आई
आई
धन्य धन्य मी झालो
उदरी तुझ्या जन्मलो
पाडलेस पैलू या हिऱ्याला
नतमस्तक मी सदा राहिलो !!१!!
किती वर्णू मी तुला
शब्द अपुरे पडले
किती आठवू त्या क्षणांस
जीवन माझे जे घडले !!२!!
तूच जननी आई
अन् तूच इंदिरा माई
आसू टिपण्या दुःखितांचे
तू सदाच धावून जाई !!३!!
तांबडं फुटताच आई
दिवस तुझा सुरू होई
झिजवलीस काया तुझी
घेऊन सारा भार डोई !!४!!
कणखर बाणा तुझा ग आई
सदा आठवण देत राही
तुझा पदर माझ्या डोई
नयन आता भरून वाही !!५!!
वाढवला अन् घडवला ही
पुत्र तुझा ग कणखर केला
कर जोडुनी माते मी
वंदन करतो तुला !!६!!
