पाऊस मनातला
पाऊस मनातला


कुंदावल्या आकाशात
रवी झाकोळून गेला
वारा थैमान घालतो
सरी मृगाच्या ग आल्या ।।
जलधारा बरसती
मेघनाद कडाडतो
काळ्यानिळ्या नभातुन
इंद्रधनु डोकावतो ।।
पशुपक्षी बागडती
मन मोर हा नाचतो
शीळ घुमे वाऱ्यासह
मिलनाचे गीत गातो ।।
बांधावर बळीराजा
साद घाले सजनीला
दाना दाना पेरते व्हा
मोती पिके कणसाला ।।
घन ओथंबून येई
गारा टपोऱ्या घेऊन
भिजलेल्या अंगणात
मन पागोळी होऊन ।।
पाऊस हा मनातला
उधळीत बरसला
कोरोनाच्या सावटात
दु:ख घेऊनिया गेला ।।