चक्र स्त्री गर्भारपणानंतरचे..
चक्र स्त्री गर्भारपणानंतरचे..
चित्र जे आपण समोर बघतो ते आणि वास्तविक चित्रण या मध्ये बऱ्याचवेळा तफावत आढळते. स्त्री चे विश्व हे खुलून येते आणि आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान लाभते जेव्हा ती एक आई होते. पण आई होणे हे काही बाजारातून भाजी आणण्या इतपत सोपे नसते. त्यासाठी नऊ महिने ती स्वतःशीच झुंज देत असते. आणि त्यानंतर नऊ महिने नऊ दिवस झाले की मोठा दिव्यातून जवळ जवळ मृत्यूच्या दारात जाऊनच परत येत असते. हा सर्व अनुभव घेण्यासाठी एक आईच व्हावे लागते. आणि आपल्याला अपत्य झाल्यानंतर ती माता आत्मिक सुखामध्ये मग्न होते. आणि घरातील इतर सर्व मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट हे सर्वजण बाळाला बघण्यात आणि बाळाशी खेळण्यातच रमून जातात. यातच कधीकधी त्या बाळांतिणीकडे दुर्लक्ष होते. आणि ह्या दुर्दैवी दुर्लक्षा चे परिणाम ती स्त्री बिचारी आयुष्यभर भोगत असते. आजच्या या लेखात मी गर्भधारणेनंतर स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या आणि समाजामध्ये असलेली त्या बद्दलची मानसिकता ही स्पष्ट करू इच्छिते.
स्त्री रोग तज्ञ आणि वंध्यत्व तज्ञ डॉ. शिल्पा जोशी ह्या सांगतात की प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झालेल्या स्त्रियांच्या समस्या वेगळ्याच असतात. त्यांना अतिशय जास्त अशक्तपणा, दूध कमी येणे, प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका या गोष्टी संभवतात. क्वचित कधी तरी खूप अवघड प्रसूती झाली किंवा घरीच प्रसूती झाली तर योनीमार्ग पूर्णपणे फाटला जातो संडासच्या जागेपर्यंत पूर्णपणे फाटला जातो (third degree perineal tear )आणि मग मात्र स्त्रीचे लघवी संडास दोन्हीवरचे नियंत्रण कमी होऊ लागते. अशा प्रकारची जखम बरी होण्यास दोन अथवा तीन वेळा ऑपरेशन करावे लागू लागते. टाकेही बरेच येतात आणि भरून यायला वेळ लागू शकतो.
नॉर्मल डिलीव्हरी झालेल्या बऱ्याच स्त्रियांमध्ये योनीमार्ग सैल पडल्यामुळे होणारे परिणाम आढळतात. यामध्ये लघवी, संडासवरचे नियंत्रण कमी होणे, गॅसचा त्रास होणे आणि टाक्यांची जागा दुखत असल्यामुळे लैंगिक संबंधांमध्ये कमतरता येणे अशा प्रकारच्या समस्या दिसतात. चाळीशीच्या आसपास लघवीवर नियंत्रण कमी असण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये लक्षणीय आहे. योनीमार्ग प्रसूतीदरम्यान एका सीमेपलीकडे ताणला गेला तर पूर्ववत होऊ शकत नाही. याचा परिणाम म्हणून लैंगिक संबंधांच्या वेळी दोन्ही जोडीदारांना लैंगिक सुखाची अनुभूती येणे अवघड होऊन बसते. आणि मग स्त्रीपुरुषांमध्ये चिडचिड,धुसफुस सुरू होते. या समस्यांसाठी काही वेळा योनीमार्गाच्या स्नायूंचे व्यायाम उपलब्ध आहेत ज्याचा थोडाफार उपयोग होऊ शकतो.
या सगळ्या समस्या स्त्रीसाठी अत्यंत लाजिरवाण्या असल्यामुळे बहुतेक स्त्रिया ही दुखणी आयुष्यभर अंगावर काढतात आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहतात. या समस्यांवर उपाय आहेत परंतु स्त्रियांनी मनमोकळेपणाने डॉक्टरांशी बोलणे गरजेचे आहे. नॉर्मल डिलिव्हरी होणे उत्तमच याबद्दल कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही परंतु कधी कधी नातेवाईकांच्या अतिअट्टाहासाने अवघड प्रसूती झाली तर त्याचे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेण्याची गरज आहे. प्रसूती मध्ये आई आणि बाळ हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक सोडून बाकीच्या नातेवाईकांचाच ठमठमाट अति चालू असतो. प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या इच्छा, तिच्या मनातल्या शंका, कुशंका, भीती याकडे कोणाचेही लक्ष नसते. या बावरलेल्या आणि भेदरलेल्या मुलींना त्यांच्या मनातल्या गोष्टी बोलू दिल्या पाहिजेत. सिझेरियन झालेल्या स्त्रीलाही भूल उतरल्यानंतर ज्या वेदनांना सामोरं जायला लागतं ते अजिबात सोपं नाही . त्यामुळे सिझेरियन झालं म्हणजे सगळं सोपं झालं असं अजिबात नाहीये. ते टाके सुद्धा काही दिवस दुखतातच , फक्त ते अवघड ठिकाणी नसतात. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आणि औषधांमुळे सिझेरियन नंतर स्त्री बऱ्यापैकी लवकर पूर्वपदावर येऊ शकते.
