धुरांच्या रेषा
धुरांच्या रेषा
जन्मभर तळतळून आठवणींच्या मागे पळत राहिली ती.
खरेतर,
"झुकूझुकू झुकूझुकू अगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत झाडी
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या...."
हे गाणे गुणगुणत जो तो मोठा होतो. वर्तमानाशी नाळ जुळवत सुखनैव जगायला लागतो परंतु तिचे तसे झाले नाही. ती कायम त्या गाण्याच्या वर्तुळातच वावरत राहिली. ऊssssहू, तळ्यात-मळ्यात देखील नाही. फक्त आत, आठवणींच्या आतच आत. वयात आली, लग्न झाले, मुले झालीत; देहावर वयस्क खुणा झळकू लागल्यात तरी मन, मेंदू, वाचा हरघडी जुन्या मऊसर स्मरणरंजनात रंगलेले.
माहेरचे दोन मजली किरायाचे घर. तिथे मागच्या अंगणात खेळणाऱ्या ती व तिच्या दोन मैत्रिणी, खजिस्ता आणि सुमती. येता-जाता वाटेत लागणाऱ्या प्रत्येक देवळासमोर नतमस्तक होऊन हात जोडणारे तिचे सरळमार्गी वडील. संध्याकाळी भाजीची पिशवी घेऊन मंडईत जाणारी आई. जत्रेत फुललेले रस्ते, गावाला बिलगलेली कमळाच्या फुलांची नदी. कसे विसरू शकणार होती ती हे सगळे? विसर पडलाही असता पण त्या तोलामोलाचे कुणी संवेदनशील सहचर लाभलेच नाही. मग अखंड जाळ निर्माण करणाऱ्या वर्तमानात जगायचे कसे? हाच तो एकमेव उपाय, स्मृतींच्या आवर्तनात रमायचा. स्मृतिउत्सव घडवायचा !
वास्तविक पाहता ज्याच्या त्याच्या स्मृती त्या त्या व्यक्तींशीच निगडित असतात. इतरांना त्याचे सोयरसुतुक नसते. पण तिला कोण सांगणार हे? आणि सांगीतल्यानंतरही ऐकण्याची मनस्थिती नसतेच तिची. सारखी आपली टकळी सुरू, "आमच्यावेळी... आमच्यावेळी...."
"एssss गप्प बैस गं आजी, आता चाललोय ना बघायला तुझे गाव, सारखे काय तेच ते वर्णन करून सांगते आहेस." कारमध्ये मागे टेकता टेकता तिची सोळा वर्षाची नात चिडचिडून ओरडली तेव्हा तिला एकदम ओशाळून बावचळल्यासारखे झाले. गाडी चालवणारा ड्रायव्हरसुद्धा आपल्या या अपमानावर हसला की काय अशी शंका येऊन ती पुढच्या आरशात दिसणारा ड्रायव्हरचा चेहरा हळू निरखू लागली.
सत्तरीची ती, आज पन्नास वर्षांनी तिच्या जन्मगावी मुली नातींसह निघाली होती. "एकदा तिथे जाऊ गं, एकदा तिथे जाऊ गं.." असे उभा जन्म घोकली ती पण संसाराच्या व्यापात तिकडे जायला वेळच मिळाला नाही. तिच्या लग्नानंतर दुर्दैवाने लवकरच एका दुर्घटनेत आईवडील मृत्युमुखी पडले व सख्खे कुणीच भावंडे नसल्याने माहेर कायमचेच तुटून गेलेले. म्हणून गावही सुटून गेलेले. तिच्या जीवाची त्या गावी जायला तडफड, तडफड व्हायची. बालपणीच्या मैत्रिणींना भेटावेसे वाटायचे. सुखदुःखाची कहाणी, न झेपणारी गाऱ्हाणी सांगावीशी वाटे. पण नेणार कोण?
विकट हसणारे, छळणारे नातलग, अकारण घुमेपणा घेतलेला नवरा पाहिला की तिला अधिकच कोंडल्यासारखे होई. उन्हाळ्यात किंवा सणावाराला इतर माहेरवाशीणी गावी जात तेव्हा तिचा जीव गलबले. आपल्याला कुणीच नाही ही जाणीव ठसठसे. लोकलाजेस्तव करायचा म्हणून कराव्या लागणाऱ्या प्रपंचात मन रमेना. कोंडमारा झालेल्या जीवाला आश्वस्त करणारी जागा हवीहवीशी वाटे. त्यासाठी अंतर्मन कळ्यासुमनांचे लहानपण गेलेल्या गतकाळाचा टवकारून वेध घेत राही.
