डिस्चार्ज
डिस्चार्ज
गावकुसाबाहेरचा मोकळा भाग. ती रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसली होती. थकली नव्हती पण मनातल्या असंख्य विचारांनी घायकुतीला आलेली होती. कसेतरी संसाराचे गाडे सुरू होते, त्यात हे अचानक उद्भवलेले संकट. तीन दिवसांपूर्वी तिचा नवरा, रमेश सकाळी उठला ते प्रचंड खोकलतच. दोघांना वाटले आत्ता बसेल, मग बसेल. ठसका असेल खेस असेल. थांबायचे नाव नाही. दहा साडेदहाला डॉक्टरांना दाखवले, त्यांचा रिपोर्ट संध्याकाळी सात वाजता मिळाला.
'न्युमोथेरॉक्स' निदान झाले होते.
ताबडतोब ऍडमिट करा म्हणालेत. मग सुरू झाली धावपळ. कारण त्यांच्या गावापासून दवाखाना वीस किलोमीटर अंतरावर होता. गाडी पकड़ून जायचे होते. दवाखान्यात जाऊन ऍडमिट करतपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता. आजचा तिसरा दिवस. ती घरी आली की तिचा भाऊ दवाखान्यात बसायचा. एव्हाना तिचे सासरे आणि वडीलही मदतीला आलेले होते. सासऱ्यांच्या कोरड्या आणि वडिलांच्या अलिप्त वागण्या-बोलण्याने ते सोबत असूनही तिला एकटे वाटत होते.
आताही ती दवाखान्यातच जायला निघाली होती. आंघोळ आणि जरा फिका निळसर रंगाचा ड्रेस घातल्याने तिला बरे वाटत होते. रमेशच्या निमित्ताने पहिल्यांदाच तिने आयसीसीयू वॉर्ड पाहिलेला. तिथले डॉक्टर, नर्सची लगबग, इंजेक्शन, सलाईनच्या सुया, तोंडावर ठेवलेला ऑक्सीजन मास्क, नाकातल्या नळया वाटायचे तितके भयानक नसतेच. एका बेडवरचे पेशेंटचे जगणे,
आजूबाजूचे रुग्ण जर आपले मानले आणि बराचसा धीर ठेवला तर आपला माणूस बरा होऊन घरी येऊ शकतो याची तिला खात्री पटली होती.
इस्पितळाच्या आवारात पाऊल ठेवत नाही तोच "हैल्लो मैडम" असा बेरकी आवाज तिच्या कानावर आला व ती भयानक दचकली. इच्छा नसतानाही आवाजाच्या दिशेने तिचे लक्ष गेले. दोन दिवसांपासून तिच्या पाळतीवर असणारा लिफ्टमॅन तिथे उभा होता. पहिल्या दिवशी अति तणावात घाईघाईत लिफ्टमधून उतरताना तिने लिफ्टमॅनला सहज बोलताना पहिल्यांदाच एव्हढ्या मोठ्या हॉस्पिटलला येतेय. घाबरल्यासारखे होतंय वगैरे सांगितले होते.
"मी मदत करेन, नाश्ता वगैरे इथल्या कॅंटीन मध्ये मिळतो, घरून दगदग करून आणायची गरज नाही." असे तो बोलला होता. ते जुजबी संभाषण, तो लिफ्टमॅन दिवसभरात ती विसरूनही गेली होती.
संध्याकाळी मात्र जेव्हा तो अगदी पुढयात येवून ठाकला आणि "क्या मैडम" करायला लागला त्यावेळी तिची भीतीने गाळण उडाली. हा माणूस साधा नसून हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे असे तिच्या ध्यानात आले. सावध होऊन रमेशचा वॉर्ड नंबर तिने खोटाच सांगितला. न जाणो हा विकृत माणूस त्यालाच इजा करायचा.
लाळघोटपणे प्रश्नामागून प्रश्न विचारात तो तिला अदृष्य अशा जरबेने बोलायला भाग पाडत होता. तिलाही कळत नव्हते आपण त्याला का घाबरतोय. त्याला पाहिल्यावर आपल्याला दरदरून घाम का फुटतोय? आपण त्याला धुडकावून का लावू शकत नाहीये? आपण त्याची तक्रार का करु शकत नाही?
आपण याच्या विरुद्ध गेलो तर हा रमेशला हानी पोहचवेल अशी भीती आपल्याला का वाटतेय ? जाऊ दे आपण दुर्लक्ष करू, काय करणार आहे हा, असा विचार करून ती त्याला टाळू लागली. तो अधिकाअधिकच चेव चढल्यासारखा करू लागला. तिच्या यायच्या जायच्या वेळा त्याने बरोब्बर लक्षात ठेवल्या. ती कुठूनही कशीही निसटू लागली तरी तो अचानक पुढ़यात येऊन टपकायचा. हा एकटा नसून याच्या सोबतचे तीनचार जण आपल्या पाळतीवर आहे हे एक दिवस तिच्या ध्यानात आले. म्हणूनच ती कुठून कुठे चालली हे त्याला लगेच कळायचे आणि तो तिला गाठायचा. ती हादरूनच गेली. रमेशचा इलाज करणाऱ्या डॉक्टरांना सांगावे का? तक्रार केली तर हा सूडाने वगैरे तर पेटायचा नाही? आपल्यालाच काही करायचा. जाऊ दे ना, आता दोनतीन दिवसात रमेशला डिस्चार्ज मिळेलच. मग याचे तोंडही पहायची गरज नाही.
