बालाजी उर्फ आमिर
बालाजी उर्फ आमिर
विद्यावाचस्पती व्यंकटेश पंडितांनी गरम, गरम शिरा संपवून जशी प्लेट बाजूला ठेवली तसा बालाजीही आपला नाश्ता आटोपून उठला. आज शाळेत जायची घाई नसली तरी आधार कार्ड केंद्रावर लवकर पोहोचायचे होते. दहावीचे वर्ष असल्याने शाळेत आधार कार्ड देणे भागच होते. त्याच्याजवळ आधार कार्ड नसल्याने त्याची पंचाईत झाली होती.
या आधीही तो तीन चारदा वडिलांसोबत, त्यांना वेळ नसताना आईसोबत आधार कार्ड काढायला केंद्रावर गेला होता. एका केंद्रावर निघाले नाही म्हणून गावातल्या सगळ्या केंद्रावर जाऊन आला होता. पण त्याचे आधार कार्डच तयार होत नव्हते. काही ना काही अडचण येऊन प्रत्येक ठिकाणचे केंद्र प्रमुख नवनवीन केंद्रावर पाठवीत. शेवटी इकडेतिकडे फिरून तो, आई, पंडित पार कंटाळून गेलेत. काही दिवस त्यांनी आधार कार्ड काढायचा नादच सोडला.
दहावीत आल्यावर मात्र बोर्डाच्या परीक्षेसाठी आधार कार्ड गरजेचेच आहे हे मुख्याध्यापकांनी निक्षून सांगितल्यावर त्यांची पुन्हा आधार कार्डसाठी धावाधाव सुरू झाली. परत कुठेच आधार कार्ड निघत नसल्याने आणि न निघण्यासाठी नेमकी कुठली गोष्ट आडवी येतेय हे समजत नसल्याने बालाजीच्याच वर्ग शिक्षकाने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य केंद्रात जाऊन विचारपूस करायला सुचविले.
जिल्हाधिकारी केंद्रालयात चौकशी करू व तिथेच सोय असल्यास आधार कार्ड काढून घेऊ म्हणून मग पंडित बालाजीसह त्वरित निघाले. कार्यालयातल्या प्रत्येक विभागातील गर्दी बघून पंडितांचे माथेच ठणकले. कारण सव्वाअकरापर्यंत येतो असा शब्द त्यांनी आमदार तिडके यांना दिला होता. आमदारांना श्रीयुत व्यंकटेश पंडितांच्या नेतृत्वाखाली शंभर ब्राम्हणांच्या हस्ते एका विशाल यज्ञाचे आयोजन करायचे होते. पंडितांची विद्वता, ज्ञान पारंगतता, अचूक मंत्रोच्चारांचा उल्लेख याबद्दल अख्ख्या पंचक्रोशीत कुणालाही दुमत नव्हते.
दहा वाजता बालाजीच्या नावाचा पुकारा झाल्यावर पंडितांनी हुश्श केले. काम लवकर आटोपेल असे दिसत होते. बालाजीच्या डोळ्यांचे, अंगठ्याचे, पंजाचे नमुने घेण्यात आले. तेव्हढ्यात ती प्रक्रिया करणारा कर्मचारी पुन्हा अडखळला. सतत नेमके असेच होत असे. आता पुढे काय म्हणून बालाजी आणि पंडित त्या इसमाकडे पाहू लागले. तर तो विचित्र शंकेने त्यांच्याकडेच बघत होता.
"अहो याचे आधार कार्ड तर कधीचेच निघाले आहे दोन हजार अकरा साली हा पाच वर्षांचा असताना..पुन्हा दुसरे आधार कार्ड कसे तयार होईल?"
पंडितांना कोडेच पडले. आपण तर बालाजीला आधार कार्ड करायला आणले तेव्हा तो सात वर्षाचा होता. त्या आधी.. त्या आधी....? पंडित खोल विचारात बुडाले. त्यांच्या नजरेतील चलबिचल बघून त्या कर्मचाऱ्याने त्यांना आपल्या वरीष्ठांकडे नेले. त्यांची आपापसात हळू भाषेत काही कुजबुज झाली. त्यानंतर पंडितांकडे एक तीव्र कटाक्ष टाकत वरिष्ठ अधिकाऱ्याने टेबलावरील प्रिंटरच्या बटना कटकट दाबत सर्रकन एक प्रिंट आऊट बाहेर काढत चढ्या स्वरात त्यांना विचारले, "नाव काय म्हंटलं या मुलांचं?"
