सई दंडगव्हाळ

Abstract Others

3  

सई दंडगव्हाळ

Abstract Others

डोंबारी

डोंबारी

3 mins
402


डोंबारी हा खेळ आजकालच्या पिढीला कदाचित जास्त माहिती नसेल, फक्त पुस्तकात वाचलेले तेवढेच माहिती. पण पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल नव्हते, टीव्हीचा प्रस्थ नव्हतं त्यावेळी गावातल्या लहान मुलांचा मोठ्यांचा विरंगुळा म्हणजे अधून मधून येणारा हा डोंबाऱ्याचा खेळ. काळानुरूप आता डोंबारी आणि त्यांचा खेळही पडद्याआड होत चालला आहे. भारतातल्या आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात असे विविध लोककला सादर करणाऱ्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. ह्या लोककलांनी मराठी जीवन, आपली संस्कृती समृद्ध केलेली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा प्रकारचे खेळ, या कला लोप पावत चालल्या. आणि २०२० पासून लॉक डाऊन चा काळ चालू झाला आणि या सगळ्याला पूर्णविरामच मिळाला.

गावात डोंबाऱ्याचा खेळ आला म्हणजे आजच्या युगातले इंटरनेट नसतानाही कानोकान खबर जाऊन पूर्ण गावभर ही बातमी पसरायची. आणि लहान मुले, मोठ्यांसाठी ही पर्वणीच असायची. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे तारेवरची कसरतच. ज्याप्रमाणे आजकल सिनेमा बनवण्यासाठी तात्पुरते सेट उभारले जातात त्याचप्रमाणे त्यांचा तो temporary सेटच असायचा. दोन्ही बाजूला दोन दोन बांबू लावून त्याला मध्ये टेकू लावून एक आडवी दोरी घट्ट बांधलेली आणि त्या दोरीवर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. असा हा सर्व प्रकार असायचा. भटक्या जमाती पैकी ही एक जमात. गावोगावी खेळ दाखवून पोट भरणे हाच त्यांचा व्यवसाय. मोटार गाडी त्यांना माहीत नसायची. एका गावापासून दुसऱ्या गावाला चालतच जायचे. त्यांच्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख आपल्या बनियानला पडलेले भोक लपवत ती त्याची स्त्री अंगावर जीर्ण झालेले पातळ नेसलेली, बोटाला धरून एक लहान मुलगी. तिच्या अंगावर गावातल्या बाया-बापड्यांनी दिलेली आणि मिळाल्यावर वापरून वापरून फाटकी तुटकी झालेली परकर पोलकी किंवा फ्रॉक अन् डोक्यावर विस्कटलेले केस असायचे. कडेवर एक २-४ वर्षाचे मूल. त्याचं ते रडके तोंड, भुकेने व्याकुळलेला त्याचा चेहरा, मळके कपडे आणि आता दहा मिनिटात आपण गावात पोहोचू असा त्याला धीर देणारी त्याची ती आई. तिच्या काखेमध्ये एक छोटेसे डमरू, हातात एक लहान एक मोठी अशा २ रिंगा. बापाच्या काखेमध्ये २-४ फाटक्या वस्त्रांची झोळी, चार-पाच चिरलेली, खोंबलेली, सतत चहा उकळून काळीकुट्ट झालेली एक-दोन पातेली... कारण परिस्थिती नुसार कधी पैसे नसले तर चहा वरच एकवेळ गुजराण करणारी अशी ही जमात. रोज एक नवीन गाव अशी यांची फिरस्ती. अंगावरच्या कपड्या प्रमाणे त्यांच्या आयुष्याची ही लक्तरे झालेली. पण ते कुठून आले हे मात्र कधी कोणाला कळत नसे.

ती सात-आठ वर्षाची लहान मुलगी हातात काठी घेऊन त्याच्याने स्वतःचा तोल सावरत त्या दोरीवरून चालत असे आणि तिची आई डमरू वाजवत असे. त्यानंतर त्या काठीच्या आधारे खाली उतरून ती रिंग पायांमधून हातांमधून सराईतपणे काढून दाखवायची. त्या रिंग मधून गोल गोल रिंगण घालत फिरायची पण तरीही ती पडत नसे. असे सर्व खेळ पाहण्यात छोटी मुले रमून जायची. आणि आनंदाने टाळ्या वाजवायची. प्रेक्षक मुलांना ते पाहून नवल वाटायचे तर त्या मुलीला ही मुले किती छान छान रंगीबेरंगी नवनवे कपडे घालून फिरतात याचे नवल वाटे. खेळ झाला की पाहणारी छोटी मुले रुपया- दोन रुपये हातावर टेकवायची.

वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी रणरणत्या उन्हात वणवण भटकताना हे डोंबारी दिसत. आज जागतिकीकरणा मुळे अशी कित्येक कुटूंबे उघड्यावर पडली आहेत. अशी भ्रमंती करणारे हे लोक माणूस म्हणून जगण्यासाठी धडपड करत आहेत. आजकालच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना फक्त मोबाईल वरचे गेम्स माहित असतात. त्या गेम्स मध्ये ह्या डोंबाऱ्याच्या खेळाची मजा कुठे...!! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract