निलमोहर
निलमोहर
ती हॉस्पिटल बाहेर पडली. रिकाम्या रस्त्यावर आली. रात्रीचे साडेनऊ वाजले होते. वर्दळ कमी झाली होती. एखाददुसऱ्या वेगात जाणाऱ्या वाहनाचा झुईककन वारा लागायचा. तिला तेव्हढेच बरे वाटायचे. आत हॉस्पिटलमध्ये बसून गर्मीने तिचा जीव कातावला होता. इतके पैसे घेऊनही इथे एसी कसा नाही हा प्रश्नच तिला पडला होता. बाजूला बसलेली बहीण किमान सतरा अठरा वेळा तरी गरम होतेय गरम होतेय असे म्हणाल्यानंतरही ती केवळ एकदाच "हो ना" असे पुटपुटली होती.
बहिणीला लग्नाच्या वेळी सासरच्या मंडळींनी दागिन्यांनी लदबदून टाकल्यानंतर बहिणीचे माहेरच्या लोकांशी बोलणे मोघम मोघम होत चालले होते. तिच्याशी तर अधिकच त्यामुळे तीही आजकाल फारशी बोलतच नसे. म्हणूनच घरी जाण्यासाठी "एकटी जाशील ना तू?" असे बहिणीने विचारल्यावर तिचे बहिणीच्या भल्या मोठ्या चारचाकीकडे लक्ष जाऊनही ती 'हो' म्हणाली. परंतु मनातून तिला खूप आश्चर्य वाटत होते. इतर लोकांना ती बघत असे त्यावेळी याचा तो, त्याचा तो असे कुणीही कुणाचे दूरचे नातलग असले तरी पटकन एकमेकांना सोडायला आणायला तयार होई.
तशी बऱ्यापैकी रात्र झाल्याने आईकडे एकटे जावे का या विचाराने ती जरा गडबडली. कारण आईचे घर दूर होते. तिची दुचाकी तिथे अडकल्याने तिला जाणेही भाग होते. गाडीशिवाय सगळे कामं अडणार. ऑटोरिक्षा, टॅक्सीत असे किती पैसे घालणार? वडिलांना हॉस्पिटलमध्ये भरती केलेले, लवकर डिस्चार्ज होईल असे वाटत नव्हते. घरून येणेजाणे करायला गाडी आवश्यकच होती. मघाचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर तरळला.
वडिलांना ऍडमिट करायचे आहे, बीपी फार लो झाला, असे जेव्हा आईने फोनवर सांगितले तेव्हा तिची भंबेरीच उडाली. गाडीचा समोरचा लाईट सुरू होत नसतांनाही तशीच गाडी चालवत जलद गतीने आईकडे पोहोचली. वडिलांची स्थिती नाजूक होती. ऍम्ब्युलन्स आलीच होती. बहीण, तिचा नवरा कारमध्ये बसल्याने ती ऍम्ब्युलन्समध्ये बसली. आणि मग सुरू झाला रो रो घोंघावणारा प्रवास. आईचे घर मुख्य शहरापासून लांब असल्याने हॉस्पिटलला पोहचायला वेळ लागणार होता.
आतापर्यंत कित्येकवेळा रस्त्यावरून जाणाऱ्या ऍम्ब्युलन्स तिने पाहिल्या होत्या. त्यातील पेशंटला लवकर बरे वाटू दे म्हणून तिने हातही जोडले होते. तिचे बघून तिची मुलगीही तसेच हात जोडायला शिकली होती. आपल्यालाच कधी ऍम्ब्युलन्समध्ये बसायची वेळ येईल असे तिला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. रस्त्याने जाणाऱ्या ऍम्ब्युलन्स, त्यावरचे गोल गोल फिरणारे लाल दिवे पाहिले की तिला दचकल्यासारखे, घाबरल्यासारखे होई. पण ते घाबरे भाव ती हृदयापर्यंत पोहचू देत नसल्याने थोड्यावेळातच तिची मनस्थिती पूर्वपदावर येई.
आपल्या ऍम्ब्युलन्सचा आवाज येत नसल्याचे तिच्या लक्षात आले. विचारावे का ड्रायव्हरला असेही वाटले. परंतु ही काय असले वायफळ बोलायची वेळ आहे का असे म्हणत तिने मनाला दटावले. चारपाच बारक्या बारक्या गल्ल्या पार करून ऍमब्युलन्स हमरस्त्याला लागल्यावर ती इतरवेळी पहात असे तशी रो रो आवाज करत गर्दी चिरून धावू लागली. तिला बरे वाटले. आज तीही त्या गर्दीचा एक अति वेगवान भाग झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य तिच्या मनात अधिकच वाढले. डगडगणाऱ्या वडिलांना तिने हाताने आधार दिला.
