आठवणींचा पाऊस..
आठवणींचा पाऊस..
तुझीच आठवण येते
प्रत्येक क्षणी जगतांना..!
कशा वर्णू त्या आठवणी
प्रेमकाव्य लिहतांना..!!
आठवण तुझी येता उठे
तनी मनी रोमांच गोजिरा..!
हृदयरुपी मातीच्या श्वासात
गंध स्मृतींचा गहिरा..!!
आठवणींची सर येते
रिमझिम करत पावसाची..!
अंग अंग मोहरते वीज
चमकुनी मनी प्रितीची..!!
स्थिती आहे चातकासम
ओढ त्यास पावसाची..!
तद्वत मनास माझ्या
ओढ तुझ्या भेटीची..!!
तुझ्या आठवणींचा पाऊस
येतो प्रेमसरी घेऊन..!
मन होते ओलेचिंब
जातो मी पूर्ण भिजून..!!
आठवणींच्या सरी मिळतात
मनातील झाडवेलींना जाऊन..!
कल्पनांची जाई - जुई बहरते
दव प्रेमाचे पिऊन..!!
गंध प्रेमाचा मिसळतो
शरिररुपी मातीत जाऊन..!
प्रितीच्या सुवासाने जातो
जीवनरुपी आसमंत मोहरुन..!!
सप्तरंगी इंद्रधनू आले
जीवनाच्या आभाळात..!
रंग प्रितीचे घेऊन तुझ्या
आठवणींच्या पावसात..!!
गंध प्रीतीचा वेडावतो
माझ्या वेड्या मनाला..!
तुझ्या आठवणींचा पाऊस
हळुवार स्पर्शितो काळजाला..!!
