टेबलाखालून
टेबलाखालून
टेबलाखालून हा शब्द जवळ जवळ आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. आणि जरी ही नसेल परिचयाचा तरी काही हरकत नाही आज मी त्यावरच लिखाण करत आहे. ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना आयुष्य जगण्यासाठी आई-वडिलांच्या किंवा वडीलधाऱ्यांचा आधाराची गरज असते त्याच प्रमाणे आधार कार्ड ही काळाची गरज झाली आहे. कारण आजकाल आधार कार्ड शिवाय कोणताच व्यवहार आपल्याला करता येत नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, रहिवासी दाखला, नॅशनॅलिटी दाखला, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे आणि यासारखे असंख्य दाखले, गाव नमुना, सात बारा हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाले आहेत. त्यासाठी आपल्याला धाव घ्यावी लागते ती पंचायतीत, तहसीलदार कार्यालय, तलाठी ऑफिस, वकील यांच्याकडे. आणि सगळीकडे सर्वसाधारणपणे प्रामुख्याने आढळून येणारी गोष्ट म्हणजे दिली आणि घेतली जाणारी लाचलुचपत.
आता याची सुरुवात कुठून आणि कशी झाली.. तर अगदी आपल्या पूर्वजांपासून हे पूर्वापार चालत आलेले आहे. आणि सर्व मनुष्यप्राणी ती गादी सांभाळत आहे. सरकारने इतक्या प्रकारच्या योजना राबवल्या आहेत गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, अल्पसंख्याकांसाठी, दारिद्र रेषेखालील लोकांसाठी. पण त्या योजना त्यांच्यापर्यंत कितपत पोहोचतात हे मात्र अजून पर्यंत कोणालाच ठाऊक नाही. म्हटले आता इंटरनेट युग आले आहे त्यावर सर्व ऑनलाईन होते म्हणे. म्हणजे टेबला खालचा संबंधच येणार नाही. अरेच्चा!! वायफाय बंद आहे.. नेट स्लो आहे.. साईटवर लोड आला आहे अशी एक ना अनेक कारणे. एखाद्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा म्हटले आणि तो जर त्या दृष्टिकोनातून जराही प्रयत्नशील दिसला तर त्याचे पाय ओढलेच म्हणून समजा.
आपल्या पूर्वजांनी स्वकष्टाने विकत घेतलेली, कसलेली जमीन आपल्याच नावावर म्हणजे त्यांच्याच पुढच्या पिढीच्या नावावर वडिलोपार्जित हक्क असतानाही करण्यासाठी न जाणो किती हेलपाटे घालावे लागतात. तलाठी म्हणतो की मी काम करेन पण त्याचे किती देणार?? मनात विचार येतो आजोबा माझा, बाप माझा, जमीन आमची आणि यांना का पैसे द्यावे?? त्याची फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर पोलीस म्हणतात तक्रार नोंदवून घेऊ गुन्हा दाखल करू पण आमच्या चहापाण्याची काहीतरी सोय करा. मनात विचार आला की सरकार तर यांना वेळेवर पगार देतो मग तरीही हे का बरे चिरीमिरी च्या आशेत बसतात?? मग विचार येतो मनात हे आपण आमदाराच्या कानावर घालावे. आमदार शांतपणे ऐकून घेतो.. आश्वासन देतो की त्याची बदली करू.. त्याला निलंबित करू.. अमुक करू तमुक करू त्यापुढे येतो तो एक मोठा पण हे सर्व फाईल वर वजन ठेवल्यावर... तेव्हा वाईट वाटतं की अरे आपणच तर यांना मतदान केले... यांनाच तर जनतेचा कैवारी म्हणून मिरवायचे होते. आपल्या सर्व समस्या चुटकीसरशी सोडविण्याचे आश्वासन यांनीच तर दिले होते. पुढे कोर्टात धाव घेतली.. तिथे वकील सांगू लागला की सर्व काही मुद्दे अचूकपणे सांगा.. आपण फाईल करू, पुरावे गोळा करू, तारीख घेऊ पण माझ्या एका तारखेची फी एवढी एवढी आहे.