वडिलांना भरती करून दोनेक तास झाल्यानंतर तिने घरी जायचा विचार केला. रात्री बहीण व तिचा नवरा इस्पितळात थांबणार होते. इतक्या लोकांची तशी तिथे आवश्यकता नव्हती. वडील आयसीयूतच होते. घरी जाऊन सकाळी लवकर यावे म्हणजे बहिणीला घरी जाता येईल, असे आळीपाळीने थांबायचे त्यांनी ठरवले. एकटीदुकटीने ऑटोरिक्षात बसण्यासाठी तिच्या मनात धाकधूक होतच होती. पण तेव्हढा निवांतपणा आपल्याला हवाय हे लक्षात आल्यावर तिने निघायचा निर्णय घेतला.
खूप बरे वाटत होते तिला निर्मनुष्य रस्त्यावर. पितृपक्ष संपत आल्याने हवाही जरा गारसर होती. अडीच पावणे तीन तासापूर्वी याच जागेवर तिला पियुषच्या मित्राने पैसे आणून दिले होते. घाईघाईत ऍम्ब्युलन्समध्ये बसताना ती पर्स आईकडेच विसरली होती. हॉस्पिटलमधील रिसेप्शनवर फॉर्म भरताना तिला एकदम पैशाची आठवण आली. बहिणीजवळ होते पण आपल्याही जवळ असू द्यावे असे तिला वाटले. काही लहानसहान औषधे, सलाईनच्या बाटल्याच आणाव्या लागल्या तर? कुणाला मागावे? कुणाला मागावे? नवऱ्याची आठवण आली, नाही असे नाही, पण त्याहून जास्त तो देणारच नाही, बहाणे सांगेल, कारणे सांगेल याचीच खात्री जास्त असल्याने तिने तो विचार झटकला. त्यासरशी एकदम आठवला तो पियुष !
नुसत्या नावानिशीच कितीतरी तारा झंकारल्यात. एकमेकांना अनुरूप, एकमेकांना पसंत असूनही निव्वळ कर्मठ आत्यापायी न झालेले त्यांचे लग्न म्हणजे तिच्या अंतःकरणावरचा दुखरा घाव होता. घरात आत्याचा वकुब मोठा. तिचा शब्द प्रमाण. जातीबाह्य पियुष केवळ तेव्हढ्या कारणाने नाकारल्या गेला. लग्नानंतर पियुषच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त झाल्यात. त्या पुन्हा उफाळून वर आल्यात जेव्हा तिने पियुषला तिच्या गावात नोकरीनिमित्त बदलून आल्याचे पाहिले तेव्हा. तोवर अठ्ठेचाळीस वर्षाची झाली होती ती. मुलगी चोवीस वर्षांची. मुलगा वीस. काय बोलणार भेटल्यावर? डोळ्यांत उमटणाऱ्या भावनांना पुन्हा ताब्यात ठेवले. जुजबी बोलून निरोप घेतला.
आज अचानक आठवण वर आली ते जवळ पैसे नसल्याचे जाणवल्यावर. इथून त्याचे ऑफिस जवळच होते. निदान पाचशे रुपये तरी त्याच्याकडून मागून घ्यावे. चार दोन दिवसात परत करता येईल. तिने त्याला फोन लावला. नेमका त्या दिवशी तो सुटीवर होता. कसे सांगावे म्हणून ती घुटमळली. पण त्याने बोल गं म्हणून आग्रहच धरल्यावर ती अजिबात मागच्यासारखी चूप बसली नाही. वडिलांना ऍडमिट केलेय नि ती पर्स घरी विसरलीय हे तिने श्वास सोडायच्या आतच सांगितले. थांब मी लगेच सोय करून देतो तुझी तो म्हणाला. सोय शब्द फार खटकला तिला. आजपर्यंत सगळ्यांनी तिची सोयच तर करून दिली होती पुढील आयुष्य चांगले जावे म्हणून. खाण्यापिण्याची, पैशाची, जातीतल्या मुलासोबतच शरीरशय्या करण्याची. यात प्रेमाचा भाग फारच विरळ होता. पियुषने तरी निदान सोय करू नये तो स्वतः यावा असे तिला वाटत होते. पण त्याच्या पाठी त्याच्या बायको मुलांचे आवाज तिला ऐकू आल्याने कदाचित इच्छा असूनही तो यावेळी येऊ शकणार नाही याची बोचरी जाणीव तिला कुरतडत राहिली.