आज कित्येक वर्षांनी तिची ती सुप्त इच्छा पूर्ण होऊ पहात होती. तिच्या तिन्ही मुलींनी तिच्या सत्तरीनिमित तिला तिच्या गावी न्यायचे ठरविले. आतापर्यंत आईने भूतकाळाची तोंडाला पाणी सुटेल इतपत जी वर्णने केली तो काळ तसाच्या तसाच तिथे सापडतो की नाही हे बघायची मुलींनाही उत्सुकता होती.
गावात गाडी शिरली तसे तिने डावीकडच्या बसस्टँडकडे पाहिले. तिथे लागूनच देवीचे सुंदर मंदिर होते. नवरात्रात छान यात्रा भरायची. एरव्ही सुनसान असलेला हा परिसर तेव्हा गर्दीने नटून जायचा. अबबssss पण आता तिथे केव्हढा मोठा कळस आणि काय चकचक भव्यदिव्य देवळाची वास्तू उभी होती. ते छोटेसे जुने देऊळ तर लुप्तच झालेले. या नव्या जरतारी दर्शनाने ती दडपल्यासारखीच झाली.
"हॅट गं असे नव्हतेच मंदिर, हे दुसरे असावे", पुन्हा तिचा घोषा सुरू झाला. मधली मुलगी तीव्रपणे उद्गारली,"काळ बदलला ना गं.. मंदिराचा जीर्णोद्धार झाला असेल" ती वरमून निमूट बसली खरी पण कुणालाच कसे आपल्या आठवणींशी लागेबांधे नाही हा प्रश्न तिला खात राहिला.
रस्ते, गल्ली, रहदारीत ओळखीच्या खुणा धुंडाळण्यासाठी ती गाडीच्या खिडकीतून अंग बाहेर काढत होती आणि कानाला हेडफोन लावून मोबाईलमध्ये डोळे मिटून तल्लीन असणारी नात तिला अंगाअंगाशी येऊ नको म्हणून दूर लोटत होती. शेवटी ती खेकसलीच नातीवर, "काय ते कानात खुपसून बसते चोविसही तास, गाव बघ ना माझे."
"काय बघायचे?" नातीने दुप्पट वेगाने प्रश्न फेकला. नंतर स्वतःच्या आईकडे वळून म्हणाली, "मम्मा मी आधीच सांगते ते लोणचे पराठे खाणार नाही मी, एखाद्या पिझ्झा शॉपजवळ गाडी थांबव.."
येऊन जाऊन खायच्याच गोष्टी. शहरात एव्हढे खायला मिळते तरी तृप्ती नाही. वरून विचारते काय बघायचे, तिच्या मनात उठलेच रोषाचे तरंग. थकले विझले डोळे नव्या स्वरूपातील गाव पाहून आधीच भांबावले होते.
आला, आला, आला तिच्या घराचा मार्ग आला. देवनगर. ती रोमांचित झाली. हळवी झाली. ज्या परिसरात ती लहानाची मोठी झाली, खेळली, बागडली तो तिच्या जिवापास असणारा भाग, तिचे घर तिला आत्ता पन्नास वर्षांनी दिसणार होते. तिचे डोळे भरून आले.
कित्ती विनवायची ती नवऱ्याला,"अहो चला ना एकदा बघून येऊ माझे घर."
"तुझे घर कसले, तुझे वडील आजन्म किरायाच्याच घरात राहिले, आपण तिथे जाऊन उतरायचे कुठे? त्यांचे स्वतःचे असते तर वेगळी गोष्ट." कधी नवरा तिला या शब्दात समजवायचा, कधी तिच्या त्राग्याने कंटाळून ओरडायचा तर कधी तिची भुणभुण टाळायला बाहेर निघून जायचा.
काय चुकायचे तिचे? त्याला सारे भोग देऊन झाल्यावरच उरलेल्या काही एकदोन क्षणात ती अशी मागणी करायची कारण निकडच होती तिची तशी पण तिच्या अंगावर विविध प्रकारच्या रांगोळ्या काढणाऱ्या तिच्या नवऱ्याला कधीच तिच्या मनाचा हळुवार कप्पा जतन करणे जमले नाही. साहचर्यासाठी त्याची आवश्यकताही वाटली नाही. जोडीदाराच्या निर्मम वागण्याने ती तुटत तुटत गेली. अधिकच एककल्ली झाली. आठवणींच्या कोशात दडून बसली.
