STORYMIRROR

Jayshri Dani

Abstract Tragedy Classics

3  

Jayshri Dani

Abstract Tragedy Classics

तस्बीर

तस्बीर

7 mins
136

पोटात थोडे कुटकूट व्हायला लागल्यावर ती जरा अस्वस्थ झाली.लग्नघरी नळाला पाणी नाही हे तिला माहिती होते. रिकामी झालेली वरची टाकी भरायला साधारण पाऊण तास तरी अवकाश होता. टॉयलेटला जायचे कसे? दहा पंधरा मिनिटे ती चुळबुळत बसली पण मग न राहवून तिने सीमाला समोरच्या घराबद्दल विचारले.पाहुण्यांना जागा कमी पडायला नको म्हणून समोरच्या घरीही उतरायची सोय केली होती. तिथेही पाणी नसल्याचे परंतु चार घर सोडून आणखीन एक घर घेतल्याचे सीमाने सांगितले.ती तिकडे वळली. 


    गल्लीच्या टोकाला हे दुमजली घर होते.वरच्या मजल्यावर पाहुण्यांची रहायची व्यवस्था केली होती. तिने फाटक उघडले तसे मध्यम उंचीचे एक गृहस्थ सावकाश बाहेर आलेत. इतके सावकाश की संध्याकाळच्या अंधारात तिला ते दिसलेच नसते पण तिचा सिक्स सेन्स इतका जागृत होता की आधी तिला ते आल्याचे जाणवले आणि मग दिसलेत. त्यांची लुकलूक उत्सुक नजर तिला न्याहाळत होती. "काका मी पाठकांकडे लग्नाला आलेय, मी तिकडेच उतरलेय, मला इथला टॉयलेट युझ करायचा आहे, इथे पाणी आहे का?"


"हो", हो म्हणताना ते थबकलेत जरा. तिच्या लक्षात आले ,वर वऱ्हाडी लोकांचे सामान असेल त्यातले काही गहाळबिहाळ झाले तर आधी विचारणा या काकांकडेच झाली असती. तिलाही त्या लोकांचे सामान तिथे असताना त्याच्या माघारी जाणे योग्य वाटत नव्हते पण पोटात फार खळखळत असल्याने तिचा नाईलाज होता. म्हणून त्यांच्या थबकण्याकडे थोडेफार दुर्लक्ष करून ती पायऱ्या चढू लागली.


      पायऱ्या चढताना नेहमीपेक्षा पायऱ्या जास्तच आणि गूढ वाटायला लागल्यात. एक बोगदयासारखा वळसा घेऊन एका मोठ्या हॉल मध्ये पायऱ्या संपल्यात.मागे कोणी आले का , ते काका तर नाहीत म्हणून तिने सरर्कन वळून पाहीले पण जिन्याच्या शांत गूढ पोकळी शिवाय तिथे काहीही नव्हते. तिला उगाचच आई आठवली आणि आईचा राग आला. नाहीतर काय ? असे कुठे एकटेदुकटे जायची वेळ आली की आई प्रचंड भीती भरवायची, "बघ हं, सिनेमा बघायला जातेय, एकटीदुकटी बाथरूमला वगैरे जाऊ नकोस, बदमाश माणसे तिथेही लपून बसलेली असतात, घाला 

घालतात". त्यामुळे आधी बरेचदा ती गरज असूनही आणि मैत्रिणी सोबत असूनही कधी बाहेरचे टॉयलेट बाथरूम वापरायची नाही.किंवा गेली तरी आईने भरवलेली भीती मनात इतकी दबा धरून असायची की सुखासुखी कुठलीच क्रिया घडायची नाही. तिला त्या खऱ्या वाटणाऱ्या भीतीची आणि आईची खूप चीड यायची.


    आताही टॉयलेट मध्ये शिरताना हॉलमध्ये पडलेल्या सामानावरून तिची नजर भिंतीवरच्या मोठ्या तस्बीरीकडे गेली. किमान दहाबारा तरी लोकं त्या तस्बीरीत होते.टॉयलेट मधून निघायच्या आधी तिने मुद्दामच मोठ्याने नळ सुरू ठेवला म्हणजे खोलीत कोणी असेल तर त्यांना ती अजून टॉयलेटमध्येच आहे असे वाटावे , जेणेकरून आई सांगायची तसे कोणी दबा धरून झडप घालणार नाही. खरेच का कोणी आपल्यावर असे अटॅक करणार आहे का? मनातल्या विचारांनी त्रासून ती चडफडली पण खोलीतले एकटेपण जाणवून घाबरलीही. तिने प्रयत्नपूर्वक निक्षून खोलीत पाहीले, ते खालचे काका आहेत का कुठे लपून असेही शोधले. खोलीत खरेच कोणीच नव्हते. मग खोलीत कोणी आहे असे आपल्याला का वाटतेय सारखे ?