प्रसुतीपश्चात मनोविकृती नैराश्य ही अजून एक जटील समस्या. बाळंतपणानंतर काही स्त्रियांमध्ये दिसून येते. या मध्ये काही स्त्रिया मानसिक नियंत्रण पूर्णपणे हरवून बसतात. मोठ्याने रडणे, ओरडणे, हिंस्त्रपणा अशी टोकाची लक्षणे दिसल्यास या स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करावे लागतात. यातून बऱ्या होईपर्यंत ही स्त्री बाळाची काळजी घेऊन शकत नाही. सुदैवाने ह्या समस्येचं इतकं गंभीर स्वरूप कमी प्रमाणात आढळतं परंतु प्रसूतीनंतर नैराश्य मात्र बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसून येते. गर्भारपणात वाढलेले हॉर्मोन्सचे प्रमाण डिलिव्हरी नंतर भर्रकन खाली यायला सुरवात होते तसेच स्तनापानासाठी वेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स शरीरात वाढायला लागतात. हॉर्मोन्सनी स्त्रीच्या शरीरात चालवलेल्या या मुक्तछंदामुळे ती बिचारी मानसिक संतुलन गमावून बसते. सध्याच्या काळात आयुष्यभर नोकरी केलेली आणि बिझी राहणारी मुलगी डिलिव्हरी नंतर अचानक घरात कोंडली जाते. बाळाची शी, शु, आणि दूध पाजणे एवढंच तिचं विश्व होऊन जातं. आपल्या समाजात गैरसमज आणि अंधश्रद्धा यामुळे या मुलींना मोकळ्या हवेत फिरू सुद्धा दिलं जात नाही, काही कर्मठ घरांमध्ये पुस्तके वाचू दिली जात नाही. टीव्हीही बघू दिला जात नाही . प्रसूत झालेल्या स्त्रीला चौरस आहार अतिशय गरजेचं असतो. काही घरांमध्ये अंधश्रद्धेपायी बाळंतिणीला अतिशय विचित्र, बेचव आणि कधी कधी अपुरा आहार दिला जातो. या सगळ्याचा तिच्या मनावर परिणाम झाला नाही तरच नवल!
बाळंतीणीला तुला दूध कमी आहे त्यामुळे बाळ सारखं रडतंय, वरचं दूध द्या हे सतत सांगून नामोहरम आणि निराश करणारी एकतरी व्यक्ती प्रत्येक घरात असते. हे कमी म्हणून काही घरांमध्ये सासर आणि माहेरची भांडणे रंगतात. डिलिव्हरी नॉर्मल की सिझेरियन पासून बारशाच्या मानपानापर्यंत सगळ्या गोष्टींवर यथेच्छ वाद या नाजूक स्थितीतल्या मुलीसमोरच घातले जातात .या सगळ्याचा परिणाम म्हणून काही मुलींना मानसिक नैराश्य येते. अशक्तपणा, काही करावेसे न वाटणे, सारखे रडू येणे, वेळप्रसंगी बाळाकडे दुर्लक्ष, सारखे झोपून राहणे, गंभीर केसेस मध्ये आत्महत्येचे विचार येणे हे प्रसुतीपश्चात नैराश्याची लक्षणे असू शकतात. याचं प्रमाण खूप वाढले तर या मुलींना नैराश्य कमी करण्यासाठी औषधे द्यावी लागू शकतात. सुदैवाने बऱ्याच केसेस मध्ये योग्य उपचारांनी या मुली हळूहळू पूर्वपदावर येतात. पण हा कुटुंबियांसाठी परीक्षेचा काळ ठरतो.
"डॉक्टर डिलिव्हरी झाल्यापासून लघवीवर पूर्वीसारखं नियंत्रण नाही राहिलंय.. एकदम खूप घाई होते.. कुठे बाहेर जायचं टेन्शन येतं त्यामुळे." या आणि अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या स्त्रियांना प्रसूतीनंतर सुरू होतात आणि चालूच राहतात. आपल्या समाजात स्त्रिया या सर्व समस्यांचा मुकाटपणे स्वीकार करतात आणि आयुष्यभर सहन करत राहतात.
