सई दंडगव्हाळ

Others

3  

सई दंडगव्हाळ

Others

पाझर मुक जनावरांचा

पाझर मुक जनावरांचा

6 mins
285


परवचा रोजचाच. पण त्यात नित्य नवीन आनंद सामावलेला. आज मी माझ्या घरच्या दोन पाळीव कुत्र्या बद्दल लिहिते आहे. माझ्या घरी एक लॅब्राडॉर ब्रीड आणि एक गावठी असे दोन कुत्रे आहेत. त्यांच्यात वेळ कसा जातो आणि मागचे लॉकडाऊन ही कसे गेले कळालेच नाही. याआधी गुलाब नावाचा गावठी कुत्रा होता. पण तो कालांतराने वारला. आणि ते मात्र आम्हा तिघांनाही सहन झाले नाही. माझ्या मम्मीच्या हातातच त्याने प्राणत्याग केला. त्यामुळे तिच्या ते जास्तच जिव्हारी लागले. आणि मग निर्णय घेतला की आता परत कोणताही प्राणी पक्षी पाळायचा नाही. याआधी एक पोपटही होता. आणि तोही एकाएकी पिंजऱ्यातून उडून दूर जंगलात निघून गेला, त्याच्या अशा अचानक जाण्याने आम्ही हळहळलो.

पण ती आत्मिक भूतदया काही शांत बसू देत नव्हती. आमच्या नगरात एक भटके कुत्रे होते. तो अतिशय कृश होता. असे वाटायचे की हा कधी मान टाकेल याचा काही भरवसा नाही. त्यामुळे तो आमच्या गेट जवळ दिसला कि न राहवून आम्ही त्याला दोन चार बिस्कीट कधी कधी खायला द्यायचो. पण कुत्र्यासारखा इमानदार प्राणी दुसरा नाही म्हणतात ना.. त्याच प्रमाणे खाल्ला बिस्किटाला तो जागला. मनुष्य मात्र ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी असे वागतो. आणि मग तो वारंवार येत असे. हळूहळू तो गेट जवळच बसून पहारा करू लागला. त्याला कधी नाही काही खायला दिले तरीही तो तिथेच बसून राहायचा. रात्रभर बसून असे आणि सकाळी दरवाजा उघडताच शेपूट हलवून स्वागत करत असे. असे करत करत आम्हाला ही त्याची सवय झाली. सकाळ झाली आणि जर तो दिसला नाही की मी ही कावरीबावरी होत असे. कुठे गेला असेल, का आला नसेल असे असंख्य प्रश्न मनात काहूर माजवायचे. तो दिसला की जीवात जीव यायचा. त्याची त्वचा, केस हे पांढरे असल्याने आम्ही त्याला भूरु असे नाव ठेवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, च लहान असताना कोणीतरी मुलांनी खेळताना त्याला दगड मारला, ज्यामुळे त्याचा मागचा एक पाय अधू झालेला होता. त्यामुळे तीन पाणीच आणि चौथा पाय थोडा लंगडत असा चालत असे. आणि त्यामुळे त्याला मनुष्य प्राण्याची थोडी भीतीच वाटू लागली, तो सहसा माणसांच्याजवळ जायचा नाही. त्यामुळे तो माणसांपासून थोडे दूरच राहू लागला आणि अशक्तपणामुळे त्याच्या अंगात ताकद नसे. पण हळूहळू त्याला शाश्वती झाली की यांच्यापासून आपल्याला काही उपद्रव होणार नाही मग नकळत तो कधी आमचा होऊन गेला हे आम्हालाही कळले नाही. हळू हळू त्याची तब्येत सुधारली आणि तो टवटवीत दिसू लागला. आणि एक पाय लंगडा असूनही आमचा तेवढया एरियामध्ये सर्वात चपळ आणि सर्वात वेगवान धावणारा कुत्रा म्हणजे आमचा भूरु आहे. 