      तिथल्या गूढ हवेने ती सटपटली. टॉयलेटचे ओले हात तिने दारावरच्या पडद्यालाच पुसले. एकदम तस्बीरीतील सर्वात पोक्त स्त्रीने रागवल्यासारखे पाहिले असे वाटले तिला. तिनेही भीतीला बाजूला सारत तस्बीरीकडे पाहिले. एक रागीट पुरुष,त्याच्या शेजारी आताची रागवलेली स्त्री, मग पुन्हा एक चेहरा, मग पुन्हा एक चेहरा ,असे मिळून बारा जण.बरोबर एक डझन चेहरे होते. काही लहान मुले. दोन सुना असाव्यात पण रागाने पाहणारे जोडपे खूप वयस्क वाटत नव्हते. जावू दे भावजयी असाव्यात. पण रागाने का पाहताय हे आपल्याकडे? ओहsss हे यांचे घर असावे आणि टॉयलेटचे हात पडद्याला पुसले ते त्यांना पसंत आले नसावे. तिने रागाने पाहणाऱ्या स्त्रीच्या फोटोकडे पाहिले . त्या डोळ्यात बरीचशी करुणा गोळा झाली होती. फार भोगले असावे आयुष्यात. तिच्याजवळचा माणूस अतिशय जरबेने बघत होता. याने छळले असावे का हिला? तिच्या समोर सतत भयाने दाटलेली तिची आईच आली. कोणाला तरी कडेवर घेऊन या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत जीव लपवणारी.


       कोण आहेत या सगळ्या स्त्रिया ज्या आपल्या आईसारख्याच दिसताहेत बऱ्याचशा. मग तिने छोट्या मुलांच्या फोटोंकडे पाहिले, त्यांच्याही बालसुलभ डोळ्यात आंनदापेक्षा दुःखाचेच कण अधिक साचले होते. आपलेही लहापणचे फोटो असेच दु:खमग्न असावेत का?तिने त्या पोक्त स्त्रीकडे पुन्हा एकदा पाहिले, डोळ्यातील बाहुलीत आईच दडून बसल्यासारखा तिला भास झाला.आता तरी आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल का आपल्याला?  


     त्या दुपारी आई जळत होती. बाबा तिला विझवायचा प्रयत्न करत होते. ती भेदरून ते दृश्य पहात होती म्हणूनच बाबा मधूनच तिच्या लहानग्या भयकंपीत डोळ्यांवर बोटे ठेवून नजर झाकायचा प्रयत्न करत होते. तरी बोटांच्या फटीतून तिला आगीत लपेटलेली आई दिसत होती.का जाळून घेतले असावे आईने त्यावेळी? नशीब आपले वाचली ती पण तिच्या नाजूक कुडीवर अनेक ठिकाणी जळल्याच्या मोठ्यामोठ्या खुणा उमटल्या होत्या. त्यानंतर खूप वेळा तिने आईला ,वडिलांना घरातल्या इतरांनाही याचे कारण विचारले होते पण सारे विषयांतर करून टाके.


     मग ती तस्बीरीच्या दुसऱ्या टोकाकडे आली.काय आश्चर्य आता ती पोक्त स्त्री जराशी हसत होती.तिलाही बरेच वाटले ,आपली आई हसल्यासारखे. तिने बाकी मुलांकडे पाहिले नाही परंतु ते ही हसत असावे अशी तिची खात्री पटली. एकदा आईच्या नकळत आई मधल्या खोलीत लोटली असताना तिने आईच्या गोऱ्या गरगरीत पोटावर भोवरा फिरवला होता त्यावेळी गुदगुली लागून आई खूपशी हसली होती. तिला खूप छान वाटले होते. एरव्ही आईच्या गाईसारख्या मोठ्या डोळ्यात पाणीच साचलेले असे. इतरवेळी तिला रडताना बघून बाबा काही म्हणायचे नाहीत पण संध्याकाळी मात्र टोकायचे, दिवेलागणीला काय रडतेस ग ? चल उठ काम कर ,त्यांचा नेहमीचाच आग्रह असायचा.


       खोलीतली शांतता , तस्बीरीतल्या चेहऱ्यावरचे गूढ जसजसे वाढायला लागले तसतशी ती गळाठली. तडक बाहेर आली.

पहारा दिल्यासारखे ते काका तिथेच दिवाणावर बसले होते.कुंडीतल्या झाडांमधून मुश्किलीने ते दिसले. मघासारखेच सावकाश उठले.पुन्हा तिच्याकडे तसेच अतिशय निर्मळ लुकलूक पहात होते. तिने मुद्दाम हात झटकलेत जेणेकरून त्यांना वाटावे बघा बॉ आपण खोलीतले काहीच उचलले नाही.


"काका थँकू यू हं ,येते मी " ती निरोपाचे बोलली. त्यांनी मान डोलवली. तिने फाटक लावले. फाटकाजवळ तस्बीर आठवून तिची हालचाल मंदावली.आईच्या जीवनासारखेच अनेक प्रश्न,अनेक भय तस्बीरीत होते.कुठलेच उत्तर नाही काही नाही.सगळे कसे निरुत्तर,


अनाकलनीय.


