आठवणींचा पाऊस
आठवणींचा पाऊस
दूर निघून जाण्यापूर्वी
एकदाच फक्त एवढं कर
अंगणात माझ्या घेऊन ये
श्रावणधारेची एक सर
तुझ्या सरींनी पुन्हा एकदा
भिजून जाऊ दे अंगण
तुझ्या पूरानं पुन्हा एकदा
वाहू दे कुंपण
पसरून माझे हात पुन्हा
झेलीन त्या गारा
श्वासामध्ये भरून घेईन
सळसळणारा वारा
जेव्हा जेव्हा आठवेल
तुझी दुरावलेली सर
आठवणींचा पाऊस येईल
भिजवून जाईल घर