"बालाजी व्यंकटेश पंडित"
"जात?"
"ऋग्वेदी ब्राह्मण"
"खरं बोलताय ना?"
”त्यात खोटं बोलण्यासारखं काय?" पंडितांनी आश्चर्याने विचारले. अधिकाऱ्याने नुकतीच काढलेली प्रिंट आऊट त्यांच्या पुढे धरली आणि दरडावून सांगितले, "यातले या मुलाचे नाव वाचा काय आहे ते?" पंडितांनी पुढ्यातल्या कागदावर झरझर नजर फिरवली.
"आमिर मजाझ शेख रियाझ कुरेशी"
त्यांना क्षणभर भोवळच आली. आपल्या बालाजीचे पूर्वाश्रमीचे नाव हे आहे? त्यांच्या डोळ्यासमोर आधीचा छोटासा गोंडस बालाजी आला. छान कुरळ्या केसांचा, चमकदार डोळ्यांचा, गुटगुटीत. पाच सहा वर्षाचं पोर झालं तरी बोलता येत नव्हतं त्याला. डॉक्टर म्हणाले होते बोलेल हा, उशिरा बोलेल, हा मुका नाही. किती प्रेमाने काळजीने सांभाळला होता त्यांनी त्याला.
"काय गौडबंगाल आहे पंडित हे? मुलाचे नाव मुस्लिम, धर्म इस्लाम आणि तुम्ही म्हणता धर्म हिंदू, जात ब्राम्हण, नाव बालाजी. आय एम सॉरी मला पोलिसांना बोलवावे लागेल."
पंडितांना एक अक्षरही बोलायचीही उसंत न देता पटापट पुढचे सोपस्कार पार पडू लागले. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बालाजीला बाजूच्या खोलीत बसवून विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर सुरू झाली. पंडित खरेतर वेगळ्याच जुन्या गलबल्याने आतून हलले होते. त्यांच्यासमोर अतीव मायेने बालाजीला कवटाळणाऱ्या पत्नीचा अश्राप चेहरा येत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते विनाकारण चाचरत होते. भांबावत होते. त्यांची गोंधळलेली मनस्थिती, विसंगत उत्तरे पोलिसांना अधिकच संशय घ्यायला भाग पाडत होते.
बालाजी मात्र वऱ्हांड्यात बेफिकीर बसला होता. पारंपरिक ब्राह्मण घरातले आपण, आपले नाव कसे आमिर कुरेशी असणार? काहीतरी गल्लत झालीय नक्की. थोड्यावेळाने त्यालाही आत बोलावले. निरनिराळ्या प्रश्नांनी पोलीस त्याचाही जीव खाऊ लागले. त्यांना घरी सोडले तेव्हा दोघांचेही डोके भयंकर पिंजून गेले होते.
घरी गेल्यावर लगबगीने आई समोर आल्यावर बालाजीला नेहमीसारखे तिला बिलगणे जमले नाही. एका सेकंदात पोलिसांनी त्याला सांगितले होते तू यांची संतती नाही. इतकेच नाहीतर तुझी जात, कूळ, धर्म सुध्दा वेगळा आहे. पोलिसांचा तो कठोर आवाज सारखासारखा त्याच्या कानात घोंगावत होता.
मागे एकदा गल्लीतल्या नाल्या साफ करणाऱ्या क्षुद्र जमातीच्या बायकांचा आईला चुकून स्पर्श झाल्यावर पंडितांनी समोरच्या अंगणातच तीन चार थंडगार पाण्याचे कुंभ आईला शुद्ध शुचित करण्यासाठी तिच्या डोक्यावर ओतल्याचे त्याच्या चांगलेच लक्षात होते. पंडित कडक सनातन घराण्यातले होते. शुद्ध-अशुद्ध, स्पर्श-अस्पर्शाच्या त्यांच्या अद्यापही विशिष्ट धारणा होत्या.