त्याच्यापासून शिकायला मिळालेल्या काही गोष्टी म्हणजे आम्ही जरी रोज त्याला खायला दिले नाही दिले तरी त्याने जिद्द आणि त्याचा प्रामाणिकपणा सोडला नाही. नाही तर मनुष्य प्राणी चार पैशाच्या लालसेने लगेच पक्ष बदलतो. लहानपणी झालेल्या एका इजेमुळे त्याला हे लक्षात आले की पूर्ण पारखून घेतल्याशिवाय कोणावरी विश्वास ठेवायचा नाही. आणि आपण मनुष्य प्राणी एकदा अद्दल घडलेली असताना देखील पुन्हा विश्वास ठेवण्याची ती चूक करतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या व्यंगाचा त्याने कधी बाऊ केला नाही उलट त्यावर मात करून सर्वांमध्ये वेगवान तो झाला. त्यानेच आधीच जर नकारात्मक विचार केला असता की आपण तर लंगडे आहोत आपल्याला हे शक्य नाही तर तो आज या स्थितीला पोहोचलाच नसता.

त्यानंतर साधारण वर्षभराने आमच्या घरी लॅब्राडॉर च्या आठ महिन्यांच्या ब्रीडचे आगमन झाले. त्याचेही फर क्रीम, मोती कलर चे असल्याने त्याचे नाव आम्ही मोती ठेवले. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री व्हायला थोडा वेळ लागला. मोतीच्या येण्याने भूरूला मात्र insecure feel व्हायला लागले. त्याला वाटले की आता आपल्याला जीव न लावता मोती ला जीव लावतील आणि आपल्याला हाकलून देतील. पण असे न होता त्याच्या हळू हे लक्षात आले की आपल्या दोघांनाही सारखाच जीव लावत आहे. ही खात्री झाली मात्र आणि दोघांची अगदी घट्ट मैत्री झाली. मग दोघांना एकमेकांशिवाय राहवेना. एक जेवला नाही तर दुसराही उपाशी राहणार.. एक फिरायला गेला नाही तर दुसराही नाही जाणार. मैत्रीची सुरुवात केली ती मोतीने. आधीच्या वन बीएचके फ्लॅट मधून मोकळ्या जागी आल्यामुळे आणि त्याला त्याचाच एक मित्र मिळाल्यामुळे तो खूपच खूश झाला. मोतीने सख्या भावाप्रमाणे त्याच्यावर जीव टाकला. सुरुवातीला जरी भुरूने कुरघोडी करायचा प्रयत्न केला तरीही मोती ने त्याच्या मैत्रीची जिद्द काही सोडली नाही. मनात कुठलाही राग न धरता तो स्वतःहून भूरूशी खेळायला जात असे. असे करत करत मग भुरुलाही त्याचा लळा लागला. निस्वार्थ प्रेम काय असते हे मी मोती कडून शिकले. आपल्या माणसांचा राग रुसवा न धरता आपली माणसे म्हणजेच आपले सर्वस्व असते हे मला मोती ने शिकवले. आणि हा मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे वडील रोज सकाळी पूजा करताना शंख वाजवतात, तर रोज त्यांच्या शंखाला भुरू प्रतीउत्तर देतो पण मोती नाही. असे म्हटले जाते की आपल्या भारतीय संस्कृती मध्ये कुत्रा, कावळा या दोन प्राण्यांना आत्म्याचे ज्ञान असते. शंख वाजवला की त्यांना महाभारताचे आठवण होते आणि तेव्हा झालेला संहार त्यांच्या डोळ्यासमोर दिसतो आणि त्यामुळे तेही त्याच सुरात ओरडतात. पण हे ज्ञान मात्र परदेशी कुत्र्यांना नाही, त्यामुळे आजवर मोतीने कधीच सूर लावला नाही. असो. दोघांची हुशारी आणि चातुर्य वाखानण्याजोगी आहे. अहो जर विभिन्न जातीचे कुत्रे एकत्र राहू शकतात तर माणूस का नाही? कधीही एकटे वाटले, मूड नसला की खुशाल तुम्ही आपल्या पाळीव प्राण्यांच्या जवळ जाऊन बसा ते तुम्हाला आनंदी केल्याशिवाय राहणार नाहीत. निरागसता, तणावरहित जगणे काय असते हे त्यांच्याकडून शिकावे. आपल्याला अपचन झाले पोटाचे विकार झाले तर आपण मात्र त्यावर हे खाते खा असे नाना उपचार करतो. परंतु हे प्राणी पक्षी मात्र पोट बिघडले तर ते व्यवस्थित होईपर्यंत लंघन करतात. मनुष्यलाच मात्रा खाण्याचा मोह आवरत नाही.