पंधरा वीस मिनिटांच्या आतच त्याचा मित्र पैसे देऊन गेला तेव्हा तिने पुन्हा एकदा त्याला 'थँक्स' चा फोन केला. केव्हाही फोन कर हे त्याचे वाक्य तिच्या मनात फुलपाखरासारखे भिरभिरत राहिले. हातात पियुषचे पैसे असल्याने तिने कॅबने जायचा निर्णय घेतला. आहाsss गारेगार कॅब. तितके सुख आज ती उपभोगणार होती. अगदी हक्काने. पियुषच्या पैशावर तितकासा तरी आपला अधिकार आहे असे तिला अद्यापही वाटत होते. कॅबमध्ये बसल्यावर परत एकदा पियुषला फोन करायचे तिने निश्चित केले. त्याच्याशी प्रियाराधन सुरू असतानाही याच्यात्याच्या धाकापायी ती त्याच्याशी कधीच मोकळेपणाने बोलली नव्हती. ते अधुरे भाव याक्षणी बोलून मोकळे व्हायचे. आधी सुरुवात साध्या साध्या वाक्यांनी करायची. पत्नी निकट नसल्याचा अदमास आल्यावर त्याला मनातले बोलायची परवानगी मागून मनात साचलेले सारे सारे सांगायचे तिने पक्केच केले. किती दिवस मन मारून ती तिची हानी करून घेणार?
पियुषशी बोलताना तिला आयुष्यभराची शीतलता लाभणार होती. मनाचा कायम होत असणारा दाह शमवायचा होता. त्याच्याशी बोलणे आवश्यक होते. त्याला त्याचे डोळे किती सुंदर आहेत हे त्यावेळी सांगायचे राहूनच गेले होते. त्या डोळ्यांत तिला तिची नाव घेऊन वल्हवायचे होते. दुसऱ्या मुलाशी तिचे लग्न ठरवल्यानंतर पियुषसोबत पळून जायला ती रात्री दाराची कडी काढायला आल्यावर त्या सुनसान समयी आत्याबाईने तिच्या पायावर कसा जोरात बांबूचा बासडा मारला नि तार स्वरात किंचाळत पूर्ण घर गोळा केले, ते सारे कथन करायचे होते. तिचा त्यावेळी कळवळलेला जीव अजूनही कसनुसा होत होता. सारे सारे तर ताजे होते मनात अजूनही तसेच. कुठे काय बदल झाला होता? हे त्याला कळायला नको? ती ठरल्या वेळी आली नाही म्हणून निराशेने गाव सोडून निघून गेलेला तो आत्ता इतक्या वर्षांनी गवसल्यावर त्याला कमीत कमी काहीतर खरे कळावे?
आतल्या आत ती एकेका वाक्याची मांडणी करत होती. तसे नीट घडी घालून सगळे वाक्य होतेच आत पण आधी कुठली घडी मोडावी यात तिने पाच दहा मिनिटे घालवली. खूप छान वाटत होती तिला ही सगळी प्रक्रिया. बऱ्याच, बऱ्याच वर्षानंतर गालावर हसू खेळत होते. अर्थात या हसण्याचा पोत प्रगल्भ होता म्हणा. नाही म्हणायला काही जुन्या चुकार छटा आल्या असाव्यात त्यात. कारण सोबतीला डोळेही हसायला लागले होते. आईच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हा किंमती वेळ तिला पियुषच्या सानिध्यात घालवायचा होता. मग ते सानिध्य संवादरूपी का असेना तिला पर्वा नव्हती.
