राधाराणी
राधाराणी
नंतर नंतर तिने त्याच्या दैहिक अनुपस्थितीवर, आसपास नसण्यावर व अभावावरही उत्कट अत्युच्च प्रेम केले असल्याने आताशा तो नजरेसमोर वावरत असूनही तिला पूर्वी मिळे तसे समाधान लाभत नव्हते. असे का म्हणून तीही अचंबित होत होती. शुक्रतारा तेजाळणाऱ्या एका उत्तररात्री मधूकामिनीच्या सुवासिक बगिच्यात तिने त्याला एकांतात बोलविल्यानंतर त्याच्याकडूनच तिला याही प्रश्नाचे समर्पक उत्तर मिळाले. अन् द्वारकेचा तो सुवर्णाने झगमगणारा आलिशान प्रासाद त्यागून ती पुन्हा एकवार वनाकडे निघाली.
जाण्यापूर्वी तिने त्या निळ्यासावळ्या आराध्याला डोळे भरून बघितले. वयाच्या वाढत्या खुणा सोडल्यास फारसा काहीच फरक पडला नव्हता त्याच्यात. तिला गोकुळात एकटे सोडून तो जेव्हा अक्रुरासोबत कंसवधासाठी मथुरेला निघाला तेव्हा जसा मोरपिसापरी कोवळा होता तसाच अद्यापही दिसत होता. त्यावेळी त्याला न्याहाळणारी तिची थरथरती गौरवर्ण नितळ कुडी जशी संपूर्णतः निळी जांभळी झाली होती तशीच आजही झाली. तेव्हा ती जेमतेम पंधरा वर्षांची समर्पित अभिसारीका होती नि तो मनमोहन चुलबुला दहा वर्षांचा बालक.
साऱ्या ब्रह्मांडाचा आत्मा असलेल्या त्या नंदगोपालाचा आत्मा ती होती. ती राधिका. ती प्रेमिका. सगुण-निर्गुण, पारलौकिक, आध्यात्मिक तसेच शृंगाररसयुक्त भक्तीचे प्रतीक. तिचे त्याचे अद्वैत एक झालेले. इतके की अनयच्या दुराग्रही हट्टापायी तिचा विवाह त्याच्याशी होताना विवाहवेदीवर केवळ तिची छाया वावरत होती. गतजन्माच्या कठोर शापाने नपुंसकत्व घेऊन जन्माला आलेल्या अनयला तिच्या सावलीलाही स्पर्श करणे कधीच जमले नाही. ती होतीच जन्मतः विलक्षण मनस्विनी कनुप्रिया. गोपराज वृषभानू व गोपराणी कीर्तीला कमलदळाच्या सरोवरात सरोजपुष्पात लपेटलेली सापडली असतांनाही तिने नेत्र मात्र उघडले ते श्रीहरी सन्मुख आल्यावरचं. तोवर इतरजण तिला जन्मांध समजत तो समज तिने तसाच अबाधित ठेवला.
भव्य रासलीलेचे आयोजन करून कान्हाने तिला प्रेमपूर्वक त्याची प्राणप्रिय बासरी सोपवली त्याचवेळी तिने ही त्यांची शेवटची भेट म्हणून जाणले होते. शेवटची, शेवटची नाहीतरी अति दीर्घ कालावधीची. अष्ट अश्व जुंपलेला त्याचा केशरी ध्वजाचा रथ धुरळा उडवत दिसेनासा झाल्यावर तीही अलगद आपली छाया सासरच्या घरात सोडून घनदाट वनराईत लुप्त झाली. जाऊ शकत होती ती त्या मुरलीधराच्या मागे त्याच्या प्रत्येक तर्काचे मुद्देसूद विश्लेषण करत पण तिने तसे केले नाही. ती त्याची प्रिया, प्रेयसी, मैत्रीण, सखी अन् त्याही पलीकडे जी गुरू होती ते गुरुपद तिला जगासमोर आणायचे नव्हते. तर्क, धर्म, कर्म, तत्वाचा महान प्रणेता असलेला तोच भगवद्गीतेचा रचियेता म्हणून प्रसिद्ध व्हावा अशीच तिची प्रामाणिक इच्छा होती.