ऑस्ट्रेलियातील अनेक तुरुंगामध्ये कुत्रे कैद्यांच्या मनोवृत्तीत सुधारणा करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. एका क्लब च्या वतीने कैद्यांना कुत्र्यांना ट्रेनिंग देण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. आणि हा ट्रेनिंग दरम्यान कुत्र्याची आणि त्यांची भावनात्मक दृष्ट्या जवळीक होते. Scientifically असे सिद्ध झाले आहे की प्राणिमात्रांवर प्रेम करताना मेंदूत ' oxitosin ' नावाचे रसायन तयार होते, ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. याशिवाय नकारात्मक विचार कमी होऊ लागतात. टीमवर्क, जीवनाबद्दलची आकांक्षा, निडरता, आत्मविश्वास अशा गुणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. कुत्रे मात्र भावनिकरीत्या हे कसे साध्य करतात हे अजूनही न उलगडलेले कोडे आहे...!! म्हणून मला असे वाटते की परमेश्वराने मनुष्याला जन्माला घातले, ते फक्त स्वार्थासाठी नव्हे. आपल्या सोबतच इतरही घटक या समाजात या देशात या जगात वावरत असतात. आपण याचे सामाजिक भान ठेवले पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी भटकी जनावरे वावरतांना दिसतात. भले आपल्याला त्यांना दत्तक घ्यायला जमत नसेल, तर निदान आपण एक भाकरीचा तुकडा पोळी काहीही खाद्यपदार्थ जे आपल्या घरी सहजासहजी उपलब्ध असतात ते देऊन त्यांची भूक भागवू शकतो. मागच्या वर्षी हे लोक डाऊन च्या काळात रस्त्यावरची भटकी कुत्री, मांजरे, गाई, बैल ही उघड्यावर पडली. आणि अशीच एक देवदूत पुण्यात अशा भटक्या जनावरांना रोज अन्न देण्याचे काम करत होती. आजकाल कित्येक NGO चालत आहेत की ज्या अशा stray dogs ना अन्नपुरवठा चे काम करतात. अशा NGO आपण जॉईन करू शकतो. देशभरात रोज कुठे ना कुठे मोठमोठे कार्यक्रम, समारंभ पार पडत असतात. आणि अशा ठिकाणी रोजचे कित्येक अन्न वाया जाते. तर ते अन्न वाया न जाऊ देता आपण फक्त थोडीशी मेहनत घेतली तर अशा सर्व प्राणी पक्ष्यांचं पोट भरू शकते. परमेश्वराने प्रत्येक जीव जन्माला घालताना त्याच्या पोटापाण्याची सोय करूनच या पृथ्वीवर पाठवले आहे.... पण आपणही याच समाजाचे घटक लागतो, आणि अशा सत्कार्यासाठी जर आपला हातभार त्याला लागत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. आणि स्वतःसाठी काही केले तर त्यातून मिळणारा आनंदापेक्षा एखाद्या मुक जनावराचे पोट भरले तर खचीतच तुम्हाला जास्त आनंद देऊन जाईल. जे मी अनुभवले ते तुम्हाला सांगितले. मी सांगते म्हणून नाही तर एकदा स्वतः अनुभव घेऊन बघा आणि इतरांनाही सांगा. 


Rate this content
Log in