ती अधीर झाली होती. अधमुख झाली होती. लवकर कॅब यावी, आपण त्यात गडप व्हावे नि मनाचा वारू पियुषवर उधळावा म्हणून तिने तातडीने पर्समधून मोबाईल काढला. ओला, उबर दोन्ही ऍप मोबाईलमध्ये दिसले. तिने उबर उघडला. बिल कमी येतं मुलीने सांगितले होते. तोच तिचा फोन वाजला. बहिणीचा नंबर दिसत होता. काय झाले? वडिलांना काही झाले असावे का? ती धसकलीच. आई वडिलांची वृद्धकोमल अवस्था बघून, तिचा, जबरदस्तीने तिचे दुसरीकडे लग्न लावल्याचा त्यांच्यावरचा राग कधीचाच गळून पडला होता. वडील सुखरूप असू दे अशी मनातल्या मनात करुणा भाकत तिने फोन उचलला.
"कुठे आहेस तू?" बहिणीने विचारले.
"का गं? मी इथेच हॉस्पिटलच्या गेटजवळ आहे, काय झाले? येऊ का तिथे?"
"नको. काही झाले नाही. बाबा ठीक आहे. महेशचा फोन होता, तुला घ्यायला येतो म्हणालेत. कॅब नको करू तू येईलच ते इतक्यात."
तिच्या चेहऱ्यावर एकदम आंबटपणाच आला. थिजलीच ती. हे काय मध्येच घडले अकल्पित? तिची ती जाणार होती ना व्यवस्थित? महेशला कुठून सुचले एकाएकी तिला घ्यायला यायचे? महेशला सुचले की सुचवल्या गेले? तिच्यासमोर बहिणीच्या नवऱ्याचा चेहरा आला. औषध आणायच्या निमित्ताने बाहेर गेल्यावर त्याने महेशला फोन केला असावा. रात्रीच्या वेळी एकटीदुकटी जाणार ती. काही झाले तर उगाच त्यांच्यावर ठपका नको असे वाटले का त्या दोघांना? चिडलीही ती. अस्वस्थ झाली पुष्कळ. किती छान मुलायम प्लॅनिंग केले होते तिने. साऱ्या योजनेवर पाणी फिरले. चडफडत ती उभी राहीली तशीच. दूरवरून धडधडत महेशची जुनाट सुझुकी जवळ येऊ लागली तसे तिचे सारेच मनसुबे कोसळले. हताश होऊन ती महेशच्या मागे बसली. पुनःश्च एकवार ती विरुद्ध अनेक या युद्धात तिचा सपशेल पराभव झाला होता.
ती सोबत असताना महेश अतिशय अस्थिर मनाने गाडी चालवतो की तो एरव्हीही तसाच चालवतो हे तिला अजूनही माहिती नव्हते. पण त्याच्यामागे बसताना तिला खूप असुरक्षित वाटे. त्याने एक्सीलीरेटर अकारण वाढवल्यावर आपण मागच्या मागे पडतो की काय अशी प्रचंड धास्ती असे. म्हणून बरेचदा ती त्याला चारचाकी घ्यायचा आग्रह करी निदान त्या चौकोनी डब्यातून खाली पडायची तर भीती नसे. पण त्या अति जुन्या गाडीला काढायला तो सतराशे साठ कारणे सांगे. पेट्रोल नाही, ब्रेक खराब आहेत, हॉर्न वाजत नाही. या विनाकारण निर्माण केलेल्या नाही नाहीच्या मालिकेला ती पुरती कंटाळली होती. कधी तर काही सहज साधे विनासायास मिळावे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीसाठी का संघर्ष?
याक्षणी तर तिला न सांगता, न विचारता महेशला बोलवले म्हणून ती चांगलीच तडतडत होती. तिला तिच्या आयुष्यातला एक मुलायम क्षण अगदी मन लावून जगायचा होता. खूपशा आत्मीयतेने पियुषशी वार्तालाप करायचा होता. ओहोssss ते निलमोहराचे झाड लागले. मोठ्या प्रशस्त चौपदरी रस्त्यावरचे हे झाड तिला फार आवडायचे. एकदा पाऊस आला म्हणून ती त्या झाडाजवळच्या शेडखाली उभी होती. पूर्ण आभाळ करडे झाले होते. आसपासचा परिसरही तसाच करडा दिसत होता. त्या पार्श्वभूमीवर वाऱ्याचा झोत येऊन निलमोहराची जी फुले उडालीत त्याने ती खुळावून गेली. रस्ता निळ्या फुलांचा गालिचा अंथरल्यासारखा दिसत होता. त्यानंतर तिला वेडच लागले ते दृश्य पुन्हा पुन्हा न्याहाळण्याचे. ढग भरून आलेत, पाऊस यायची चिन्हे दिसायला लागल्यावर ती काहीही काम नसताना जमेल तसे उगाच त्या रस्त्यावर फिरून येई. आपण एकदा या झाडाखाली उभे राहून बोलू रे असे तिला पियुषला सुचवायचे होते.
