आयुष्याचा पथदर्शक
आयुष्याचा पथदर्शक
आयुष्याच्या वाटेवर एकटीची पाऊलवाट
भेटला मार्गदर्शक झाला परिपूर्ण थाट
आयुष्य जगत असताना ते कोणाच्या तरी मार्गदर्शनाशिवाय अपूर्णच आहे. आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो जडणघडण. ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देतो तेव्हा त्याचे सुंदर मडके बनते.. मूर्तिकार मूर्ती साकारतो.. तेव्हा त्याला देवरुप येते.. आणि माती जर अशीच रस्त्यावर पडली तर त्याचा चिखल होतो. तात्पर्य काय तर ती माती कोणाच्या सहवासात येते त्यावर तिचे भवितव्य अवलंबून असते. आणि यालाच आपण शिक्षक म्हणतो. शाळेतील पाठ्य पुस्तकातून शिकवले जाणारे ज्ञान आता मागे पडले आणि त्याची जागा घेतली ती ऑनलाईन शिक्षण पद्धतीने. त्यामुळे पाटी पेन्सिल, वही, रबर, पेन यातली मज्जा हरवली. हस्ताक्षर, सुंदर लेखन या संकल्पनाच मागे पडल्या. गृहपाठ आणि निबंधाची वही छान पणे सजवण्यातला हुरूप लोप पावला. आणि पर्यायाने शिक्षक म्हणून मुलांच्या मनात असलेले आदरयुक्त व्यक्तिमत्व ही हरवत चालले आहे. यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा होतच नाही. त्याला तितका वावच राहिलेला नाही. अशातच माझा मात्र हा व्यक्तिमत्व विकास खूप सुंदर पद्धतीने पार पडला. माझ्या संपूर्ण आयुष्याचे उत्तम मार्गदर्शक आणि माझे प्रेरणास्थान म्हणजे श्री स्वामी सखा.
पूर्वीच्या काळी गुरुकुल शिक्षणपद्धती अस्तित्वात होती. आणि त्यात मुलांना परिपूर्ण शिक्षण मिळत असे. त्यामुळे गुरूकुलातून बाहेर पडलेले विद्यार्थी म्हणजे यशस्वितेचा उत्तम नमुना असत. आता गुरुकुलाकडून आपली वाटचाल ही घरकुलापर्यंत पोहोचली. शिक्षकांकडे न जाता आता घर बसल्या बसल्या, झोपता झोपता, खाता पिता कधीही लेक्चर अटेंड करणे सुरू झाले. त्यामुळे शिस्त हा प्रकार राहिला नाही. आणि अशाच कलियुगात मी मात्र ही गुरुकुल शिक्षणपद्धती अनुभवली ती समर्थवाडीमध्ये.
डिग्री पर्यंतचे शिक्षण तर शाळा कॉलेज मध्ये पूर्ण झाले.. दुनियादारी म्हणून थोडा जॉब ही करून बघितला. त्यानंतर समर्थवाडीत सेवेचा योग आला आणि आयुष्याला कलाटणी मिळाली. भौतिक सुख आणि सुविधा यामध्येच आनंद शोधणारी मी.. खरे सुख काय असते ते सर्वार्थाने अनुभवले. जीवन जगणे म्हणजे काय हो..?? आयुष्य जगताना असे क्षण अनुभवणे की ते शेवटच्या श्वासापर्यंत मनातून कधीच न जाता कायम मनाला ताजेतवाने ठेवते.. त्या स्मृतीने गालावर सुंदर खळी पडते आणि नव्या उमेदीने पुन्हा जगण्याला उभारी देते. असे अमोलिक क्षण मी सद्गुरू आणि समर्थवाडीच्या सहवासात अनुभवले. की ज्याने माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. साहजिकच एक इंजिनिअर म्हणून नावापुढे दोन E लागतात. एक इंजिनिअर चा आणि दुसरा ईगो चा. आणि ज्या ज्ञानाचा अहंकार होतो ते ज्ञान कसले..? हे वाडीत उमगले. ज्ञानाने अंगी नम्रता यायला हवी हे कळले. कोणतेही काम हे छोटे किवा मोठे नसते.. हे समजले. समजले म्हणण्यापेक्षा स्वतः अनुभवले. ज्यावेळेस तुम्ही कसलीही अपेक्षा न ठेवता त्या एका शक्तिसमोर पूर्ण शरणागती पत्करता ना... तेव्हा ती शक्ती तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक तुमच्या