पंडितांना पाण्याचे फुलपात्र दिल्यावर आई त्याच्याकडे वळली. तिने त्याचा घामेजला चेहरा पदराने पुसला तेव्हा नकळतच त्याचे डोळे आईच्या डोळ्यांकडे गेले. असेच तर दिसतात आपले काळेकथ्थे डोळे. असाच तर आईसारखा लंबगोलाकार चेहरा आहे आपला अन् पोलीस म्हणतात ही आपली आई नाही? त्याचे मन काहूरले. तो मटकन खाली बसला. काय झाले रे म्हणत आई त्याच्याकडे धावणार तोच पंडितांनी हातातला कागद तिच्या दिशेने सरकवला.
"निघाले का आधार कार्ड? अहो हे कुणा मुस्लिम मुलांचं दिसतंय" नजर फिरवून आईने कागद वापस केला.
"फोटो बघ त्यावरचा", पंडितांचे शब्द जिभेवर लडखळू लागले. आईने पुन्हा बारकाईने फोटो बघितला आणि शॉक लागल्यासारखा कागद पंडितांच्या हातात देत पुटपुटली, "अहो काय आहे हो हे?" मग मनात आलेल्या साऱ्या दुष्ट विचारांना झिडकारून म्हणाली, "आपल्या बालाजीच्या लहानपणच्या फोटोसारखाच फोटो दिसतो खरा हा पण हा कुणीतरी दुसराच मुलगा असावा, तुम्ही कशाला आणला हा कागद? आपला काय संबंध?"
"पोलीस म्हणतात हा लहानपणचा बालाजी आहे म्हणजे म्हणजे आमिर....आमिर कुरेशी आहे", पंडितांचा आवाज जड होत होता. शब्द स्वतःच्याच घशात तिरासारखे घुसत होते.
बालाजी तर शून्यात हरवला होता परंतु पंडित आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यासमोर मात्र अकरा वर्षापूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा तरळत होता. गावातल्या नुकत्याच जीर्णोद्धार केलेल्या विठ्ठल मंदिरात काल रात्रीपासून एक पाच वर्षाचा मुलगा रडत असल्याची बातमी त्यांच्याही कानावर आली होती. लहानग्या घाबरलेल्या कावऱ्या-बावऱ्या मुलाला पाहून दोघांचेही मन द्रवले. त्यांनी सरपंच, पोलीस पाटील सर्वांना सांगून मुलाच्या आईवडिलांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला. वर्तमानपत्रात मोठी जाहिरातही दिली. पण पुष्कळ दिवस झाले तरी मुलाचा ताबा घ्यायला कुणीच येईना तेव्हा एक दिवस दबकत दबकत पत्नीने पंडितांना विचारले, "आपणच ठेवून घ्यायचे का मुलाला?"
पत्नीचे अपत्यासाठी आसुसणे पंडितांना ठाऊक होते. एव्हाना पंडितही पंचेचाळिशीचे झाले होते. मूल होण्याची शक्यता जवळपास मावळली होती. त्यांच्या विद्वान घराण्याचा वारस सांगणारा एखादा पुत्र त्यांनाही हवाच होता.
"न जाणो कुठल्या जातीचा आहे की पण..." पंडितांची विचारधारा माहिती असल्याने पत्नीने शंका उपस्थित केली.
"नाही नाही, घरंदाज शालीन संस्कारी कुळातला ब्राम्हणच असावा हा मुलगा, त्याचे रंग रूपच सांगतेय तसे", पंडित तात्काळ उत्तरले. दोघांनी संततीच्या आसेपोटी त्या हरवलेल्या लहान मुलाला दत्तक घेतले. बालाजी असे त्याचे नामकरण करून त्याला ममतेने वाढवले. बरेचदा ते दोघेही त्याला पूर्वीचे काही आठवते का म्हणून चाचपडत पण बालाजी मुळातच उशीरा बोलायला लागला आणि बोलायला लागल्यावर त्यांच्या कुटुंबात चांगलाच रमला होता. जणू त्याची मागची पाटी पुसूनपासून लख्ख कोरी झाली असावी इतका तो त्यांच्यात मिसळला. बालाजीच्या सानिध्याने पंडित व त्यांच्या पत्नीच्या निरस, एकसुरी, जरड, कंटाळवाण्या उदास आयुष्याला नवी पालवी फुटली. त्यांच्या संसाराला सुंदर पूर्णत्व आले.
