खरं कि खोटं...
खरं कि खोटं...
खूप विचार करूनही न उलगलेलं कोडे! स्त्री हक्क कायदा संमत झाला... स्त्री-पुरुष समानता न्याय प्रस्थापित झाला... पण खरचं स्त्री ला तिचे स्वातंत्र्य मिळाले का हो ? खरचं ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहे असे चित्र दिसते का हो ? वर वर दिसत असेलही पण खरोखर च ती आहे का ? तिला तीच मत स्वातंत्र्य आहे का ?
घटनेने जरी असंख्य कायदे संमत केले असतील. पण ते फक्त कागदोपत्रीच आहेत आजही अजूनही या एकविसाव्या शतकात. We are from well educated family. असे अहंकाराने सांगनाऱ्यांच्या घरात तर नेहमीच उलट चित्र पाहावयास मिळते. मी अहंकार म्हणते आहे. होय.. अहंकारच... कारण त्याला गर्वाने नाही म्हणता येणार. आम्ही पुढारलेल्या विचारांचे आहोत असे लोकांना आवर्जून सांगणारे खरच घरातल्या स्त्री ला त्याच विचारांनी वागवतात का हो..की फक्त आपली पत प्रतिष्ठा जपण्यासाठी केलेला तो देखावा असतो.
वरकरणी जरी चित्र छान सुंदर वाटत असले तरीही त्यामागे एक लपलेले सत्य असते. त्यामागचा चेहरा वेगळा असतो. दिव्याखाली अंधार म्हणतात तो हाच. आजची स्त्री उच्च शिक्षीत झाली आहे. पण कधी कधी तो अधिकार ही तिला मिळत नाही असे काही घरात दिसून येते. तिच्या आवडीचे क्षेत्र तिला निवडायचे असते पण घरच्यांच्या दबावाला कारणीभूत ठरून तीला कोणत्यातरी घराजवळपास आहे त्या कॉलेज मध्ये एंट्री भेटते अशी डिग्री पदरी पाडून घेते. तिच्या क्षमतेचा वापर तिला करूच देत नाही. मुलगी आहे ... बाहेर नाही राहायचं...इथेच शिक... शिक्षण हे शिक्षण आहे.. ते इथे काय किंवा तिथे काय.. सारखेच. असे म्हणणारे मात्र मुलाला उच्च शिक्षणासाठी त्याची बौद्धिक क्षमता नसताना मोठ्या शहरात.. नावाजलेल्या विद्यापीठात डोनेशन भरून एडमिशन घेतात. आणि जर मुलीने या विषयावर प्रश्न समोर मांडलाच तर मिळणारे सहज उत्तर म्हणजे... तो मुलगा आहे. यातून शिक्षण पूर्णत्वास नेले की नंतरचा गहन प्रश्न म्हणजे नोकरी चा. तिला जवळपास च नोकरी बघायची, भेटली तर ठीक नाहीतर घरात बस. अग, त्यात काय एवढे नोकरी केलीच पाहिजे असे काही नाही. शिक्षण आहे ना मग झाले तर. अहो... मग शिक्षण च कशासाठी दिले तिला. साहजिकच शिक्षण आहे म्हणून ती मोठ्या आशेने नोकरीची स्वप्न बघत असते. पण तिच्या या कोवळ्या स्वप्नांचा चुराडा करणारे दुसरे तिसरे कोणी नसुन तिचेच आपले म्हणवणारे असतात. अन् त्यातूनही जर घरच्यांनी मोठ्या मनाने समजून घेऊन तिला तिच्या क्षमते प्रमाणे, अपेक्षेप्रमाणे नोकरी करण्यासाठी मुभा दिलीच... तर बाहेर तिच्यावर टपून बसलेले नराधम असतातच. मल्टी नॅशनल कंपनी मध्ये नोकरी करायची आहे.... मग कोणाचा तरी वशिला हवा.. नाही..! कोणीच नाही..!! ठीके मग... आमच्या अटी मान्य कर. ह्यांची चापलुसी करा. नाहीतर बॉस च्या मर्जीने वाग. तो तिला नोकरी देतो... मोठी पोस्ट ही देतो... तिला बिचारीला वाटत असते आपण आपल्या हिमतीवर करून दाखवले असे क्षणभर तिच्या मनात येताच.. त्याची पुढची अट असते.. ज्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकते हो.. अन् तिसऱ्याच क्षणी मोठी मोठी स्वप्न घेऊन आलेली ती... क्षणात गर्भगळीत होते हो...
काय चूक होती तिची..??? स्वप्न बघितले ही?? स्वतःच्या मर्जीने विचार केला ही?? शिक्षण घेतले ही?? नाही.... तर फक्त आणि फक्त ती मुलगी आहे ही. लाज वाटते अशा समाजाची... लाज वाटते ती असा विचार करणाऱ्या मनुष्यरुपी राक्षसांची... लाज वाटते त्यांची स्वतःला सुशिक्षीत म्हणवनाऱ्यांची... लाज वाटते त्यांच्या उच्च शिक्षणाची... तिरस्कार येतो स्वतःच्या शिक्षणाचा... क्षणभर राग येतो स्वतःच्या स्त्रीत्वाचा... राग येतो क्षणभर स्वतःच्या स्वप्नांचा... राग येतो क्षणभर स्वतःच्या स्वाभिमानाचा. चूक नसतानाही ती कोसत असते स्वतःलाच... आतल्या आत तिचा आवाज दबुन जातो या दुष्ट समाजापुढे. आणि अगतिकतेने डिग्री ची फाईल सावरत ती कॅबिन मधून बाहेर पडते. आणि बाहेर आल्यावर तरी दुसरे काय हो... काय सांगणार ती कोणाला...मग मलाच इंटरव्ह्यू नीट देता आला नाही, घाबरून गेली मी..असे खोटेच सांगते. अन् त्यावर तिला कोसनारे सर्व लोक, हा समाज...!!
सांगा आता तुम्हीच काय खरं आणि काय खोटं..!! कोण याचा निकाल लावणार अन् कधी.. त्यासाठी अश्या किती आहुती द्याव्या लागणार?? तरीही सापडेल का उत्तर... फारतर काय होईल... अजुन असाच एखादा कायदा संमत केला जाईल... पुन्हा एकदा कागदोपत्रीच...
