आला आला पाऊस
आला आला पाऊस
आला आला पाऊस
सर सर बरसती धारा
चिंब चिंब भिजले मी
पडती टपोऱ्या गारा
खेळू नाचू पावसात
वेचू हातात पागोळ्या
टाकू पटकन तोंडात
येतीय वात्रट टोळ्या
आकाशात वीजांचा
कडकडाट ऐकू आला
सप्तरंगी इंद्रधनूची चढे
नभी मंडपी ही माला
टिप टिप संगीताचेही
सुरू झालेय लय ताल
मेघानेही पांघरली घट्ट
काळी अभ्राची शाल
डराव डराव बेडकांचा
नादही कानावर आला
ढगांचाही अधून मधूनी
गडगडाट सुरूच झाला
थुईथूई नाचतच मोराचा
फुलला सप्तरंगी पिसारा
हरपलेय पाहुनी भानही
उन्हाचा गेला शीण सारा
शिंपण जलसरींचे होताच
ताप उष्म्याचाही निमाला
हरखली पशु नि पाखरेही
<p>किलबिलाट त्यांचा झाला
लहान थोर अन् बालकेही
नाचू लागली या पावसात
निसर्ग होऊन आत्मविभोर
थांबवेनाच सुखद बरसात
बळीराजाच्या भाळावरचा
धन्य झाला घामाचा मोती
निढळावरच्या त्या घामाने
भरतोय तो सुखाची पोती
स्वप्ने उराची रंगवुन मनात
नांगर हातात त्याने धरला
ढेकळे मातीची फोडूनीच
जाईल आनंदात तो घरला
सुखाच्या अशा आनंदाला
नकोच ग्रहण अवकाळीचे
कष्ट करणाऱ्या जिवालाच
पाहू दे सुख नव्याकाळीचे
फुलावे बळीराजाचे सारेच
हिरवेगार असे हे शेत रान
फळ कष्टाचे मिळून त्यास
करील मग मोत्याचेच दान
पोशिंदा साऱ्या जगाचा तो
करील साजरे सोहळे सण
आनंदाने जाई भान हरपून
उपभोगावे सुखाचेच क्षण