एक पुस्तक...
एक पुस्तक...
मनची स्पंदने मनपटलावर कोरून,
स्व मस्तकापुढे नतमस्तक
श्र्वासाश्र्वासात अक्षर गुंफणारा,
प्रत्येक जीव एक पुस्तक
लोचनी लेखणी अंतःकरणाची,
पापण्यांच्या तोरणा आड दडलेली
हलकेच उघडता ते मुखपृष्ठ,
सुस्पष्ट दाविती एक कथा घडलेली
शब्दांविन शब्द वदती,
चेहऱ्यावरच्या रूपरेषा
किती किती कथती कहाण्या,
देहावरच्या या वेशभूषा
आशय पालटते प्रत्येक गती,
जसे नमत्या करांच्या हालचाली
अबोल वाचा वाचून जाती,
जीवनपथाच्या वाटचाली
जड हलक्या पावलांची,
लहरत्या केशांच्या झोक्याची
एक सूरमयी लिपी निराळी,
हृदयाच्या एकेक ठोक्याची
रोमरोमीचे अवचित शहारे,
वा कायेस बिलगती आभा
एक अप्रकाशित पुस्तक हे,
अंतर्मनाचा अदृश्य गाभा