त्यानंतर तिला कधीच वर्तमानासोबत जगताच आले नाही. ओठांवर हसू फुलायचे ते जुन्या आठवणींनीच. मन फेर धरून नाचायला, गायला लागायचे ते गतकाळातील सुरम्य सयीनींच. वर्तमानातले जग जणू स्टॅच्यु होऊन स्तब्ध झालेले, सद्य काळातली माणसे आसपास असूनही चालतीबोलती नसल्यासारखी. जागर फक्त जुन्या परिचित व्यक्तींचा, त्यांच्यासोबत घालवलेल्या अनंत क्षणांचा. परिणामी नातलगांत ती चेष्टेचा विषय झाली. त्यांची कुचेष्टा सहन न होऊन ती अधिकच जुन्यापुराण्या घटनांच्या चक्रव्यूहात गुरफटल्या गेली. तिथे तिला बरे वाटायचे. आपले कुणी भेटल्यासारखे व्हायचे.
तिने सांगितल्या ठिकाणी ड्रायव्हरने बरोबर गाडी उभी केली. ती खाली उतरली आणि आजूबाजूचे गर्दीचे प्रचंड लोंढे पाहून हरवल्यासारखीच झाली. "नाही गं हा नाही रस्ता तो..." ती पुटपुटत होती. तेव्हढ्यात तिच्या नजरेला "देवनगर, विद्याविहार वसाहत" चा बोर्ड दिसला. याच फलकाच्या मागे घर होते तिचे. कुठे गेले घर? तिथे "स्टेट बँक ऑफ इंडिया" अशी पाटी झळकत होती आणि मोठ्ठी सहामजली इमारत दिमाखात उभी होती.
"अग आमची गच्ची, तिथून मी खाली या कचराकुंडीत कचरा फेकायचे....,कुठे गेले सर्व?" तिला जोरात विचारावेसे वाटले. जिथे तिचे बालपण तिने गोठून ठेवले होते ते हे घर नाहीच असे ती वारंवार म्हणत होती. पण नाही कसे? कचराकुंडी जुने स्वरूप बदलले तरी होती की तिथे? इतका बदल? का आणि कुणी केला? तिला आजूबाजूच्या रहिवास्यांना जाब विचारावासा वाटला. या जागेवर या घरावर तिचा हक्क होता. तिने इथे सुखाचे श्वास घेतले होते. अगणित स्वप्न पाहिले होते. तिला न विचारता त्या घराची विक्री झाली होती. संपूर्ण कायापालटही करण्यात आला होता.
ती सटपटल्यासारखी बघू लागली. ओळखीच्या खुणा शोधू लागली. बाजूचा मायाळू चक्कीवाला, भूगोलाचे गुरुजी कुणीच कसे दिसत नाहीये. शेजारपाजार, जवळची दुकाने, घरे सगळेच बदलून गेले होते. ती ज्या ओढीने जुन्या क्षणांना उराउरी गच्च धरायला आली होती ते क्षण आधीची कसलीही ओळख दाखवेना. ती पुन्हा, पुन्हा भिरभिर भिरभिर त्या गगनचुंबी इमारतीकडे बघू लागली. कुठल्यातरी फटीतून, कोपऱ्यातून एखादी जुनी काळीजतिरिप येते का म्हणून निरखू लागली. पण एक ना दोन. जुने काहीच आढळेना. आसपासच्या लोकांना विचारले, तेही भलतेच नवीन, बोलले सहृदयतेने तिच्या भावना जाणून, घर तिचेच असल्याची पुष्टीही झाली परंतु सर्वच ओळ्खखुणा जणू ती तिथे कधी राहिलीच नसल्यासारख्या मिटून गेलेल्या. पुसलेल्या.
ती अचंबित झाली. इतका बदल? गावात, गल्लीत, दुकानांत, घरांत? लोकांच्या चेहऱ्यातही? स्मृतीतही? ती तर खिजगणतीतही नव्हती तिथे कुणाच्या. ती ज्यांना ओळखायची तेही गाव सोडून दूरदूर निघून गेलेले. असे कसे कुणी आपले गाव सोडू शकते? मी सोडले कारण माझा नाईलाज होता. माझे एका अत्यंत कठोर कुटुंबात लग्न झाले होते..तिचे मन प्रश्नोत्तरात हेलकावू लागले. आपली आठवण विसरून गेलेल्या आपल्या घराला, गावाला स्मृतिभ्रंशांच्या आजारातून काढण्याची तिची केविलवाणी धडपड पाहून तिच्यावर चिडचिड करणाऱ्या नातीही अचल होऊन तिला धरून उभ्या राहिल्या. ज्या घराच्या, गावाच्या आठवणी माखून आईने आपले पूर्ण बाल्य, युवावस्था वश करून ठेवली, आपल्याला वर्तमानकाळातील कुठल्याही नातलगांच्या जवळपास फटकू दिले नाही ते घर दिसतच नाही म्हंटल्यावर तिथे येण्याच्या अर्थशून्य परिणामांनी मुलीही हतबल झाल्यात.
"अग हेच ते तुझे घर ..."
