आता जगायचं
आता जगायचं


नऊ मास प्रसव कळा सोसून
मातेच्या उदरात जन्मलास तू
अपयश, प्रेमभंगाच्या दु:खाने
आत्महत्येचा अविचार केलास तू।।
भरकटलेल्या या मनाला सावरून
बळ एकवटून जगायचं आहे
परिस्थिती कितीही बिकट असेल
तुला निर्भयपणे लढायचं आहे।।
तुझ्या हुंदक्यातले मौन आता
आप्त, स्वकीय, मित्रांना सांगून टाक
एक आशेचा किरण नक्कीच दिसेल
दे हृदयातून त्यांना आर्त हाक।।
आभाळ जरी कोसळले तरी
त्यावर घट्ट पाय रोवून उभा राहा
ठणकावून सांग त्या संकटांना
निधड्या छातीने वार झेलत राहा।।
अंधुकशा
प्रकाशातून वाट काढत
यशोशिखरावर चढण्या मार्गस्थ हो
धमन्यातून वाहू दे दृढ आत्मविश्वास
एकदा शिवरायांचा मावळा हो।।
इतिहासाची पाने वाचताना
वीर रणरागिणी, संभाजींचे धैर्य
सावरकरांची शिक्षा, त्याग, संयम
आठव साऱ्यांची गाथा आणि शौर्य
जरी येई मनात आत्महत्या विचार
नकारात्मकतेला देऊ नको थारा
घोंघावणाऱ्या वादळातही नाविकाला
हिंमतीने गवसतो सुरक्षित किनारा।।
मुंगीकडून शिकावे धडपडत जगणे
क्षणिक आयुष्य तरी हार न मानने
जीवनातील मधुर कण वेचित जाणे
दु:ख न बाळगता, जीवनी समाधानी असणे।।