श्वास अडके झोळीत..!
श्वास अडके झोळीत..!
बाळ सावलीत रडे
माय राबते उन्हात
कासावीस जीव होई
भूक वाढते पोटात
हाती असताना काम
श्वास अडके झोळीत
पान्हा ओथंबून वाही
कधी घेईन कुशीत
उसवतो टाका टाका
टाहो पडता कानात
थेंब थेंब जाळताना
असे लेकरू डोळ्यात
सांज येता डोईवर
अन्न ठेवी टोपलीत
घेई लेकरा पोटाशी
झोपी जाई झोपडीत
