काळी आई सुखावली...
काळी आई सुखावली...
झळा उन्हाच्या झेलून
वसुंधरा भेगाळली
येता ग्रिष्माचा हा ऋतू
भूमी तापे झळाळली
येई वाऱ्याची झुळूक
आस मृगाची लागली
लेण चांदण्याचं सई
सुवासिनी ही ल्यायली
येतसे पर्जन्य राज
कवेत ती विसावली
बीज वाढता उदरी
काळी आई सुखावली
उन्ह पावसाचा खेळ
रोपं कुशीत वाढली
वाढ होई मासांसवे
मुलं गगना भिडली
