भाषा प्रीतीची
भाषा प्रीतीची
ती गाडी सुटता सुटता
मी हळवा हळवा होतो
ते गूज कसे सांगावे
या घोळामध्ये अडतो
तो हात तुझा गे गोरा
पाहून मला की हलला
नि झटकन पुसता डोळे
तो रूमाल ओला झाला
ते वदन पाहूनी रडवे
मज दाटूनी आले भारी
वाटले तत्क्षणी द्यावी
झोकून भावना सारी
मी घसा जरा खाकरूनी
हाक मारली तुजला
पण....शब्दांस फुटे ना कंठ
कढ नुसता येई आकंठ
मज ठाऊक होते बाई
प्रेमाला भाषा नसते
मी हळवा बावरलेला
मग तुला कां न ते कळते?
मी खिडकी सोडून देता
झटक्यात सुटली की गाडी
ते कुंतल काळे कुरळे
आतां.....पुन्हा न दिसणे काही
सावरून थोडे बघता
हा भास मला कां होई
दारातून गाडीच्या
ती चुंबन फेकीत जाई