माझ्या, एक कस्तुरीची पेटी
अंधार नाही उगमी, अस्तित्व ना तयाचे
नसतो प्रकाश तेव्हा, तो दावी रूप त्याचे
असतो प्रकाश नेहमी, ही बात नाही खोटी
अंतर्मनात माझ्या, एक कस्तुरीची पेटी
जगी मुखवटेच सारे, चेहरे न हे खरे
मन कोण जाणू पाहे, कसले भले बुरे
त्यालाच जाणण्याची, ही वेगळी सचोटी
अंतर्मनात माझ्या, एक कस्तुरीची पेटी
हा स्नेह अंतरात, दावी, रूप मानवाचे
जो द्वेष पाळी त्यात, करी काम दानवाचे
तो दूर लोटण्याची, ही साधूया हातोटी
अंतर्मनात माझ्या, एक कस्तुरीची पेटी
स्थिरता मनास त्याची, कीर्ती दिगंत आहे
चिरकाल सत्य टिकते, खोट्यास अंत आहे
आधार जीवनाचा, हे सत्यगीत ओठी
अंतर्मनात माझ्या, एक कस्तुरीची पेटी.