तोच तो लहानगा, निरागस बालाजी आता त्यांचा पुत्र नाही हे एका कागदाने स्पष्ट केले होते. त्यात मुस्लिम... पंडितांची पत्नी एकदम धसकली. तिला तर आधी पंडितांचीच भीती वाटली. हेच बाहेर काढतील की काय आता बालाजीला?
"मुस्लिम तर मुस्लिम, असू द्या मला काही फरक पडत नाही. हा माझा मुलगा आहे बालाजी, मी याला कुठेच जाऊ देणार नाही, समजलं का?" पत्नीचा तावातावाचा भेदरलेला सूर ऐकून पंडित जागचे उठले, त्यांनी बालाजीच्या डोक्यावर थोपटले. पत्नीसारखीच पोराच्या मनातली प्रचंड उलथापालथ त्यांना कळत होती. परंतु त्यांचा नाईलाज होता. ते दोघांनाही उद्देशून म्हणाले, "आज किंवा उद्या बालाजीचे वडील...क्षमा, क्षमा अब्बाजान येतील" पुढचा 'घ्यायला' शब्द त्यांनी मुद्दामच उच्चारला नाही तरी त्या दोघांना कळायचा तो कळलाच.
पंडीतांच्या पत्नीच्या डोळ्याला अखंड धारा लागल्या तर बालाजी बालपणासारखा मूक, स्तब्ध झाला होता. हा क्षण सरूच नये. घरात आपल्या तिघांशिवाय अन्य कुणी नवे येऊ नये असे त्यांना वाटत होते. पण वाटणे आणि प्रत्यक्ष जगणे यात फार तफावत असते हे पुन्हा एकवार काळाने सिद्ध केले. तास दोन तासातच बऱ्हाणपूरवरून सरपंचांकडे फोन आला. होईल तितक्या लवकर तेथील प्रसिद्ध जिलबी व्यावसायिक मजाझ शेख पंडितांकडे महत्वाच्या कामाला येणार हा निरोप मिळाला.
अख्ख्या गावात दबदबा असणाऱ्या पंडितांची छाती दडपली. पंडित पत्नी ते लोक येऊ नयेत म्हणून दिसेल त्या देवाचा धावा करू लागली. बालाजी त्यांचा पुत्र होता. कसा कुणाला देऊन देणार? बालाजीची किशोरवयीन मनोवस्था खूपच बिकट, विस्कटलेली होती. आपण यांचा मुलगा नाही ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती.
प्रखर जातीधर्म मानणाऱ्या पंडितांनी अदबीने मजाझ शेख आणि त्यांच्या बेगमला जेव्हा समोरच्या खोलीत बसविले तेव्हा आडोशाला उभ्या असणाऱ्या बालाजीच्या डोळ्यांत घळाघळा अश्रूच आले. पंडित पत्नीच्याही तोंडून दबका हुंदका बाहेर पडलाच. पंडितांनी हाक मारताच अनिच्छेने बालाजी बैठकीत आला. त्याला पाहताच त्याचे किंचित निरीक्षण करत शेखसाहेबांच्या बेगमने त्याला आवेगाने जवळ ओढत ओल्या डोळ्यांनी मुके घ्यायला सुरुवात केली. बालाजी प्रचंड बावचळला. सोडवून घ्यायचा यत्न करू लागला. तेव्हढ्यात पाणावलेल्या नेत्रांनी जागेवरून उठत शेख साहेबांनी त्याला मिठीत घेतले. किती वेळ किती वेळ शेख मियाबीबीचे बालाजीला कुरवाळणे सुरू होते. ओळखी अनोळखी नात्याच्या सीमेवर घुसमटणाऱ्या बालाजीला पंडित दांम्पत्य अगतिकपणे पहात होते.