ते झाडही मागे पडले.
ती मागे बसली आहे नाही याची तमा न बाळगता महेशची गाडी पुढे पुढे धावत होती. गड्ड्यागुड्ड्यातून ठेचकाळत होती. तसा धक्का लागला की ती ठसठसणाऱ्या मनाने आधाराला त्याच्या खांद्यावर किंवा कंबरेवर हात रुतवत होती. तो नक्कोसा नक्कोसा झाला होता तिला. वाटेत तिला आवडणारा तलावही लागला. तळ्यातल्या पाण्यासोबत तिचे मनही हिंदकळू लागले. सिनेमात जसे दाखवतात ना शरीरातून शरीराची आकृती विलग होते नि एका जागी थबकते तसे तिच्यातली ती त्या तळ्याजवळ थांबली. गाडी पुढे पुढे, पुढे पुढेच जात होती. ती मात्र पियुषसह तळ्याजवळील बाकावर बसली होती.
पूर्वीसारखा प्रेमालाप नव्हता घडत आता त्यांच्यात पण मॅच्युअर्ड काही, एकमेकांना समजून घेणारे बोलणे सुरू होते. स्पर्शही नव्हते करत ते एकमेकांना, गरजही वाटत नव्हती तशी, उलट अंग चोरुनच घेतले होते दोघांनी होईल तितके पण तरीही ते एकमेकांचे आहेत हेच सिद्ध होत होते. पैंजणातल्या घुंगरुसारखे छणछण वाजणारे पाणी रात्रीच्या काळोखात अधिकच चमचमत होते. काही तुरळक जोडपीही तिथे स्वांतसुखाय बसली होती. या लोकांना कसे इतके सुंदर जगणे जगायला जमले? मनात उठलेल्या प्रश्नासरशी तिने गाडी चालवणाऱ्या महेशकडे पाहिले. परिचयाच्या कुठल्याच खुणा तिला त्याच्या पाठमोऱ्या शरीरात आढळल्या नाहीत. तिने चटकन त्याच्या खांद्यावरचा हात काढला.
तळेही मागे पडले.
आईचे घर आले. मी बरोबर एकटी येणार होते ना? महेशला कुणी घ्यायला पाठवले म्हणून तिला आईला जाब विचारावासा वाटला. पण वयोमानाने अतिशय पातळ झालेली आईची कुडी पाहून तिला कणव आली. सगळा राग गिळत तिने बाबांना नीट ऍडमिट केलेय, तू काळजी करू नकोस, मी आहे मदतीला म्हणत आईला आश्वस्त केले.
महेश दाराशी थांबलाच होता. तो तिच्यासोबत आहे पाहून आईही निश्चिंत झाली. पदोपदी यांनी सगळ्यांनी आपल्याला महेशसोबत रहायला कसे भाग पाडले, अजिबात माहेरची वाट धरू दिली नाही या कुतरओढीने तिच्या हृदयातली जखम पुन्हा एकवार भळभळली. नकळत तिचा गाडीचा वेग वाढला. गाडीच्या आरशातून मागून येणारा महेश तिला दिसत होता. त्याच्या बरोबरीने बोलत बोलत गाडी चालवावी असे तिच्या मनातही आले नाही.
चंदेरी चंद्रप्रकाशात न्हाहून निघालेले तळे परत दिसले. तिने गाडीचा वेग कमी केला. अचानक मन मोकळे शांत वाटायला लागले. मनातले ओझे शिरवल्या गेले की काय? रेंगाळावेसे वाटले तिथे पण तरुण मुलीच्या आठवणीने तिने गाडी पुढे ढकलली. एखाद्या सौन्दर्यवतीच्या आरशासारखे गावाच्या मधोमध असणारे तळे तिथेच चिपकुन राहिले. ती तळ्यातले तरंग, इवल्या लाटा काही काहीच सोबत घेऊ शकली नाही. घर जवळ आले तसे तिने गाडीच्या आरशातून मागे पाहिले. तिच्या रक्षणाची जबाबदारी व्यवस्थित निभावल्यासारखा महेश तिच्या मागून येतच होता.
निलमोहर खूपच मागे सुटल्याची जाणीव होऊन तिने डोअरबेल वाजवली.
