आत्ती
आत्ती
देवघराच्या दारात सोवळे नेसून बसलेल्या आत्तीला मी निरखत होते. गाभारा धूप उदबत्तीच्या धुराने भरला होता. त्या वलयात ती उभे देऊळच झाल्यासारखी भासत होती. क्षणभर ती त्या धुपाबत्तीच्या सुगंधात विरते की काय अशी भीतीही मला वाटायला लागली. जणू तिथे सजीव असे काही नसावे अन् असलेच तर त्याला केवळ सजीव चित्र म्हणावे इतकी आत्ती, देवघराची चौकट, मागचा धूसर पटल आणि तिचे वस्त्र न हलता आपापल्या जागी तंतोतंत बसले होते.
महालक्ष्मी उठायची वेळ आली होती. गुरुजी कथा वाचत होते. आत्ती गाठी वळत होती. वळताना नजर अगदी खाली. एकचित्त. मन लावून कथेतला शब्दन् शब्द ती ऐकत होती. तिचा देह थोडा विस्तारला होता. चेहराही पसरला होता. यावेळी थकलेली दिसत होती आत्ती. पासष्टीच्या पुढे गेली असावी.
आरती करताना आत्ती शब्दानुरूप हातवारे करत. "अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा? नरहर तल्लीन झाला पदपंकज रेषा..." असो किंवा "जेथे जेथे मन जाई माझे, तेथे तेथे निजरूप तुझे.…." असो किंवा तत्सम काही. आत्ती ओळ न् ओळ, ठिपका न् ठिपका समजून घेत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून सवयच होती तिला ही. समजण्याच्या ,समजून घेण्याच्या प्रक्रियेवेळी ती वर्तमानात उरतच नसे. ती लहरत असे मूकपणे अशीच दूर कुठेतरी प्रत्येक अल्प,स्वल्प विरामाचा अर्थ आपल्या परीने लावत.
विलक्षण आहे आमची आत्ती आणि विलक्षणच जगली ती. आम्ही लहानपणापासून आत्तीकडे येतो. महालक्ष्मी पूजनाला तर येतोच येतो. त्या काळी स्थळाची फारशी विचारपूस न करता तिला उजवून टाकलेले. नवरा मुलगा मॅट्रिक पास आहे असे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात तो पहिला वर्गही शिकला नव्हता. सतत आत्तीवर डाफरायचा. वेळकाळ न पाहता मानहानी करायचा. भिक्षुकीचा व्यवसाय होता पण कमाई अगदी अत्यल्प. मग आत्तीने गडीमाणसे हाती धरली आणि नापिकी जमीन कसली. जाड्याभरड शेतीला आत्तीचा जाडाभरड स्पर्श झाल्याबरोबर माती आनंदाने नाचायला लागली. वाऱ्यावर पिकं डोलायला लागले. कष्ट केले की फळ मिळणारच ही उक्ती डोक्यात पक्की बसवून आत्ती वारेमाप कष्टत राहिली. तिच्या सोबतीला आल्या तिच्या दोन विधवा भावजयी. इतर भावजयी म्हणत आत्ती त्यांच्यावर चारीठाव ओरडत असते, अपमानास्पद बोलते. नौकरासारखे वागवते पण त्या तिघींना मात्र या असल्या कुठल्याही वक्तव्याशी काहीच सोयरसुतुक नव्हते. त्यांची परस्पर समज आणि एकमेकींना बांधून ठेवणारे धागे फार चिवट आणि अतूट होते. म्हणूनच अद्यापही त्या तिघी एकत्र टिकून होत्या.
आत्तीचे पाचही मुले माझ्या वयाच्या आगेमागेच होते. तीन मोठे ,मधला माझ्या बरोबरीचा तर धाकटा दोन वर्षांने लहान. जेव्हा आम्ही एकत्र खेळत तेव्हा मी खूप वेळ धाकट्याकडे पहात राही. तो वरच्या चौघांसारखा दिसत नव्हता का? त्याच्या चेहऱ्यात काही वेगळेपण होते का? आत्तीची झलक तर त्याच्यात निश्चितच होती पण मामांच्या चेहऱ्याची ठेवण त्याच्याशी कुठेच जुळत नव्हती.
कधी ना कधी सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात तसे एक दिवस मला अन्वरचाचाचे दर्शन घडले. अन् मला पडलेल्या धाकट्याच्या चेहऱ्याचे रहस्य उलगडल्यासारखे झाले. मी उन्हाळ्याच्या सुट्या म्हणून आत्तीकडे आले होते. वय चौदा नुकतेच पूर्ण झालेले म्हणून अति उत्सुक वृत्ती जरा जास्तच भोचकरित्या कार्यरत झालेली. बाहेर रणरण ऊन म्हणून आम्ही भावंडे आत वाळ्याच्या कुलरमध्ये पत्ते खेळत बसलेलो. तोच शेतीवरची माणसे येऊन बसत त्या बाजूच्या खोलीतून मोठ्ठा आवाज आला,"श्याम जरा पाणी पिला तो.…."
श्याम म्हणजे धाकटा !
आवाजापाठोपाठ आम्ही बसलो होतो त्या दिवाणखाण्याच्या दाराशी एक मोठी काळी धिप्पाड पुरुषाकृती येऊन उभी राहिली. ते अन्वरचाचा होते. शेतीवरचे मुकादम. दिवाणखान्यात आधीपासूनच जातीबाहेरील व्यक्तींना प्रवेश निषिद्ध होता. अन्वरचाचाला याची कल्पना असावी म्हणून ते खोलीच्या दाराशी घाम पुसत उभे होते. हसूनखेळून बोलण्याचा त्यांचा पिंड नसावा तरी ते आम्हा मुलांकडे बघून हसले. शरीरासोबत मनानेही भरपूर कष्ट आणि क्लेश सोसल्यासारखी काळीसावळी शरीरयष्टी होती त्यांची. अन्वरचाचाला आत्तीने जगभर पाणी दिले. पण मला असे का वाटले की त्यांच्यात अधिक काही देवाणघेवाण झाली? दोघांचाही काळा चेहरा अनामिक आनंदाने फुलला? अन्वरचाचाची नजर श्यामवर सूक्ष्म वेध घेत रेंगाळली?
अन्वरचाचा, श्याम....श्याम अन्वरचाचा....म्हणावे तर साम्य म्हणावे तर नाही का? काही कळत नव्हते. जसे आपले विचार तशी आपली दृष्टी असेही काही संभव असू शकते. ही गोष्ट बोलताही येत नव्हती कुणाशी.पाठीत दंडुकेच पडले असते माझ्या. वयागणिक हा प्रश्न, ही बाब माझ्या मेंदूत घट्ट बसत गेली. खरेतर आत्तीवर असा संशय घेण्याचे काहीच कारण नव्हते. तिचे वागणे अतिशय स्वच्छ, सरळमार्गी ,कर्तृत्ववान होते. आणि त्याहून खरे म्हणजे श्याम हा आत्ती आणि मामांचा मुलगा नाही असा प्रश्न माझ्या डोक्यात उद्भवण्याएव्हढे काहीच आक्षेपार्ह दृश्य मी कधीच पाहिले नव्हते. मला येतो तसा श्यामच्या चेहऱ्यामोहऱ्याचा संशय कुणालाच यायचा नाही. मग मलाच का वाटायचा तो वेगळा?
आत्तीचे पाचही मुले आलटून पालटून महालक्ष्मी पूजेला बसत. सोळा सतरा वर्षाच्या श्यामला जेव्हा मी पूजा करताना बघितले तेव्हा गळ्यात उपरणे घालून बसलेला उघड्या अंगाचा पाठमोरा श्याम मला पिढीजात ब्राह्मण कुटुंबातील युवक अजिबातच वाटला नाही. किती धिप्पाड, कणखर यवन दिसत होता तो. यवन? श्रद्धाळू आत्तीला पटत असावे असे जातीबाह्य व्यक्तीच्या हातून घराण्यात चालत नसताना पूजा करणे? की प्रत्येक स्त्रीला वाटतं तसे हे मूल तिला केवळ तिचेच वाटत असावे? ती ब्राह्मण जातीत जन्मली म्हणून तिचे मूलही ब्राह्मण?
काहीतरी झाले असावे, अतिशय निंदनिय बोलत मामांनी आत्तीचा अपमान केला. माझी विचारांची तंद्री तुटली. मी वर्तमानकाळात आले. बसल्या जागी आईसाठी चारही मुले अस्वस्थ झाली होती पण कुणी काही बोलले नाही. आत्ती तशीच निमूट गाठी वळत राहिली. तिच्या चेहऱ्यावर बरीचशी वेदना झळकत होती. असे का होतेय? मी आत्तीला इतके लख्ख इतके आरपार कसे बघू शकते?
मामा बोलले ते सगळे बोलणे आत्ती झटक्यात माफ करून टाकते. मामाने लग्न करताना आपल्याला फसविले त्यापेक्षा आपणच त्यांना जास्त फसविले असे आत्तीला वाटते का? फसवले, फसवले, फसवले म्हणजे काय केले माझ्या आत्तीने? मला आता माझ्याच विचारसरणीची चीड येऊ लागली.
आत्तीने विवाहबाह्य प्रेम केले का? तसे संबंध निर्माण केलेत का? चुकून झालेत का? ते प्रेम आत्तीने कसे तोलले मग? कुठवर जपले मग? अन्वरचाचा अन् आत्ती? शेतातल्या पिकांच्या भल्यामोठ्या रांगा अन् आत्ती? कसे घमघमले नाही असले कुठले गुपित होतेच तर?
आत्ती आणि त्या दोन काकी इतक्या कशा वर्षानुवर्षे तोंडाला कुलूप लावून नीट जगतायेत? की हे नुसते माझ्या मनाचे खेळ आहेत?असे काहीही नसावे?
मी खूप निक्षून आत्तीला बघत होते. तिच्या आत मी असा काही शोध घेतेय याची बिचारीला खबरही नसावी. पण निश्चितच तिच्या सोबत सोबत वावरणारी तिच्या देहबोलीवरची एक ताणतणावाची सुरावट नक्कीच काही या चार भिंतीपालिकडले सांगू पहात होती.
"श्याम, अन्वरचाचा नाही आलेत महालक्ष्मी पूजनाला?" जेवण करीत असताना मी श्यामला विचारले. आत्तीकडच्या या मोठ्या सणाला गावातील बहुतेक सगळेच परिचित येत. ज्यांचा मूर्तिपूजेवर विश्वास नसे पण आत्तीच्या नातेसंबंधावर अपार माया असे तेही समस्त लोक येत. त्यांची बसायची, जेवायची व्यवस्था मोठ्या हॉलमध्ये केलेली असे. तेही स्वतःहून प्रसाद घेत. खरे म्हणजे आत्तीच्या घरात जातीभेद गळूनच पडला होता. सगळे मिळूनमिसळून कामे करत होते. फक्त सगळ्यांनी पूर्वापार चालत आलेली एक मधली सूक्ष्म रेखा आपल्या पूर्वजांचा, घराण्याच्या परंपरेचा आदर म्हणून स्वतःहून जपली होती. खूप छान वाटायचे आत्तीकडे आले की. तिथे वावरणाऱ्या लोकांच्या मेंदूतील सुहास्य प्रसन्न भाव घरभरही जाणवत रहायचे. कधी कसली मरगळ नाही की नैराश्य नाही. अपवाद फक्त आत्तीच्या मनातील "त्या" एका प्रश्नचिन्हाचाच होता. अत्यंत कठीण आयुष्यातील एकसे एक दिन कापूस पिंजल्यासारखी सुलभ करून काढणारी आत्ती नक्कीच कुठेतरी गरगरत होती.
कस्से काय पण आत्तीने मी श्यामला विचारलेले ऐकले. माझ्या पानात पंचामृत वाढत ती मला म्हणाली,"तुला कशी आठवण आली गं एकदम त्यांची?"
"त्यांची" ? ओहो, तिथ्थेच मला खरे तर खूपसे स्पष्ट झाले. तिच्या "त्यांची" या शब्दात काय नव्हते? आपल्या प्रिय पतीसाठी उच्चारावा तसा तिचा तो अन्वरचाचासाठी अर्थवाही स्वर होता.
"त्यांनी माझ्या शेजारीच भोपाळला फ्लॅट घेतला आहे, ते तिथेच असतात. त्यांची मुलगी डिलेव्हरीसाठी आली आहे म्हणून यावर्षी नाही आलेत ते महालक्ष्मी पूजनाला." श्याम उत्तरला.
माझ्या मनातील शंकेशी सगळी उत्तरे जुळून येत होती. बरोबर आहे,अन्वरचाचांना एकुलती एक मुलगी होती. आपल्या लाडलीचे लग्न करून दिल्यावर त्यांच्याजवळ आधाराला कुणीच नव्हते. त्यांच्या पत्नीचे कितीतरी आधी देहावसान झाले होते. पंचाहत्तरीचे अन्वरचाचा या वयात जाणार कुठे ना? बरोब्बर ते गेलेत आपल्या मुलाच्या जवळ. श्यामच्या जवळ. मी हळूच श्यामकडे पाहिले. कुणासारखा दिसतो हा? हे तरतरीत नाक, ही हसण्याची पध्द्त अगदी डिट्टो अन्वरचाचाची !
पण मग अन्वरचाचा आत्तीच्याच गावात का नाही राहिले आधारासाठी? आत्तीवर तर त्यांनी अफाट प्रेम केले ना? आत्तीनेही त्यांच्यावर जीवच ओतला असावा त्याशिवाय का ती त्यांचे मूल गर्भात वाढवणार? खूप प्रयत्नांती, मनाला समजवत घेतला असेल त्या दोघांनी असा निर्णय ! मध्येमध्ये काही गोष्टी आमच्या कानावर आल्या होत्या. ते ऐकून घरातील वडीलधारे चांगलेच चिडले होते.
शेतीवरचा मुकादम आत्तीला त्रास देतो म्हणे. त्याला तिला आपली बीबी करून घ्यायची आहे म्हणे अशा काही गोष्टी नकळत माझ्याही ऐकण्यात आल्या होत्या. त्यावेळीही आत्तीचा त्यात काही दोष असावा अशी पुसटशीही शंका चुकूनही कुणी घेत नव्हते एव्हढे तिचे कर्तृत्व दमदार होते.
पंधरा वीस दिवसांसाठी जसे ते अफवांचे वादळ जोरकसपणे आमच्या सर्व कुटुंबियांत घुमले त्याहीपेक्षा अति वेगाने शमले. आपली समस्या आत्तीने स्वतःच सोडविली होती.
आत्तीच्या स्पर्शाच्या अधीन झालेल्या अन्वरचाचाला तिने कसे आवरले असेल? तिच्याही मनात उधळलेल्या या अनैतिक संबंधाला तिने कसे सावरले असेल. अनैतिक का म्हणायचे पण आपण? ती विवाहिता होती म्हणून? तिच्या नकळत तिच्या अगदी बालवयात तिचा असा कुचकामी विवाह करवून दिला आणि तिच्या सर्व इच्छा आकांक्षांची राख झाली ते नैतिक होते का? पण आत्तीवर कुणी बोट ठेवण्याएव्हजी तिने तिची ही चूक भूल अतिशय सफाईने लपविली होती इतकी की उभ्या हयातभर तिचा कोणालाच संशय आला नाही. परंतु आत्तीनेच स्वतःच स्वतःला या संबंधासाठी माफ केले नसावे बहुधा कारण दुसऱ्याला फसवायचा तिचा पिंडच नव्हता. ती खुल्या अं:तकरणाची निर्मळ व्यक्ती होती.
अन्वरचाचा आणि आत्ती परिस्थितीला शरण जाऊन एखाद्या हळव्या क्षणी कदाचित प्रेमात पडले असतील. स्पर्शातला पाऊस, स्पर्शातली धग सहन न होऊन त्यांच्यात संबंधही घडले असतील. त्या संबंधाला जातीपातीशी संवेदनशील असणाऱ्या गावात, कुटुंबात तिने किती जिवापार जपले असतील. अन्वरचाचाने "बीबी हो" म्हंटल्यावर ते मानण्याइतपत आत्ती धडाडीची होती. तिने तसे केले नाही. अन्वरचाचाला प्रेमाचा, आपल्या जन्मसदृश्य कर्तव्याचा अर्थ समजून सांगत तिने कदाचित त्यांनाही तिचे नियतीने बांधून दिलेल्या घरात राहणेच योग्य आहे हे पटवून दिले असावे. आत्तीपुढे हृदयच हरणाऱ्या अन्वरचाचांना हे पटले नसते तरच नवल. त्यांनी नुसते आत्तीच्या देहावरच प्रेम केले नव्हते तर आत्तीच्या वृत्तीवर ते आरक्त होते. वयानुरूप, काळानुरूप मुले मोठी व्हायला लागली तसे विलग होत गेले ते दोघे स्वयंमर्जीने.
अनेक रंगात रंगलेली अशी असावी कदाचित ही कहाणी !
जेवण झाल्यावर मी महालक्ष्मीपुढे मांडलेल्या संतरंजीवर गाभारा न्याहाळत बसले होते. माहेरवाशीण परतायची वेळ झाली होती. महालक्ष्मीचा चेहरा प्रहरागणीक बदलतो म्हणे. आवाहन करून मांडल्या त्या दिवशी अल्लड मुलींगत दिसतात त्या. पूजनाच्या दिवशी लाडकोड करवून घेणाऱ्या माहेरी आलेल्या सुकोमल विवाहितेसारख्या. आणि जायच्या वेळी जरा मलूल, नाराज .
"नमस्कार करून घे बेटा आता हलवायच्या आहेत" ,आत्ती मला म्हणाली. त्यावेळी ती देवघराच्या उंबरठ्यात आपले भरले घर डोळ्यात साठवत बसली होती. देवघरात जायचे म्हणजे तिचे मुटकुळे पार करावेच लागणार होते. आत जाऊन नमस्कार तर करायचाच होता पण त्या आधी पोथीसारखी काळीजप्रिय असणारी आत्ती मला वाचायची होती .