त्यासाठी तिने तो असतांनाही, तो नसतानाही कुलटा, व्याभिचारिणी सारखे शब्दकलंक एखाद्या अनुपम जडजवाहिऱ्यासारखे आपल्या व्यक्तिमत्वावर मिरवले होते. फक्त एकदाच यासाठी तिने ऋषी दुर्वासांना स्पष्टीकरण दिले होते, "अहो त्या वनमाळीने मला आपलेसे केलंय, त्या श्यामल अनुभूतीने मी दिनरात घमघमतेय मग या असल्या खोट्या आरोपांची वृथा तमा का मी बाळगू?"
"लग्न का नाही केले बाळ त्याने तुझ्याशी" मुनी आचार्यांचा साहजिकच उत्सुक प्रश्न.
"महाराज, परिणय बंधनासाठी दोन स्वतंत्र जीव लागतात ना"
माधवप्रियेच्या त्या कोमल, करुण, खोलवर रुजलेल्या साध्या भावविभोरतेने ऋषीवरही निःशब्द झाले होते.
अव्यक्तपणे सारी कर्तव्ये पार पाडल्यानंतर इकडे वनात राधा तिकडे घरात राधाछाया शारीरिकदृष्ट्या वृद्ध होऊ लागली तशी तिला गिरधारीच्या दर्शनाची ओढ व्याकुळ करू लागली. न जाणो कधी प्राणपाखरू उडायचे त्या आधी त्या मिलिंदाला उराउरी भेटायला हवे. मनभरून न्याहाळायला हवे. काही काळ त्याच्या संगतीत राहून त्याला प्रत्यक्ष अनुभवायला हवे. तिच्या मनातल्या विचाराचा सुवास दूरवरच्या कृष्णकस्तुरीत भिनता वायूवेगाने तिला द्वारकेत नेण्यात आले. राधा येणार, राधा येणार म्हणून केव्हढा पारिजातकी गंध सुटला होता त्या द्वारकेकडे जाणाऱ्या वाटांना.
सोळा हजार एकशेआठ राण्यांचा नाथ तो, ती काय म्हणून त्याच्या निकट राहणार? तिने त्याचे दासीपद पत्करले. आता सकाळ संध्याकाळ त्याचे अवखळ तसेच दैदिप्यमान दर्शन व्हायचे. सहस्रावधी रयतेचा तो नरेश, द्वारकाधिश अद्यापही तिच्यासाठी तिच्यापुढे तिचा नटखट विरागी, अनुरागी मधुसूदनच होता. परंतु अष्टोप्रहर त्याला नयनांनी बघण्यापेक्षा आतापावेतो ती जे त्याला अंत:चक्षुनी पहात होती तेच ध्यान तिला मानवत होते. तिला या गोतावळ्यात अडकलेल्या पार्थसारथीला बघून ते आंतरिक सुख लाभत नव्हते ज्याची ती खरोखरच धनी होती. मग काय त्या गूढ हसणाऱ्या वैजयंतीमालाधारी नवकोट नारायणाचा अबोल निरोप घेऊन ती पुनःश्च जंगलात आली.
काही काळ उलटल्यानंतर रानावनातील नित्याच्या वृक्षवेलींत अमृतमयी मधुरसर परिमल दरवळू लागल्याचे तिच्या लक्षात आले. तिची कृश काया रोमांचित झाली. डोळे पद्मनाभाच्या आत्यंतिक स्मरणाने डबडबले. वायूकालहरींनी त्या पवित्र नेत्रजलाचा सौरभ केशवासमीप झुळझुळवला. तो परमपुरुष, तो आत्माराम, तो पुण्य पुरुषोत्तम, तो रविलोचन, तो परमात्मा, तो सहस्त्रजित शहारून उठला. शापवाणी विरायचा अंतिम समय आला होता. दोन मने तर मुळातच एकरूप होती पण दोन दोन देहांचे अतुलनीय मिलन होण्याचा काळ उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. शंभर वर्षाचा सोसलेला विरह संपणार होता. ती दुग्धदाणी राधिका अनंतात विलीन होऊन शेषशय्येवर विराजमान होणाऱ्या श्रीविष्णूची वाट बघायला स्वर्गस्थ होणार होती.
राधेने सांगावा पाठवला. नसता धाडला तरी तो श्रीरंग तिकडे यायला निघालाच असता. अखेरचे मनोमिलन होते ते. असा दुर्मिळ सोहळा तो चुकवणार का?
लोकाध्यक्ष प्रजापती आला, प्रजापती आला, अनेक पक्षीगण एकसुरात किलबिलले. राधा हसली. लाजली.
"अखेरची इच्छा सांग परमप्रिये" जगदिशाने राधेला कवेत घेत विनवले. राधेने कटीअलंकारात खोचलेली बासरी सूचकपणे त्या जगन्नाथाच्या हातात दिली. मुरलीरव लेपून घ्यायचाय तर माझ्या सईला परलोकी प्रस्थान करताना....
अहाsss किती वेळ किती वेळ ते अवीट गोडीचे मंत्रमुग्ध मनोरम मंजुळ सूर आसमंतात घुमत राहिले. वृन्दावन सोडल्यानंतर गोविंदाने आताच बासरी ओठांना लावली होती. राधा त्या सुरांच्या बरसातीत नहात होती. भिजत होती. गुणगुणत होती. गात होती. शांतवत होती. सूर तिच्या आरपार झिरपत होते. ती पार चिंबली होती. त्या अपूर्वाईने चराचर स्तिमित झाले. किती क्षण कित्येक दिवस त्या सुरावटीच्या लडीत गुरफटून व्यतीत होऊ लागले पण तो जगन्ननियंता काही थकला नाही. राधेची श्रुतीसहनशीलता संपली नाही. तो अखंड वाजवत राहिला नि ती निस्सीम भक्तिभावाने श्रवत राहिली.
अखेर पंचतत्वात लीन व्हायची घटिका जवळ आली. बासरीवादनाच्या सुमधुर संगीतात भान हरपून कृतार्थ राधा कृष्णअस्तित्वात विरघळायला लागली. त्या एकजीव अवस्थेत ती नम्र मंद स्वरात पुटपुटली, "जनार्धना येते मी, तुम्हीही लवकर या."
"तथास्तु राधे", तो इशांचा ईश कर उंचावत वदला. राधेची मान कलली. मनुष्ययोनीतील त्याला हा क्षण स्वीकारणे महाकठीण गेले. त्याच्या विलापाने समुद्र खवळला. डोंगर हेलावले. दऱ्या स्फुंदू लागल्या. वारा सैराट झाला. आकाश गलबलले. जिच्यासाठी जिच्यामुळे सदैव ज्या बासरीतून माधुर्याने ओतप्रोत धून निघून अंतःकरण व्यापायचे ती बासरी त्याने व्यथित मनाने तोडून टाकली. पृथ्वीवरील पराकोटीच्या प्रेमाचा अंत झाला होता. त्याच्या बासरीची मुग्ध दिवाणी राधाराणी दूर निघून गेली होती.
त्याने त्या प्रेमस्वरूप पाव्याचे दोन्ही तुकडे निर्ममपणे आजूबाजूच्या अरण्यात टाकून दिले. कालांतराने तिथे अनेक बासऱ्यांचे मोठे मोठे भव्यदिव्य वृक्ष जन्माला येणार आहेत हे भाकीत तो जाणत होता पण आता त्याची श्रद्धेय शक्तीच इहलोक सोडून गेल्यावर त्यालाही इथे रमावेसे वाटेना. तोही आपल्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला.
त्याच्या प्रीतीसंगमाने राधेची नाजूक जिवणी जशी हळुवार निळसर होई तशी अवघी सृष्टी त्यावेळी निळी निळी झाली. परंतु त्या निळाईतले परब्रम्ह मात्र कमालीचे उदासले!