आई होण्याच्या अद्वितीय अनुभवाची ती किंमत आहे अशीच स्त्रीची भावना असते. परंतु तिच्या या वेदनेला तोंड फोडायची गरज आहे असं मला वाटलं. एकदा गर्भवती झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरात असंख्य बदल घडतात. काही बदल प्रसूतीनंतर पूर्ववत होतात; काही बदल मात्र कायमस्वरूपी असतात. गर्भारपणातली आणि प्रसूतीनंतरची कंबरदुखी हा स्त्रियांचा फार मोठा जिव्हाळ्याचा विषय असतो. गर्भारपणात स्त्रीच्या शरीरातील सगळे सांधे थोडे सैल झालेले असतात. कंबरेच्या माकड हाडाचे सांधेसुध्दा वाढत्या बाळाला सामावून घेण्यासाठी थोडे सैल होतात आणि मग कंबरदुखी सुरू होते. गर्भारपणात आणि स्तनपान चालू असेपर्यंत कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्या नियमित घेतल्या तर ही कंबरदुखी खूपच नियंत्रणात राहते पण स्त्रिया हा साधा उपाय सोडून बाकी नाही ते सगळे उपाय करत बसतात आणि शेवटी सिझेरियनच्या वेळी मणक्यात दिलेल्या भुलीच्या इंजेक्शनला जबाबदार ठरवून मोकळ्या होतात. या इंजेक्शनचा कंबरदुखीशी काही एक संबंध नसतो हेच वैद्यकीय सत्य आहे.
आजकाल नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला आणि तिच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना अतिशय धन्य वाटत असतं आणि तिच्याच बाजूला एखादी सिझेरियन झालेली स्त्री असेल तर तिला स्वतःला उगाचच अपयशी ठरल्याची भावना येते. या दोन्हीही भावना चुकीच्या आहेत. नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणजे स्वर्ग गाठला असं वाटण्याचं काही कारण नसतं. त्या सगळ्या आनंदात प्रसूती झालेल्या स्त्रीचं दुखणं जाणण्याची कोणालाही गरज वाटत नाही. नॉर्मल डिलिव्हरी होताना योनीमार्गात छेद देऊन नंतर ती जखम शिवली जाते. हे टाके भरून यायला आठ ते दहा दिवस लागतात. अवघड जागेचं दुखणं हा वाक्प्रचार इथूनच सुरू झाला असावा. या नुकत्याच प्रसूत झालेल्या या मुलींना या टाक्यांमुळे नीट बसता पण येत नाही, बाळाला पाजताना अजूनच पंचाईत होते. दुखतंय म्हणून कोणाला मोकळेपणाने सांगताही येत नाही. काही वेळा बाळ आकाराने मोठे असेल किंवा प्रसूती अवघड झाली असेल तर हे टाके खूप आतपर्यंत असतात आणि जखम बरीच मोठी असते. संडासची जागा योनीमार्गाच्या खूप जवळ असल्यामुळे हे टाके अशावेळी संडासच्या जागेजवळ येतात आणि मग मात्र या नव्या आईचे हाल खूप वाढतात. तशातच नुकत्याच प्रसूत झालेल्या स्त्रियांमध्ये मूळव्याध आणि फिशरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे मग टाक्याचे दुखणे आणि मूळव्याधीचा त्रास अशा काटेरी वेदनांमध्ये ही नवी आई अडकते. आजूबाजूचे आणि नातेवाईक मात्र नॉर्मल डिलिव्हरी झाल्याच्या आनंदात मग्न असतात. आणि तिलाही आनंदी राहण्याबद्दल बजावत असतात.
तर गर्भारपण आणि प्रसूती यामध्ये स्त्री एवढ्या सगळ्या दिव्यांमधून जात असते. वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही प्रसूती हा स्त्रीचा खरोखर दुसरा जन्मच असतो याची जाणीव स्त्रीच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांनीच ठेवणं आणि तिला जपणं महत्वाचं आहे. नाही का? त्यामुळे तिच्या काय समस्या आहेत.. तिला काय त्रास होतो आहे.. याची जाणीवपूर्वक नवरा म्हणून, सासू म्हणून, आई म्हणून विचारपूस करा. तिला त्यावेळी गरज असते ती फक्त मानसिक आधाराची. तिला होणारा त्रास तर ती कोणासोबत वाटून घेऊ शकत नाही. पण योग्य वेळी तिचे मन कळले तर उपाय करायला सोपे जाते. नैराश्याच्या गर्तेत सापडणाऱ्या अश्या काही अंशी मातांना तरी आपण आपल्या परीने प्रयत्न करून पूर्ववत स्थितीत आणू शकतो.