झोळीत टाकते हे प्रत्यक्ष अनुभवले. तुम्ही मनापासून सेवा केलीत तर मेवा मिळतोच. अन्नपूर्णे च्या रोजच्या सात्विक आहाराने मन सात्विक निर्मळ व्हायला मदत होते. आणि अन्नावरच्या वासनेपेक्षा अन्न हे पूर्णब्रह्म..! हेच मनावर जास्त बिंबले. मनाची मानसिकता बदलली, जी सहजासहजी मनुष्याची बदलत नाही. त्यासाठी नित्याचा गुरुसहवास च हवा. त्यामुळे प्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटना याकडे बारकाईने बघण्याची दृष्टी मिळाली. महत्वाचे म्हणजे प्रत्येक घटनेकडे सकारात्मकतेने बघणे शिकली. त्यामुळे लोक काय म्हणतील..? हा मुद्दा, ज्याला आपण सामान्य माणूस जास्त महत्त्व देतो तो मुद्दाच राहिला नाही. निर्लज्जो गुरूसनिद्धो..!! हे आपल्या मनावर बिंबले की मनातले सर्व किंतू, परंतु दूर होतात. आणि आपण आत्मविश्वासाने पाऊल टाकतो. आजची तरुण पिढी ही नैराश्येच्या गर्तेत सापडते आहे आणि त्यात आत्मविश्वास गमावून आत्महत्ये सारखे प्रकार घडतात. हा आत्मविश्वास आजच्या पिढीला देण्याचे काम, कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी लागणारे धैर्य हे वाडीत अंगी बाणले जाते. यशाला सामोरे जाणे हे जितके सोपे आहे तितकेच अपयश पचवणे कठीण. आणि हे जो शिकला तो आयुष्य जिंकला. आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना कसा वाव द्यावा.. छंद कसे जोपासावे हे गुरुमाऊलींनी शिकवले. निसर्गाकडे बघण्याची दृष्टी दिली... त्यातून कसे आणि काय शिकता येईल हे समजावले. आपला आनंद कशात आहे.. ते पाहायला शिकवले. भूतदया शिकवली, दानाचे मोल समजले. अजुन काय आणि किती सांगू. आणि या पलिकडे जाऊन सहज, सोपे अध्यात्म शिकवले ज्याची आजच्या तरुण पिढीला नितांत गरज आहे. विशेष उल्लेख करण्याजोगे म्हणजे आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार यांची जोपासना वाडीत शिकवली जाते.
अश्या सर्व गुणांनी परिपूर्ण अशी मी वाडीत तयार झाली. आणि त्यानंतर मी आता माझ्या संसारात सर्व भौतिक सुखाने परिपूर्ण आहे. पण सरांच्या एका पदामधे उल्लेख केल्याप्रमाणे अवस्था झाली आहे. ती म्हणजे... या गुरुसानिद्ध्यात मनातून भौतिक सुखाची सर्व इच्छा काढून टाकली आणि आत्मिक आनंद मिळवून दिला आणि त्यानंतर महाराजांनी जे काय हवंय ते सांग तुला देऊन टाकतो... अश्या अवस्थेला आणून पोहोचविले. की मनात आता कसलीच आशा, इच्छा नाही पण तरीही ती माऊली सर्व बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष ठेवून मला ते पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करते आहे. यापेक्षा वेगळे अजून काय मागावे आणि काय अपेक्षा करावी. यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की प्रचंड विश्वास ह्या गुरूवर ठेवा, श्रद्धा ठेवा ही गुरुमाऊली सावली सारखे आपले रक्षण करते याची प्रचिती पदोपदी क्षणोक्षणी जाणवते. आज शिक्षक दिनानिमित्त हा थोडासा लिहीण्याचा प्रपंच. आभार मानण्या इतपत मी मोठी नाही पण जे ज्ञान ह्या गुरुमाऊली कडून मिळाले ते थोडेसे अर्पण करून एक विनम्र अभिवादन देण्याची एक प्रांज्वळ इच्छा म्हणून हे शब्दपुष्प..!! एकच म्हणावेसे वाटते..
झाली गुरुकृपा ज्याला ||
नाही काय उणे त्याला..||
