sai dandgavhal

Inspirational

2  

sai dandgavhal

Inspirational

जगणे

जगणे

3 mins
127


जगणे.. काय असते हे जगणे....सहजच पडलेला प्रश्न. जन्म घेतल्या क्षणापासून मरेपर्यंत आयुष्य व्यतीत करणे म्हणजे जगणे का... तर मुळीच नाही. जगणे म्हणजे सतत स्वतःला जागे ठेवणे. जागे ठेवणे ते आनंदासाठी.. सुखासाठी. क्षणिक सुखासाठी चातकाप्रमाणे आस लावून राहणे आणि त्यानंतर अनुभवलेला तो अमृत क्षण. अहाहा... बाकी सुख म्हणजे मृगजळच जणू. स्वतःच्या बेंबी मधून येणाऱ्या सुगंधाला न ओळखता ते हरिण बिचारे धावत सुटते त्या वासाच्या मोहाने...त्याला हे कळतच नाही की हा सुगंध आपलाच आंतरिक ठेवा आहे. मनुष्य तरी दुसरे काय करतो हो...आपलीच आंतरिक सुख शांती दुर्लक्षित करून वेड्यासारखा पैशाच्या मागे धावत सुटतो. आणि त्यात सुख शोधण्याचा प्रयत्न आयुष्याच्या शेवटच्या पल्ल्यापर्यंत करत असतो. आणि अंती मात्र निराशा पदरात पाडून शेवटची घटिका मोजत असतो. माझे माझे करता करता स्वतःसाठीचे जगणेच हरवून बसतो.


त्यासाठी माऊली म्हणते, सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता येवढे. राईचा पर्वत करणारे आपण जीव हाच पर्वत रुपी भार झेलत असतो. कारण त्या राई मधे आपण कधी डोकावून च पाहिलेले नसते. आणि त्याचेच द्योतक म्हणून की काय त्या कृष्णा ने करंगळी वर पर्वताचा भार तोलत दाखवून दिले की आपण किती क्षुल्लक गोष्टी या राईच्या पर्वता प्रमाणे करतो. ज्याचा प्रत्यक्षात भार हा फक्त करंगळी वर तोलण्या इतकाच मर्यादित आहे. सरड्याची धाव कुंपणा पर्यंत तद्वतच आपली धाव त्या हॉस्पिटल च्या बेड पर्यंतच. आणि एक क्षण येतो जेव्हा डॉक्टर सांगतो की आता फक्त देव त्याचे रक्षण करो, आमचे सर्व प्रयत्न थकले. तेव्हा आम्ही त्या शक्तीपुढे नत मस्तक होतो. दयाळू कृपाळू म्हणून त्याला आळवतो आणि तत्क्षणी सर्व विसरून जातो. 


आयुष्यभर ज्याचे अस्तित्वच मान्य न करणारे आम्ही तेव्हा तो दिसतही नसून त्याच्या असण्यावर ठाम राहून त्या पाषाणात त्याला मनापासून शोधतो. ते देहभान विसरणे म्हणजे खरे जगणे.आणि हा दयाघन पटकन भाळून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो.. मात्र तो कृपण आयुष्याची राखरांगोळी करुन जमवलेली पुंजी त्या डॉक्टर च्या स्वाधीन करूनही निराशा पदरी पाडून घेतो. आणि आयुष्य पूनरपल्लावित केलेल्या त्या पालन कर्त्याला मात्र फक्त दोन हात जोडून निघून जातो. तो विधाता आश्चर्य चकित होऊन तोंडात बोट घालून फक्त पाहत राहतो आणि त्याक्षणी तो भक्तासाठी स्वतःचे जगणे विसरून जातो. म्हणून क ख ग घ आधी मुलांना जगणे शिकवा. दुनियादारी तर ते शिकतीलच हो पण त्या आधी स्वतःसाठी वेळ देणे शिकवा. वेळ निघून गेल्यावर परीक्षा हॉल ही साधा क्लास रूम होतो. खुर्ची गेल्यावर पुढारी ही सर्वसामान्य मनुष्य होतो. म्हणून जगणे शिका. आवडीचे छंद जोपासा. त्याचे व्यसन करा. घराची किल्ली मुलाला देण्या आधी त्याला सुखी आयुष्याची गुरुकिल्ली द्या. वय निघून गेल्यावर पावसात मनसोक्त भिजणेच राहून गेले असे नका होऊ देऊ... वरातीमागून घोड्याला ही कस्पटासमान समजतात.


चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगून मिळालेला मानव जन्म सत्कारणी लावला तरच खरे जगलात. मनुष्य सोडला तर बाकी सर्वांना स्वतःचे पोट भरण्याचे ज्ञान हे उपजतच असते, पण फक्त स्वतःचे पोट भरण्या इतकेच.. आणि एकमेव मनुष्य प्राणी आहे ज्याला मन, बुद्धी दिली आहे विचार करण्याची. ह्या विचार सामर्थ्याच्या जोरावर आपल्यासोबत दुसऱ्यांचा ही विचार करावा. आणि आपण दुसऱ्यासाठी काही केले तर ते जास्त आनंद देऊन जाते. आणि जगण्यातला आनंद वाढतो. हे स्वतः अनुभवा. मनसोक्त निखळ सर्वांवर प्रेम करा आणि जगण्याचा बावनकशी आनंद लुटा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational