sai dandgavhal

Inspirational

3  

sai dandgavhal

Inspirational

बदल

बदल

2 mins
292


       बदल हा निसर्गाचा नियम आहे, हे वर्षानुवर्षे चालत आलेले सत्य आहे. आणि तो आवश्यकच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बदलाची ही सुरुवात होते तीच मुळात या निसर्ग शक्ती पासून, या पंच महाभूतांपासून. आपण जे तीन ऋतू अनुभवतो ते याचीच साक्ष देतात. त्यामुळे उन्हापासून होणाऱ्या काहिली पासून आपली सुटका होऊन सुखद पावसाळ्याचा आपण मनमुराद आनंद लुटतो. या पावसामुळेच धरती फुलते-फळते. त्यासाठी हा बदल महत्वाचा आहे. पावसाच्या दलदलीपासून मुक्त होऊन हवेतील गारवा आपण अनुभवतो. आणि ऋतू प्रमाणेच आपला आहार-विहार ही आपण बदलतोच कि. अन् आहाराच्या या बदलामुळे विविध चवी तसेच जिभेचे चोचले आपण पुरवतो. ह्या बदलामुळेच प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहते. त्या अनाहत शक्तीने अशी सर्व सुंदर सोय करवून ठेवलेली आहे. थोडा विचार करा... जर खरच आपल्याला रोज एकच पदार्थ खावा लागला असता तर काय झाले असते हो... मला वाटते आपण अन्न त्यागच केला असता. 


        अजुन असेच सुंदर उदाहरण म्हणजे मनुष्य अनुभवत असलेले जीवन. अर्भका पासून बदल होत होत बाल्यावस्था पुढे तारुण्य आणि मग वृद्घत्व. या अवस्था मधून मनुष्य जात असतो. आणि हा जीवन प्रवास करत असताना असंख्य बदल अनुभवत असतो. माणसाचे आचार विचार बदलतात. राहणीमान बदलते. भाषा बदलते. बाळाचे बोबडे बोल मागे पडून स्पष्ट अस्खलित संभाषण शिकतो. त्यातच शाळेत प्रवेश केला की विविध भाषा शिकतो. त्या भाषा शिकण्यासाठी वेगवेगळे तास असतात. म्हणजे त्यातही दर अर्धा तासानंतर आपण बदल अनुभवतो आणि तेच शिकण्याची मजा वाढवते. त्याच अभ्यासात बदल म्हणून शारीरिक शिक्षण, योगाशिक्षण हाही एक भाग असतो. जो आपल्याला ताजेतवाने ठेवायला मदत करतो. 


        शाळा संपवून कॉलेज, पदवी शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण आणि त्यानंतर प्रशिक्षण. आणि मग शेवटच्या टप्प्यात मनुष्य पोहोचतो ते पोट पाण्याच्या शोधार्थ. नोकरी किंवा व्यवसायाची निवड करतो. आणि त्या रोजच्या कामकाजाचा कंटाळा आला की चार दिवस जाऊन कुठेतरी मन रमवायला, मोकळे करायला फिरायला जातो. आणि हा अवघ्या चार दिवसाचा बदल त्याचा सर्व थकवा दूर करून नवीन जोमाने कामाला उभारी देतो. 


       अशा या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी या जीवनपटलावर घडतच असतात. पण त्यातूनही अजून वेगळा बदल आपण सर्वांनी अनुभवायचा असतो. जो बदल आपण सर्व रोजच्या धकाधकीच्या जीवनात संघर्ष करता करता विस्मृतीत जातो. तो म्हणजे स्वतःसाठी वेळ देणे. सतत स्वतःला, स्वतःच्या मनाला बदल देणे. म्हणजे त्यासाठी फार काही करायचे नाही. अगदी सोप्या साध्या गोष्टी लक्षात घ्यायची. ते म्हणजे काहीतरी आपल्या रोजच्या कामात नावीन्य आणायचे जेणेकरून आपल्याला आनंद वाटेल व काम कंटाळवाणे होणार नाही. थोडेसे आवडीचे छंद जोपासायचे. नृत्य, नाट्य, संगीत, विविध कला या करून बघायच्या. कधी लहान होऊन बघायचे. पावसाच्या पाण्यात आपल्याही छोट्या होड्या मुलांसोबत सोडून बघायच्या. एखादे छानसे चित्र काढून रंगवून बघायचे. अहो, छंद जोपासायला कुठले आले वयाचे बंधन अन् नियम. बेधडक बिनधास्त राहायचे. आयुष्यात सिरीयस होणे फार घातक आहे बरे. सिरीयस झालो की घरचे ही आइसीयु मध्ये आपल्याला भरती करतात. म्हणून निखळ मनोरंजन स्वतःच स्वतःचे करा आणि असे करता करता वय कसे सरते ते तुम्हालाही कळणार नाही. 


बदलो मौसम, बदलो नजारे और बदलो नजरिया|


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational