कोरडेठन्न
कोरडेठन्न
आज सात वर्षांनी तिला दिवस राहिल्याचे लक्षात आले. ती कॅलेंडरपासून वळली. समोरच्या खोलीत बसल्याबसल्या अनेक विचारांनी तिचा ताबा घेतला. भूतकाळ झरझर सरकू लागला. लग्नाचे पहिले दोन महिने आठवले. अशीच तिची पाळी चुकली होती. काय करावे तिलाच समजेना. सासरचे सगळेच लांब रहात होते. मनाने आणि शरीरानेही. आईशी फारसे सख्य नव्हते. जवळच्या मैत्रिणीही पार दूर गेल्या होत्या. शेवटी तिने नवऱ्याला, केतनलाच सांगायचे ठरवले.
"मी प्रेगनंट आहे बहुदा ", पण हे नेमके कुठल्या अविर्भावात सांगावे तिला उमजेना. कारण लग्न झाल्या झाल्या दोनएक दिवसातच तो तिला म्हणाला होता, "लाजायचे काय बेमालूम नाटक करतेस तू", त्यावेळी आपण कशाला नाटक करणार? आपल्याला नाटक करायचे काय कारण असे अनेक तिला बोलायचे होते पण त्याच्या जरबी डोळ्यांकडे पाहून ती थिजून गेली होती.
ते हेच डोळे होते ना ज्यात अनंत आर्जव घेऊन तो तिला लग्नाची गळ घालायचा. तिने नाही म्हंटल्यावर अपार करूणा त्यात धावून यायची आणि तिचे मन ढवळून जायचे. त्याला नाही म्हणायचे तिच्याजवळ दोन कारणं होती, एकतर तो तिचा केवळ मित्र होता. त्याला ती आवडते म्हणून त्यांच्या कंपूतही कितीही चिडवाचिडवी होत असली तरी त्याचा चेहरा काही तिच्या मनाच्या तळघरात नव्हता. दुसरे म्हणजे त्याची जात वेगळी आहे आणि आपल्या घरी ते चालणार नाही हे तिला माहिती होते.
आईवडिलांच्या मर्जीने तिचा दाखवायचा कार्यक्रम झाला, चारदोन स्थळ पाहिल्यानंतर एका स्थळाकडून होकारही आला. सारं घर आनंदाने थुईथुई नाचायला लागले. वडील एक ओझे उतरल्यासारखे पुढच्या याद्या करू लागले. साक्षगंधाला सहासात दिवस उरले असतानाच मुलाच्या घरून फोन आला, "लग्नाचा योग दिसत नाही, हे लग्न इथेच मोडले असे समजावे". तिला, तिच्या कुटुंबियांना लग्न मोडल्याचे कारणही कळेना. त्यानंतर ती मंडळी फोनही उचलायला तयार नव्हती. त्या घटनेचा सगळ्यात जास्ती धक्का आपल्या वडिलांना बसल्याचे तिला रात्री लक्षात आले. उन्हाळ्याचे दिवस नसतानाही ते सतरंजी उचलून गच्चीवर झोपायला गेले. "असं ऋतुमानाच्या विरुद्ध बाहेर झोपू नये, कुठलेही पाखरू अंगावरून जाते, ते चांगले नसते", आई असे पुटपुटतच होती पण त्यावर दुर्लक्ष करून ते गेले. आपण सगळे घरात आणि वडील बाहेर हे चित्र जेव्हा तिने पाहिले तेव्हा संपूर्ण घरच तिच्याभोवती गरगरायला लागले. या घरातील आपला दाणापाणी संपला, आता आपले लग्न व्हायलाच हवे ही जाणीव तिला भयंकर अस्वस्थ करू लागली. त्या विचलित मनःस्थितीतीच तिने केतनला फोन लावला,
"तू लग्नाला तयार आहेस ना?"
"होsss ओsss ओ "
"उद्या करायचं का ? "
"उद्याच? ओके"
दुसऱ्या दिवशी ती बाहेर पडली त्यावेळी तिलाही माहिती नव्हते की ती आज खरेच लग्न करणार आहे. कारण असे काही कोणाला न सांगता लग्न करावे असे कधीच तिच्या मनात नव्हते. ती पण तिच्या आईसारखी तिच्या लग्नाच्या बँड बाजा बारातचीच वाट पहात होती. डोळ्यात अशी टपटप टपटप भरलेली स्वप्ने होती. मेहंदी, हळद, पैठण्या, सुलग्न, विहिणीची पंगत, फुलांची वरात...."बाबीच्या डोक्यावर अक्षदा पडलेल्या मला पहायच्या आहेत, पहायच्या आहेत," आईचे वाक्य तिच्या संगेसंगे चालायला लागले तसे भेदरून तिच्या पावलांचा वेग अधिकच वाढला. "माझ्या कारकुनीच्या पगारात लग्नाचा एव्हढा खर्च कसा करायचा, अबब अबब" वडिलांचा थकला मलूल चेहरा आठवला आणि ती जरा भानावर आली त्यावेळी तिच्या गळ्यात मंगळसूत्र पडले होते. अंगावर कोणीतरी घालून दिलेली लालजर्द साडी होती. तिला कसेसेच झाले एकदम. आईवडिलांचा निष्पाप चेहरा समोर आला आणि आपण हे काय करून बसलो याची चटका लागल्यासारखी जाणीव झाली. ती तिरमिरीत उठून चालायला लागणार तोच केतनच्या खांद्यावरच्या शेल्याने पदरासकट ती त्याच्याकडे ओढली गेली. "अरे अब तू अकेली कही नही जा सकती, अब तू केतन संग बंध गयी है", तिची मैत्रीण खिदळत उचकली.
वडिलांपुढे आल्यावर वडिलांनी चांगली वाईट काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आशीर्वादाचे हात उचलून ते एका जागी बसून राहिले. मनातला धक्का त्यांनी जाहीर केला नाही. ती जाताना आई मात्र एखादे प्रेत उठावे तशी धाय मोकलून रडली. जातीचा ना पातीचा म्हणून आधीच केतन आईला पसंत नव्हता. मुलगी त्याच्याशीच लग्न करेल असेही काही माहिती नव्हते. लग्न झाल्या दिवशी मित्रमंडळीतला केतन आणि घरातल्या केतनमध्ये पराकोटीची तफावत असल्याचे तिच्या ध्यानात आले. त्याचे आईवडीलही हे लग्न काही आमच्या संमतीने झाले नाही म्हणून नावापुरते येऊन गावी गेले. कुठले माप ओलांडणे नाही की कुठला सत्यनारायण नाही तिचे हौशी मन खूप खटटू झाले.
आधी कुठल्याही विषयावर भरभरून बोलणारी ती चप्पल घालून बाहेर जाणाऱ्या केतनला शब्द गोळा करत म्हणाली, " प्रेगनंट आहे वाटतं मी".
"अशी कशी प्रेगनंट राहिली तू?" तो तिच्या अंगावर धावूनच आला.
"कमाई ना ढमाई मला धड, तुला नोकरी कर म्हंटलं तर तुला मॅरीड लाईफ एन्जॉय करायचं आहे म्हणते काही दिवस, खबरदार प्रेगनंट राहिली तर".
तिला खूप मानसिक धक्का बसला. कोलमडल्यासारखी ती बराच वेळ बसून राहिली. एकविसाव्या शतकातला हा माणूस गरोदर राहिली म्हणून मला दोष देतोय, याच्या संयोगाशिवाय का मी गरोदर राहणार आहे? गरोदर राहणे ही केवळ माझी चूक आहे? सिनेमात तर अगदी दाखवतात तरुण जोडप्यातली बायको गरोदर असली तर नवरा कसा तिला लाडेलाडे जवळ घेतो. तिच्या अजून वर न आलेल्या पोटावरून मऊ बोटं फिरवतो आणि मग दोघे मिळून गोंडस बाळाचे सुरेल स्वप्न रंगवतात. लगेच खोलीत हसऱ्याखेळत्या बाळाचे चित्र आणून लावतात. कथा कादंबरीतही असेच वर्णन असते ना? मग प्रत्यक्षातले चित्र इतके भयानक का?
डॉक्टरकडे तर जायलाच हवे होते, काय आहे नाही ते विचारायला. ती मग इच्छा नसतानाही आईला चल म्हणाली. "हॅट बाई दिवसही राहिले का गं तुला? जरा तर संयम पाळायचा, जन्माला आलेल्या मुलाची जात काय सांगणार? केलं तर केलं लग्न मुलबाळ कशाला हवं दुसऱ्या जातीचं?" तिचेचं मन खूप दुखूनदुखून ठणकायला लागलं. जाताना समोर बसलेल्या वडिलांना आईने दवाखान्यात जाते म्हणून सांगितले. तिने चोरून, संकोचून एक नजर वडिलांकडे टाकली. यांच्या डोळ्यात नक्की कोमल आनंदित भाव असेल याची तिला खात्री होती. त्याचवेळी त्यांचीही नजर तिच्यावर गेली...संपूर्ण गेली आणि ती उभ्याउभ्याच थरथरली. एखाद्या जखमी बहिरी ससाण्याने आपल्या सावजाकडे बसल्या जागेवरूनच अतिशय तीक्ष्ण पहावे आणि त्या पहाण्यानेच त्या इवल्या पक्ष्याचा जीव जावा अशा अनामिक भयाने तिने पोटावर हात ठेवून असलेला नसलेला गर्भ पकडायचा प्रयत्न केला. वडिलांच्या मनात काय येतंय ते तिला सहज समजले. अजून धड नोकरी ना पाकरी अन् दोन महिन्यातच ही पोर पोट धरून घरी आली. खायचे प्यायचे हाल झाल्यावर उद्या नवरा सोडूनही कायमची येईल. असे उडाणटप्पूंचे संसार टिकतात का कधी?
दवाखान्यात आली आणि तिथले शांत गूढ वातावरण, इंजेक्शन, कापसाच्या गुंडाळ्या नेणाऱ्या नर्स बघून तिला धडकीच भरली. कोणीच सावरणारे दिलासा देणारे नसल्याने सगळ्यांना नकोसे असणारे बाळ तिलाही भीतीपोटी नको वाटले.
त्यावेळी तिला गर्भ राहिला नव्हता. परंतु या सर्वांच्या वागण्याबोलण्यानेच आपला गर्भ आतल्याआत जळून खाक झाला असेच तिला वाटत राहिले. मग दोनतीन वर्षे तिलाही मुलं नकोच वाटायचे. तिने आपले मन नोकरीत रमवले. पण आपल्याच वयाच्या किंवा आपल्यापेक्षा लहान मुलीबाळींच्या कडेवर बाळकृष्णासारखे नटखट मुलं पाहिले की तिचा जीव उचंबळू लागे. आपले करणारे कोणी नाही हे तिच्या लक्षात आल्यावर ती केतनला मूल दत्तक घ्यायचा आग्रह करायला लागली. तेव्हा तो तिच्या चेहऱ्यात खोलवर पाही. तिची आईही प्रत्येक भेटीत असाच तिचा चेहरा न्याहाळत तिच्या आतवर चाचपडायचा प्रयत्न करी. आपल्या अंत:करणातली खळबळ त्यानंतर तिने कुणालाही कधीही दाखवली नाही.
यावेळी ती एकटीच दवाखान्यात गेली.
"गुड न्युज"
आपलं बाळंतपण करणार कोण या विचाराने ती मुळातून धपापली.
"पण डॉक्टर मला दत्तक घ्यायचं होतं, हे अबॉर्ट करता येईल का ?
"ए वेडी आहेस की काय, तुझं मूल होतंय ना तुला मग कशाला दत्तक घ्यायचं? एक होऊ दे स्वतःच, दुसरं दत्तक घे हवं तर "
"पण डॉक्टर..."
"नो अबॉर्शनला माझी परवानगी नाही "
दिसामाजी गर्भ वाढत होता. तोवर पाठच्या भावंडांनाही मुलबाळ झाल्याने वडिलांची तीव्र नजर निवळली होती. ही थोरली असून हिलाच अद्याप कसे मुलबाळ नाही या नातेवाईकांच्या सततच्या प्रश्नाने आईही जरा ढिली पडली होती. ती कमाई करते म्हणून केतनही निर्धास्त होता. आणि हे सगळे आलबेल आहे म्हणून तिलाही पूर्वीपेक्षा शांत वाटत होते. छान गोंडस बाळ झाले, आनंदाची लहर पसरली. ती बाळाला पाजताना पाहून केतनच लाजायचा. तिलाही लाज वाटायची पण त्या क्रियेला सरावून तिची लाज दोनचार दिवसातच गेली. बाळाला पाजायला तर ती घेत होती पण दूध येत नव्हते. खळळकन पान्हा फुटत नव्हता. "कसलं टेन्शन आहे बेटा तुला, दूध न येण्याचं एक कारण ते असू शकतं". डॉक्टर तिला विचारत होत्या.
"नाही हो तिला कसलं टेन्शन?" आईच मध्ये बोलायची. रात्री सारी सामसूम झाल्यावर ती कुशीतल्या बाळाला अधिकच घट्ट पकडायची. आपल्या बाळाला मन भरून पहायची. दिवसा तसे पाहणे तिला जमायचे नाही. दहाबारा वेळा तरी आई, "याची जात बदलून टाक गड्या शाळेत, इतकं छान बाळ आपल्या जातीने ओळखल्या जायला पाहिजे" असा सल्ला तिला द्यायची. आईला वाटायचे आपण सहज बोलतोय पण तिला खूप बोचायचे ते. आपल्या बाळाची जात कोणती आपल्या बाळाची जात कोणती हा प्रश्न तिच्या हृदयावर आदळत रहायचा. माझं बाळ माझ्याच जातीचे, मध्यरात्री त्याला छातीशी कवटाळून ती पुटपुटायची.
"बाळंतपणाचे पैसे केतन देईल ना ग, कारण आपण त्याला घर घ्यायला दिलेले पैसे त्याने अजून वापस केलेले नाही, आता बाबा पेन्शनर माणूस कुठून आणणार इतका पैसा?" दिवसातून शंभर वेळा तरी आई तिला हा प्रश्न विचारी. आणि ती आईला भरघोस हो म्हणे. पण त्या प्रश्नाचा तिच्या मनावर खूप दाब येत राहिला. एकदिवस आसपास कोणी नसताना पाहून ती वचन दिल्यासारखी केतनला कळवळून म्हणाली, "डॉक्टरांचे पैसे तू देऊन दे, बाबांना नको द्यायला लावू. त्यांच्याजवळ नाही, मी जॉब जॉईन केल्यावर तुला देऊन देईन". जणू काही ते मुल तिचे एकटीचेच आहे, तिची योनी वापरून तिनेच ते काढलेय आणि त्याची किंमत तिनेच द्यायलाच हवी अशा अर्थाने पहात केतन होकारार्थी मान डोलवे आणि तिचा जीव किंचिंतसा भांड्यात पडे.
खरेच आपण पुन्हा जॉईन केल्यावर या बाळंतपणाचे वीस पंचवीस हजार केतनला परत करायचे तिने पक्के ठरवले. डिस्चार्जचा दिवस आला. ती केतनची वाट पहात होती. डॉक्टर वारंवार पेपर तयार आहेत म्हणून सांगत होत्या. चार वाजून गेल्यावर “संध्याकाळच्या आत बाळाला घरी न्यायचंय ग, केतन कुठाय?” असा घोषा आईने लावल्यावर ती तिरमिरीत उठली. बाळाला आईच्या मांडीत देत म्हणाली, "मी येते आत्ता घरी जाऊन, घरी पैसे असतील गं "
"बरं"
घरात पैसे नाहीच हे तिला माहिती होतं. तिच्या नोकरीचा पैसा या ना त्या कारणाने मागून केतनने खर्च केला होता. तिच्या डोळ्यासमोर तिने हौसेने जमवलेली चांदीची दोनचार भांडी, देव आणि सोन्याचे कानातले आले. डोळ्यातले पाणी पुसून ती झपझप चालायला लागली. ते विकून काही पैसे मैत्रिणीकडून उसने घ्यायचे तिने ठरवले.
"ए बाबी कुठे चालली गं?"
लॉबीत बसलेल्या तिच्या वडिलांनी तिला हटकले. हे इथेच बसले आहे का? ती दचकली. तिला खूप रडू येऊन वडिलांच्या गळ्यात पडावेसे वाटले पण ते रोखून ती म्हणाली, "येते बाबा मी दहा मिनिटात"
"अहो येते ती दहा मिनिटात" मागून लगबगीने येत आई म्हणाली.
"तूही अक्कल विकली का? ओली बाळंतीण आहे ना ती?" वडील आईवर जोरात ओरडले. तिच्याकडे वळून म्हणाले, "तू आत जा, तुझं आवर मी येतो डॉक्टरांना सांगून, निघू आपण"
केतनवर प्रचंड संतापून लाजेने अर्धमेली होत ती वडीलांमागे निघाली. खाली गाडीजवळ केतन उभा होता.
"चला बाबा मी सोडून देतो..."
"तू पैसे आणणार होतास ना?" तिने हळूच विचारले.
"कसचे? पहिलं बाळंतपण मुलीकडचेच करतात ".....
तिने असहय्य होऊन मान पाठीमागे टेकवली.
इवलं बाळ छातीशी झटपटत होतं. स्तनाग्रे पाझरण्याएव्हजी कोरडेठन्न पडले होते.