बळ नसल्यासारख्या त्या तिला समजवू लागल्या पण येतांनाचा सर्व उत्साह मावळला होता. नव्हे, कधी ना कधी या वास्तूला भेट देऊ म्हणून तगवून ठेवलेला जीव पार उसवून उसवून गेला होता. हाती शून्य आणि डोळ्यात अनेक प्रश्न उमटले होते. या घराच्या आठवणीत ती कधी नणंदाभावजयात मिसळली नव्हती. सासरचे लोकं आपल्याला सतत क्षतीच पोहचवतात म्हणून मुलींनाही तिने आठवणींच्या पंखात घट्ट झाकून ठेवले होते. आज संधी मिळताच त्या आठवणींना कवटाळायला ती इथे आली तर या गावालाच स्मृतिभ्रंश झाल्यासारखा दिसत होता.
काय करावे? काय करावे? तिला कळेना. अंधार भरून आला होता. "सकाळी जाऊन संध्याकाळी परत येतो आम्ही" असे नवऱ्याला सांगितले होते. जुने काही सापडल्याशिवाय परत कसे फिरणार? तिथेच रेंगाळणारे मन बळेच गोळा करून जडशीळ पावलांनी ती गाडीत बसली खरी पण नजर या त्या ठिपक्यावरून शोध घेत केविलवाणी उडत होती. जुन्या ओळखीच्या खुणा धुंडाळत होती.
हसूच आले तिला मलूलपणे. लग्न झाल्यापासून स्मृतिरंगात वावरली होती ती. माहेरच्या तलम आठवणींचे स्मरण तिला वास्तवात जगण्याचे बळ द्यायचे. म्हणून तिचा तिनेच केलेला "स्मृतिउत्सव" हा शब्दप्रयोग!खराच ठरला की मग तो शब्द, तिचे एक मन तीक्ष्णपणे ठासून म्हणाले. उत्सव म्हणजे अत्तरबित्तर लिंपून निव्वळ मिरवणे, समारंभात सजणे, भरजरी वस्त्र परिधान करणे एव्हढेच असते का गं? उत्सवाच्या मागे केव्हढी तयारी, केव्हढी पडझड, केव्हढे कष्ट, केव्हढी तगमग असते. तिच्या दोन मनांचे आपापसातच द्वंद्व जुंपले.
"स्मृतिउत्सव नाहीच हा, हा आहे स्पष्ट स्मृतिभ्रंश...." ती शून्यात नजर लावून हातवारे करीत बडबडू लागली. मेनोपॉजदरम्यान स्वतःच स्वतःशी संवाद साधायची तिला ही विचित्र जीवघेणी सवय जडलेली. जवळपास कुणी नाही हे पाहून ती एकटीच बडबडत असायची. कुणी आले, कुणाची चाहूल लागली की, "काय गं काय झाले" असे स्वतःच उलट विचारायची.
"मम्मा, आजीचे सोडियम कमी झाले का? बघ एकटीच बडबड करते आहे ही" तिच्या काळजीपोटी नातीने हळूच स्वतःच्या आईला बोट रुतवत विचारले. मुलीही तिचा मानसिक धक्का उमगून तिला खोलवर न्याहाळू लागल्यात. येतांना उत्साहाने सळसळणारे आपल्या टॅक्सीतील प्रवासी असे अचानक गपगुमान झाल्यावर टॅक्सी ड्रायव्हरही गंभीर झाला. गाडीतले गाणेबिणे बंद करून एकाग्रतेने गाडी चालवू लागला.
हृदयाला पीळ पाडणारे तिचे गाव काळोख लपेटून घेत मागे मागे सुटत होते. पळती झाडे झुलत होती. धुरांच्या रेषा हलत होत्या.....गावात जाऊनही गाव न भेटल्यासारखे वाटत होते. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर गावात जायला मिळाल्याचा आनंद मानावा की काहीच परिचयाचे न सापडल्याचा क्लेश सोसावा याबाबत ती संभ्रमित झाली. गाडीच्या पाठीमागच्या काचेकडे पुन्हा पुन्हा वळून पाहू लागली. न जाणो एखादी जुनी पुराणी हळुवार कोवळी साद यायची नि तिच्यातली छोटी सालस पोर पुन्हा हसायला लागायची.
परंतु दृष्टिपथास काळ्या घनदाट दुष्ट रात्रीशिवाय काहीच दिसत नव्हते. त्या काळीमेत तिचा भूतकाळ गडप होत होता. गाडी जरी वेगाने पुढे, पुढे जात होती तरी परकराचा काचा खोचलेली सुमती आणि नक्षीदार जाळीचा बुरखा घातलेली खजिस्ता आपल्याला हाक मारत मागून धाव्वत येतायेत असे सजीव भास तिला व्हायला लागले होते.