त्याला टाळतो हे त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून ती त्याच्याशी मनात नसतानाही थोडे थांबून बोलू लागली. तिला खूप चिड यायची, अस्वस्थ वाटायचे. बोलायची इच्छा नसायची. आपण का इतके असहय्यसारखे वागतोय, याला विरोध का करत नाही? कसली भीती वाटते आपल्याला? मनात येणाऱ्या असंख्य विचारांसह ती डिस्चार्जच्या आशेने आला दिवस ढकलत होती. त्यात ऍडमिट असल्यानंतरही रमेशचे खाण्यापिण्याचे चोचले, आयसीयूतून आल्यावर जनरल वॉर्डमध्ये न राहता स्पेशल रूमचा हट्ट, त्याचे ज्यादा भाड़े याने तिची ससेहोलपट होत होती. तुझ्याजवळ पैसे आहे नाही हा प्रश्न सासरे आणि रमेश तिला विचारतच नव्हते.
वडिलांनीच एक दिवस तिच्या हातात काही न बोलता तीसहजार ठेवले. तिला खूप लाजल्यासारखे, कानकोंडल्यासारखे झाले. दुसरी कुठलीच सोय नव्हती, गरज होती म्हणून तिने ते घेतले. तिला वाटले रमेशला सांगितल्यावर तो म्हणेल, लवकर वापस करून देऊ हं. तर, तो उलट म्हणाला, "त्यांचे कामचं होते देणे, त्यांना काय कमी आहे?"
तिच्या धाकट्या बहिणीचे लग्न महिनाभरावर आलेय हे त्यालाही माहिती होते. अशावेळेस त्याने निक्षून त्यांचे पैसे परत करावे असे तिच्या मनात येत होते. पण तो तसे साधे काहीच दर्शवतही नव्हता. एकंदर परिस्थितीने तिचाही नाईलाज झाला होता.
"डिस्चार्ज तो नहीं है ना इतनेमें?" तिची देहबोली खोलवर हुंगत लिफ्टमॅनने विचारले. तिला शिसारीच आली. त्याच्या थोबडीत दयायला हात शिवशिवले. एक अनाहूत भीतीही पायापासून डोक्यापर्यंत सरकत गेली. खरेच रमेशला तासाभरात डिस्चार्ज मिळणार होता. तिला खूपसे मोकळे सुटल्यासारखे वाटत होते. याला आपल्या डोळ्यातून ते कळले का ?
पटकन चेहरा पाडत ती म्हणाली,
"अभी कहाँ, अभी तो एक हफ्ता और बाकी है" ।
"अच्छा अच्छा, सुन तू कहा रहती है, कल रेल्वे स्टेशनकी तरफ जाते दिखी." तिचा उर धपापलाच. याला आपल्या गावाचे नाव कळले की काय ?
"नहीं तो, मैं वहाँ कहाँ जाऊंगी, किसी और को देखा होगा, मैं तो सरस्वती विद्यालय के पास रहती हू "
"प्लाट नंबर ?"
"43"
अर्ध्या तासाने डिस्चार्ज झाला तेव्हा तिला धाकधूकच होत होती. या आठ दिवसात तिच्या सोबत झालेले हे सर्व अघटीत तिने कोणालाच न सांगितल्याने ती अधिकच घुसमटत होती. सावध म्हणून आधीच रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट काढायचा तिने बहाणा केला. दहा मिनीटात तिचा भाऊ रमेशसहीत पोहचलाच. गाड़ी आली. पाऊण एक तासात ते सुखरूप घरीही पोहचलेत.
नित्याचे रहाटगाडगे सुरू झाले. पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत ट्रेनचे आवाज तिच्या कानावर सरसरत राही. तिला खूप आवडायचे ते आवाज. सारखे वाटायचे आपणही ट्रेनमध्ये बसून असेच दूरवर फिरायला जावे. रेल्वे रूळ, धडधडती आगगाड़ी, प्रवाश्यांनी फुललेले प्लेटफार्म, विविध वस्तू विकणारे विक्रेते तिला खूप छान वाटायचे. पण याच ट्रेनने तिला सतत इस्पितळात जावे लागले आणि एका जीवघेण्या माणसाचा सामना करावा लागला याची तिला प्रचंड धास्ती बसली.
आपण त्या लिफ्टमॅनच्या विरोधात जोरात आवाज का नाही उठवला हाही प्रश्न तिला पडायचा. झाले गेले तेही दिवस असे म्हणून ती स्वतःला शांत करायचा प्रयत्न करायची. तरी त्या आठवणींनी ती मधेमधे दचकायची. एकदोनदा रमेशने तिचे दचकणे पाहीले आणि तो शांतपणे म्हणाला, "झालाय ना आता मला डिस्चार्ज".
"हो झालाय की...... डिस्चार्ज........ " ती हळूच पुटपुटली.