"काका "


ती थांबली. पण काय नेमके विचारावे कळेना, त्या तस्बीरीबद्दल विचारावे तर ते साधे उत्तरच देतील ना घरमालकाची आहे वगैरे.यातून आपल्याला आईच्या भयाचे रहस्य कसे उलगडणार ? थांबण्यातली निरर्थकता जाणवून ती वळली परंतु तिचा हात काही हलेना.पाहिले तर त्या काकांनी हातावर जोर देऊन हात ठेवलेला. हे इतक्या जवळ कसे आले? इतके आपण आपल्या विचारात होतो का? त्यांचा स्पर्श मात्र स्वच्छ असल्याने ती चुळबुळली नाही.उभी राहिली तशीच.


"दिराने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला होता ग त्या बाईंवर" 


ती खळळकन फुटलीच.यांना कसे कळले आपल्याला काय उत्तर हवे ते.


     तिच्या डोळ्यासमोर झरझर आई, आईचे जळणे, वडिलांची आग विझवायची धडपड, आजी आजोबांचे केविलवाणे हात जोडणे आणि पशाकाकाचे घाईघाईत सिगार तोंडात ठेवून बाहेर पडणे आले. त्यानंतर पशाकाका विलायतेवरून कधीच घरी आला नव्हता. ती किती वाट पहायची आधीही ,नंतरही. तो किती जॉली, आंनदी होता.त्यांनतर पशाकाकाबद्दल कोणीही मोठे बोलायचे नाही . ती आणि तिच्या भावंडांनी विचारले तर टाळून द्यायचे सगळे तो विषय. 


     पशाकाका आणि आईवर ???  


तिला भोवळचं आली. छे, छे....हे या इथल्या बाईंबद्दल सांगताय ,आपल्या आईचा काय संबंध इथे? 


"झाला नाही ना पण काही वाईट प्रसंग काका ?" 


तिने चाचरत विचारले. आता आपल्या प्रश्नाचे उत्तरच मिळत आहे तर पूर्णच मिळावे मग. 


"नाही , पण मनाला डाग लागलाच ना , मन महत्वाचे नाही का?"


तसबीरीतील त्या स्त्रीवरचे संकट टळले म्हणून आश्वासक व्हावे की निराशेने काळवंडावे तिला कळेना.आणि इथे या दूरच्या गावात या लग्नात आपल्याला मनात साठलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यासारखे वाटावे हे सगळे कसे काय तिला आकळेना. ती स्तब्ध चालत आली लग्नघरी. मेंदीचा कार्यक्रम सुरू होता. दणदण लगबग सुरू होती. मेंदीचा सुवास घमघमला होता. 


""काय ग पोट अजून दुखतच आहे का ?" सीमाने तिला पाहून विचारले.


"नाही"


"मग चेहरा का उतरलाय?"


"नाही ग कुठे काय? बरं सीमा, ते कोपऱ्यावरचे घर कुणाचे गं ?"


"देशमुखांचे,का ग ?"


"नाही ते काका होते तिथे बसलेले ,चांगले वाटलेत"


"काका? अ..…., देशमुख इथे नाही राहत म्हणून तर आपण घर घेतले ना पाहुण्यांसाठी, ह , त्यांचे मित्र येतात संध्याकाळी पण ते ही आज कॅनडाला जायचे होते, तुला दिसलेत का?"


"हो "


"कसे काय दिसलेत की दातारकाका, त्यांना तर एअरपोर्टवर लवकर जायचे होते "


"दातारकाका ?"


"हो प्रशांत दातार ,ए तुझे कोणी होतात का ते ? तू ही माहेरची दातार ना , नसतील. नाहीतर त्यांनीही ओळखले असते ,पंधरा दिवसांपूर्वी मी त्यांना बोलले होते माझी एक मैत्रीण भुसावळ वरून येतेय ती ही दातार आहे म्हणून "


"अ...."


"बरं चल तू मेंदी काढून घे आता दोन्ही हातावर , बरं वाटतंय ना ?"


     सीमा वळल्यावर ती पुन्हा झपाट्याने बाहेर आली आणि देशमुखांच्या घराकडे सरकली. बरेच, बरेच काही आठवत होते तिला. त्यांच्याकडे लँडलाईन आल्यावर आजी सर्वांच्या नकळत हळूहळू कुणाशीतरी फोन वर बोलायची.डोळे टिपायची, "कोण माफ करणार रे तुला, घात केलास ना तू अविचाराने...."


असे काहीबाही शब्द तिच्या कानावर यायचे.


एकदा तिचे नावही आजीने घेतल्याचे ऐकू आले होते तिला, "बाबी ना अगदी तिच्या आईसारखी दिसते, सारखी विचारते कशी जळली आई म्हणून ? तुझे नावच टाकलेय साऱ्यांनी पशा "


       "पशाकाकाssss तूच आज सांगायला आलास तुझी करणी ", अत्यंत संतापाने ती पुटपुटली.आता तो तिथे असणार नाही, दिसणार नाही हे उमजूनही ती तिथपर्यंत गेली. घराच्या फाटकाजवळ तिला एकदम त्या गृहस्थांचा मायाळू स्पर्श आठवला. पशाकाकाचे वात्सल्य खरे की तारुण्याच्या उन्मादात न आवरू शकलेली वासना खरी ; तिला मोठा संभ्रम पडला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract