जन्म... खेळ अधांतरीचा
जन्म... खेळ अधांतरीचा
जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नाही. ते त्या परमेश्वराच्या अधीन आहे. या जगात अशी एकही गोष्ट नाही कि ती त्याच्या इच्छेने चालत नाही. मग जन्म आणि मृत्यू हे तरी त्याला अपवाद कसे असू शकते. असे म्हटले जाते की आपल्या पूर्व कर्मानुसार आपल्याला जन्म मिळत असतो. आणि हे जरी खरे असले तरीही या पूर्वजन्माचे ज्ञान कोणाला असते हो... इतके महान तर आपण नक्कीच नाही. आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा वाईटातून काहीतरी चांगले शोधायचा प्रयत्न करा.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती-धर्मात व्हावा, माझे आई-वडील कोण असावेत हे माझ्या हाती नाही. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. संन्यासाची मुले म्हणून हिणावून त्यांना समाजाने वाळीत टाकले. पण अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःला, आई-वडिलांना, समाजाला दोष न देता जे मिळाले आहे त्याचा मोठ्या मनाने स्वीकार केला. त्या वाईटातूनही त्यांनी चांगलाच विचार केला. मी स्त्री व्हावे की पुरुष, माझ्या शरीराची ठेवण, माझे सर्व अवयव हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळाले आहे त्याची योग्य निगा राखणे हे माझ्या हाती आहे.
हा विचार ज्ञानेश्वरांनी केला. अन् याच विचारांमुळे ही थोर विभूती आपल्याला लाभली. ज्ञानेश्वर महाराज जर हा विचार करत असतील तर आपल्यासारखे पामर नकारात्मक विचार का करतात? स्वतःचे रंग रूपाचा का तिरस्कार करतात... अहो... ज्याला हात नाही तो जर सुंदर चित्र रेखाटू शकत असेल, ज्याला पाय नाही तो जर कळसुबाईचे शिखर सर करत असेल, ज्याला डोळे नाही पण तो या सृष्टीचे सुंदर वर्णन करू शकत असेल, जो कानाने बहिरा आहे तरीही आपण सर्व सकारात्मक आणि सुमधुर ऐकतो आहे असा विचार करु शकत असेल तर तुम्ही आम्ही जे नाही त्याचा का विचार करतो..?? एकदा डोळसपणे विचार करा... आपल्याला तर त्या भगवंताने सर्व काही सुस्थितीत बहाल केलेले आहे आणि तरीही आपण निराश हतबल होऊन जर या नशिबाला दोष देत असू तर डोळे असून आपण आंधळे आहोत.. पाय असून पांगळे आहोत... कान असून बहिरे आहोत... नाही का? कारण आपण या वरकरणी दिसणाऱ्या नश्वर शरीराला जास्त किंमत देऊन आपल्या आतील स्वत्वाला ओळखलेच नाही. जोपर्यंत ती दृष्टी आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण आंधळेच आहोत. अहो... येशी उघडा अन् जाशी उघडा... काय घेऊन आलास अन् काय घेऊन चाललास.... कितीही माझे माझे केले तरीही सुईच्या अग्रावर मावेल इतकी ही जमीन आपण या जगाचा निरोप घेताना घेऊन जाऊ शकत नाही. म्हणूनच हा सर्व खेळ अधांतरीचाच आहे. जीवन म्हणजे सारीपाटाचा मांडलेला डाव आहे.. आपण आनंदाने मनसोक्त ठेवून मोकळे व्हायचे. जिंकणे हरणे हे आपल्या हातात नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते...
तुझ्याच जवळी असूनी वेड्या व्यर्थ प्रयास कशाचा.....
