कचऱ्यात स्वप्न वेचणारा बाप
कचऱ्यात स्वप्न वेचणारा बाप
स्वच्छता कर्मचारी सफाई कामगार चतुर्थ श्रेणी बिगारी रोजंदारी गडी.ही सर्व नावे एकाच मानसाची माणसं जात धर्म निरनिराळे असतीलही चेहेरा मात्र सार्याचा एकच सफाई कामगार.असा माणूस जो सार्यानी नाकारलेल्या घाणीत ऊतरतो चौकाचौकातल्या कचराकुंडया व गटारे नाले ड्रेनेज साफ करतो बरेचदा चेंबर मध्ये गळ्यापर्यंत उतरतो क्वचित प्रसंगी अनावधानाने शोक लागुन वा विषारी वायुमुळे गुदमरून मृत पावतो असा सफाई कामगारांचा प्रवास लिहीण्याचे कारण मी अगदी जवळुन अनुभवलेल जीवन.नव्वदचा काळ वडील महानगर पालिकेत रोजंदारी बिगारी म्हणून कामावर रूजू झाले.ते तर एक चेहेरा होते माझ्यासमोर त्या हजारो कामगारांचा. सहा वाजता घर सोडायचे. महापालिकेच्या आरोग्य कोठीवर हजर द्यायची मग एका गाडीवर सात जण याप्रमाणे जमवाजमव नाव, नोंदणी, सही, अंगठा कोणत्या भागात कोणी जायचे कीती कचरापेटयांचा केर डोकयावर वहायचा याची यादी वगैरे सोपस्कार मुकादमाकडून व्हायचं नी सुरू व्हायचा प्रवास !कचरयातला प्रवास! संपूर्ण शहरातील चौकाचौकात गल्ली गल्लीत व पेठेपेठेतील नको असलेली घाण डोक्यावर वाहून नेण्याचा कचरयातला प्रवास !त्या कचरयाचा घाणीचा चेहेराही या सफाई कर्मचाऱ्यां प्रमाणेच सर्व धर्म जाती वर्ण, बंगल्यातुन,झोडपटटीतुन, चाळीतून, बाहेर पडलेला असो वा अगदी हाय प्रोफाईल उच्च सोसायटीतून वा वन आर के वाल्यांची घर लख्ख स्वच्छ चकमकीत करून आलेला असो कचरा कुंडीत आल्यावर त्याचा प्रकार व नाव चेहेराही एकच!!माझ्या वडीलांच्या म्हणजे आमच्या अप्पाच्या चेहेरयामागे मला त्या हजारो कामगारांची व्यथा अगदी जवळून अनुभवता आली. कधी कधी शाळेतून येताना वा जाताना पेठेतल्या एखाद्या कुंडीवर माझा बाप फावडयाने कचरा ओडून घमेल्यात भरून डोकयावरचे घमेले डंपर मध्ये मोकळा करताना दिसायचा एक... दोन.. तीन ...कीती घमेली ?कीती कचराकुंडया किती खेपा एका गाडीवर सात बीगारी सात खेपा.कचरयाने शिगोशिग भरलेल्या डंपरवर बसुन मग शहराच्या गल्लीबोळातील कचरा दूर दूसरया टोकाला असलेल्या ऊरूळी कांचनच्या मोठ्या कचरा डेपोवर नेऊन रीकामा करायचा.रोज तीच घाण पाहून नजर मेलेली वासाने याचे डोके गरगरत कसे नाही? कचरा पेटी जवळून चालले तरी नाक गच्च धरणारे तोंड वाकडे तिकडे वा शी कीती घाण ! असे नकळत निघणारे स्वच्छ ?लोकांचे उद्गार ऐकुन बाप व त्याचे साथीदार केविलवाणे हसतं! आम्हीही या समाजतील घटक आहोत माणसं आहोत हे विसरूनच जात असावी ही सफाई कामगारांची जमातच वेगळी. दुपारी अप्पा घरी येत कधी दोन कधी तीन वाजतं कधी घरात हातपात धुवून तर कधी आल्या आल्या दारातच अंघोळीचा पालिकेकडून मिळालेला लाल साबण व टॉवेल मागुन घेत.मग समाजायचे आज नक्कीच मेलेल डुक्कर वा, एखादे फुगुन टम्म झालेले कुत्रा ओढला असावा कींवा मग तुंबलेल्या ड्रेनेजचा मैला फावडयाने ओडून घमेल्यात भरून डोक्यावरून गाडीत भरून त्याच गाडीत त्याच घाण वासाच्या सानिध्यात पंधरावीस किलोमीटरच्या ऊरूळी डेपोमध्ये गाडी रीकामी करून आलाय आज बाप.त्यादिवशी जेवण नाही. नाकात डोकयात मनात डोळयात तीच घाण भरून राहीलेली अन्नाला व भूकेला जागाच नाही पोटात.मग काय दोन घोट.......?काकू आमची आईची बडबड सुरू सोडून द्या काम पहीलचं काम करा या पोराचा म्हणजे,माझ्या पाठचा भाऊ "मिलींद 'यांचा अपघात झाला ती एक वेगळीच कहाणी थोडक्यात, तर झालं असे आमच्या विभागात नगरसेवक पदासाठी निवडणूकीत उभ्या असलेल्या, ऊमेदवार श्रीमती वंदना ताई चव्हाण यांची गाडी प्रचारासाठी वस्तीत रोज येत असे.मग वस्तीतील समाज मंदीरासमोरील मोकळ्या जागेत गाडी लावून त्या घरोघरी पायी प्रचार करीत जिथ गाडी लावली तीथे मोकळे मैदान व पूर्वी गाड्यांची वर्दळ ही नसायची.आम्ही सर्व मुले तीथे खेळत असू .मिलिंद अगदी पचारपाच वर्षाचा असेल गाडीच्या मागच्या अडोशाला गोटयांचा खेळ मांडला चालकाने पुढुन गाडी वळवताना मागे पाहीलेच नाही. ती सरळ पोराच्या पायावर. झालं हाड मोडलं उजव्या पायाचे सहाजिकच निवडणूकचा मामला बांईनी सर्व खर्च केला महिनाभरात दवाखान्यातून मग घरीही भेट वगैरे.... वगैरे निवडणूकी च्या धावपळीतही निवांत भेटायला बोलावून काहीही मदत करण्याचे आश्वासन पाळले ते वडीलांना महानगरपालिकेत कामाला लावून दिलेला शब्द पाळला.पण अर्धवट रोजंदारी बिगारी म्हणून.आताच्याहुन परीस्थिती व नियम वेगळे एका गाडीवर सात मानसे हवीत मगच एक गट तयार करून तुमच्या नवऱ्याला रूजु करता येईल. झाले,समाजसेवा रकतात मुरलेल्या आमच्या आईने नात्यागोत्यातले शेजारपाजारचे सहाजणांना पटवून, पटवून आता जरी रोजंदारी व घाण काम असेल तरी पुढे काहीच दिवसांनी कायम करून घेतील, व भविष्यात तुमचेच भले होईल.असे सांगून सहा लोक जमविले व अप्पा व त्यांची कागदपत्रे व संबधित विभागाचे अटी व नियम पुर्ण करून अप्पांसहीत सहा माणसे रोजगाराला लावली अगोदर घाण काम आहे.!कधी कायम होणार ?इतक्या पहाटे जायचं?पगार कीती कमी आहे?या करबुरी काकूजवळच असायच्या.अरे आता त्रास आहे पुढे जाऊन तुमचे दिवस पालटतील सरकारी नोकरी आहे. दम धरा हे तिचीही ऊत्तरे ठरलेली असायची. आणि फक्त माझे वडील सोडून बाकीच्या सर्वाच्या बाबतीत काकूचे म्हणने खरेही झाले.पूर्वीपेक्षा कैकपटीने सुलभ काम, पगारवाढ, कायम नोकरीचे सौख्य हे लोक भोगत आहेत.तर असा हा माझ्या बापाचा रोजंदारी बिगारी म्हणून पुणे महानगर पालिकेत रुजुन होण्याचा प्रवास.काकू म्हणायची जाऊ द्या कायम होईल तेव्हा होईल पण तूम्हाला पेल्याशिवाय काम होत नसेल तर सोडून द्या. एकशे तीस रूपये दिवसाची हाजरी,पगार वेळेवर नाही कधी दोन महीने तर कधी तीन महीन्याने त्यात अधून मधून वर खर्चाला सावकाराकडून घेतलेले पैसे, घ्यायला अप्पा काकूच्या अगोदर सावकार टिळक क्षेत्रीय कार्यालयाच्या गेटवर हजर.समस्त शहराच्या कचरापेटयांवर सांडलेल्या माझ्या बापाच्या घामाचे रूपांतर खिडकीतून आलेल्या पगार पावती व नोटां मध्ये व्हायचे. मग पुढचा गळतीचा प्रवास सावकाराच्या हातातून सुरू व्हायचा पुढचे तीन चार कधी आठवडा सुद्धा कचरा फेकणारे समस्त शहरवासीय,कायम न करणारे आधिकारी ,पैसे खाणारा मुकादम, पैसे हवे तेव्हा विस पंचवीस टकके दराने शंभरापासून हजारो रूपये कर्जावू देणारा सावकार व घाण काम करावे लागते म्हणून, धडपड करून खेटे घालून कामाला लावणारी माझी आई अशा सर्वांवर शिव्यांची लाखोली वाहिली जायची उद्धारच म्हणा की!म्हणूनच काकू म्हणायची सोडा का मगं काम हे आपलं पूर्वीच म्हणजे सदाशिव पेठेतील गीते अॅड सनस ,या लाकडाच्या वाखारीमध्ये लाकूड कापणे,नक्षीकाम व विविध वस्तू बणविणे ही कला अवगत असलेले अप्पाचं पुढे म्हणू लागले, अग!