बाजूलाच बसलेल्या एका वयस्कर स्त्री सोबत गप्पा मारू लागलो तेव्हा लक्षात आले की तरुण पणे तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा खटला अजून चालू आहे. तो ही काय लागेल कसा लागेल याचा अंदाज नाही. आणि मला माझे चित्र डोळ्यासमोर दिसू लागले. तारीख पे तारीख करता करता माझी जमीन विकून जेवढे पैसे येतील तेवढी रक्कम तर मला या कोर्टातच भरावी लागत होती. शेवटी फाईल घेऊन मुकाट घरी आलो. हताश होऊन काय करावे विचारात पडलो असतानाच टीव्ही वर पत्रकार परिषद चालू झाली. पाहून मनात विचार आला की एखाद्या पत्रकार, लेखक, कवी जवळ आपले मन मोकळे करावे आणि त्यांच्या लेखणीतून आपण जगासमोर यावे. आपल्यासारख्या अशा असंख्य लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी. तिथे गेल्यावर समजले हे तर आधीच विकले गेलेले आहेत. ते या राजकारण्यांच्या हातातील कठपुतली बनून आहेत. त्यामुळे त्यांनी लिहिण्यास नकार दिला. सगळ्यावरचा विश्वासच उडाला. म्हटले जनतेसमोर यावे... आप्त स्व कीयांचा.. मित्र परिवाराचा.. आपल्यासारख्या समदुःखी लोकांचा आधार घेऊन आवाज उठवावा. हे सर्व स्व च मला वेड्यात काढू लागले, कोणी साथ देणार नाही तेव्हा लक्षात आले अरे जनता तर गुलाम झाली आहे. तिची अवस्था मेंढरं प्रमाणे झाली आहे. सर्व फक्त मानाच डोलावत आहे.
परमेश्वराने जेव्हा मनुष्य प्राणी जन्माला घातला तेव्हा एक मोठी मेख तयार करून ठेवली आहे. मनुष्य सहित इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर स्वतःची भूक भागवण्यासाठी काहीतरी एक विशेषत्व बहाल केलेले आहे. जर प्राणी पक्षी स्वतःच्या मेहनतीने स्वतःचे पोट भरताना आपण बघतो तर मनुष्याला बळकावलेला लुबाडलेला लुटलेला पैसा का हवा आहे?? एका वेळी माणूस फक्त विशिष्ट प्रमाणातच आहार सेवन करू शकतो, एकावेळी अंगात एकच ड्रेस घालू शकतो, एकावेळी पायात एकच चप्पल घालू शकतो, एकावेळी माणूस एकाच घरात राहू शकतो असे असताना देखील माणूस इतका हव्यास का करतो?? मनुष्याला सर्वात सुंदर इंद्रिय म्हणजे बुद्धी दिलेली आहे. असे असताना देखील तो त्याच्या बुद्धीचा गैरवापर करताना दिसतो. आणि याचा शेवट काय होतो तर ते लुटलेले, रिश्वत घेतलेले पैसे मोठ्या आजार पणा मध्ये एखाद्या हॉस्पिटल मध्ये भरून मोकळा होतो किंवा एखाद्या बिल्डर त्यालाही तसेच फसवून लुबाडून घेतो. आणि या पैशाने बांधलेले चार बंगले असतानादेखील ते हॉस्पिटल म्हणजे भाड्याच्या घरात आपल्या आयुष्याचा शेवट करून मोकळा होतो. अहो तो मृत्युही त्याच्या घरात तो स्वतःच्या मर्जीने घेऊ शकत नाही असे असतानाही का बरे माणूस हव्यास करतो..!!
टेबलाखालचा खेळ खेळता खेळता चालला खालावत
असा हव्यास ध्यास करी आयुष्याची करामत
का रे माणसा तू साथ देत नाही अशी बगावत