परमनंट चा नंबर आलाय माझा. फायलीत नाव गेलेय!फाईल पुढे गेलीय !थोडेच दिवसात कायमचा नंबर आला तर आपल्या पोरापैकी एकाला तरी नोकरी लागेल.पेन्शन, महिन्याला पगार, वर्षाला पगारवाढ, महागाई भत्ता, पेन्शन, दिवाळी बोनस अशा कीतीतरी स्वप्नात रमुन जायचा बाप.तीच रात्रीची स्वप्न आज दुपारपर्यंत केलेलं घाण काम हातानेच उचललेला कचरा भरून डोक्यावरून वाहीलेली मोठाली घमेली ऐकादया गळक्या घमेलयातून अंगावर सांडलेल पावसाळ्यात कचरयात साठून राहीलेल कुबट वास येणार घाणं पाणी लहान मुलांचे शी शुचे ईतकेच काय बायांचे पाळीचे पॅड देखील असायचे माझ्या बापाच्या डोक्यावरच्या त्या घमेल्यात.पण बाप आजच्या घाणीत उद्याच्या स्वप्नाचे इमले रचायचा. लेकराबाळांचे मजबुत भविष्य त्यांचे सुख कचरयात शोधायचा बाप!रोजंदारी बिगारी पुढे पुढे रीतसर महापालिकेची पगारपावती घेऊ लागला दिवाळीत थोडाफार बोनसही पदरी पडू लागला. आता अशा हुद्द्यावर आला की कायम झाला नाही अजुन मात्र काढू शकणार नव्हतं कोणिही बाप कामगार युनियची पावती न चूकता फाडू लागला कधी कुठे लवकर कायम करायच्या अंदोलनाला जाऊ लागला कधी कधी बिल्डींग वर म्हणजे महानगर पालिकेची मुख्य इमारतीत सायबापुढ हजेरी देऊ लागला.कधी त्याला नेमुन दिलेल्या अरोग्य कोटीवर कायम करण्याबाबतच्या अहवाला संदर्भात मिटींगमध्ये बसू लागला असे करता करता चौदा वर्ष कचरयातलं जगणं जगला मात्र तेव्हाही कायम झालाच नाही बाप. बाप कायम ,कायम होण्यापासून दूरच राहीला कधी आंदोलने कधी मोर्चे कधी साहेबाची बदली कधी आयुक्तांची बदली कधी फायलीत त्रुटी कधी कागदपत्रांवर आक्षेप कधी म्हणण्याचे अपुरे भरलेले दिवस तर कधी खराब रेकॉर्ड म्हणजे घेतलेल्या सुटयांचे खरेखुरे कारण घरातील अडचणीचे आजापणाचे.या सार्यात गोलात बापाची पर्मनंट ची ऑर्डर गोल गोल फिरत राहीली आयुष्यभर फिरली.काकू !आमची आई गेली. त्या दिवसापासून पुढची आठ महीने अखंड दारू मध्ये डुंबुन का ?गेलीस मला सोडून म्हणून आईला दररोज शिव्या घालत राहीला नी आठच महीन्यात तिला भेटायला आम्हाला सोडून गेला बाप.इथल्या जगणयासंह कचरयातलं जगणंही सोडून मुलांचे भविष्य उज्वल करण्याचा ध्यास व नोकरीत कायम होण्याची आसं मनातच ठेऊन चौदा वर्ष डोक्यावर संपूर्ण समाजाची जैविक घाण वाहून शहरातील गल्ली बोळातील पेठेतील कचरा स्वच्छ करत राहीला बाप शेवटी कायमचा मातीत मिसळून गेला बाप.बाप अचानक गेला वयाच्या सत्तेचाळीस व्या वयात गेला ना कसला मोठा आजार ना शेवटी जाता जाता रूपयाचे औषध देण्याची वेळ आणली आयुष्यातला पहीला हार्ट अॅटॅक शेवटचा काही क्षणाचा खेळ काही सेकंदाचा काळ काळाने एक संधी तरी द्यायला हवी होती....कदाचित?मात्र जर तर च्या गोष्टीच त्या वास्तवात आईच्या गेली त्या क्षणाने धरती फाटली आठ महीन्याने बापाच्या जाणयाने आभाळही तुटुन गेले.जाताना भल्यामोठ्या रोजदारी बिगारी कर्मचाऱ्याच्या पगार पावत्यांचा गठ्ठा, महानगर पालिकेचे ओळखपत्र, कामगार युनियनचे वर्गणीच्या पावत्या आणि कित्येक वर्ष आमच्या मनात नोकरीत कायम झाल्यावर काय करणार याची रंगवलेली स्वप्न ठेऊन गेला. आणि कचरयात घाणीत वेचलेली त्याची स्वप्न आशा अपेक्षा सुखाच्या कल्पना कायम होण्याची ईच्छा कायमची सोबत घेऊन आम्हाला कायमचे पोरके करून गेला बाप!