बालाजीला, पंडित जोडप्याला परवानगी मागायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. शेख साहेबांनी आणलेल्या कागदपत्रांवरून, जुन्या आधार कार्डवरून, फोटोच्या अलबमवरून ते आमिर हरवला ही खबर वारंवार पेपरला छापल्याच्या कात्रणावरून पोलीस पंचांसमोर बालाजी हा शेख कुटुंबाचा मुलगा आमिरच आहे हे निःसंशय सिद्ध झाले होते. वारंवार पंडित जोडप्याचे आभार मानून ते बालाजीला घेऊन निघाले तेव्हा खुद्द पंडित यांचाही बांध तुटला. सुखी रहा हे शब्दही त्यांच्या मुखातून फुटेना. आपल्या काळजाचा तुकडा कोसो दूर जाणार या धक्क्याने पंडित पत्नी कोलमडून गेली होती.
ज्या गावात वाढलो, पंडितांचा पुत्र म्हणून मिरवलो, प्रेमळ आईची, मित्रांची साथ लाभली त्या गावाला सोडताना बालाजी उर्फ आमिरला अनंत यातना होत होत्या. कायद्यापुढे त्याचे मत विचारायचीही तसदी कुणीच न घेतल्याने त्याला शेख साहेबांसोबत निघणे भागच पडले होते. संपूर्ण प्रवासात आत्यंतिक क्लेशाने त्याने डोळे मिटून घेतले.
गाडी थांबली तेव्हा तो एका नवीनच हवेलीपुढे उभा होता. हिरव्या रंगांच्या त्या भिंती त्याला अपरिचित वाटल्या. त्याच्या घरी असत तशा देवाच्या तसबिरी, देवघर किंवा राळ, कापूर, धुपाचा सुवास इथे गंधाळत नव्हता. जेवणातही गोष्त, चिकन असा मांसाहार. त्या वासानेच त्याला कसेसे झाले. तो ताडकन पानावरुन उठला. शेख साहेबांनी रात्री त्याचे पंडितांशी बोलणे करून दिल्यावरही प्रचंड बेचैनीमुळे त्याला झोप येईना.
कितीही आठवले तरी त्याला त्या कोठीत जुने परिचित असे काहीच स्मरत नव्हते. शेख साहेब, बेगमजान त्याला या त्या खोलीत नेऊन त्याच्या लहानपणच्या अनेक गोष्टी सांगत पण तो तरी काय करणार त्याच्या त्या साऱ्या आठवणी कधीच्याच पुसून गेल्या होत्या. आठवत होते ते फक्त पंडित दांपत्याचे प्रेमळ स्पर्श. आपलेपणा.
दिवसेंदिवस बालाजी अधिकाधिक गुमसुम होत चालला होता. त्याचा टवटवीत चेहरा कोमेजून गेला होता. अवघी जीवनेच्छाच नष्ट झाल्यासारखा तो एकट कोपऱ्यात पडून रहायचा. एका सायंकाळी त्याला सारे सत्य पेलवणे असहय्य झाले. तो उन्मळून उठला. "बाळ त्या जगतगुरुला शरण जावे", पंडितपत्नीचा-आईचा आवाज त्याच्या कानी घुमला. त्याने हवेलीत असणाऱ्या साईच्या छायाचित्रापुढे उदबत्ती लावली. निरांजन सापडेना तेव्हा एका वाटीत तेल घेऊन दिवा पेटवला आणि मनातला कोलाहल शमविण्यासाठी अत्यंत आर्तपणे रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.
श्रीराम चन्द्रचरणौ मनसा स्मरामि,
श्रीराम चंद्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीराम चन्द्रचरणौ शिरसा नमामि,
श्रीराम चन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥
माता रामो मत्पिता रामचन्द्रः
स्वामी, रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं,
जाने नैव जाने न जाने ॥
रामो राजमणिः सदा विजयते,
रामं रमेशं भजे रामेणाभिहता,
निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं,
रामस्य दासोस्म्यहं रामे चित्तलयः
सदा भवतु मे भो राम मामुद्धराः ॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥
जणू शब्दांच्या देहातून...
जणू देहाला शब्दांतून तो जलदगतीचे पंख लावून गावाकडे नेऊ बघत होता.
"अल्ला का नाम ले बेटा अल्ला का नाम ले, ये हिंदूओकी प्रार्थना है" बेगमअम्मी त्याला समजवत होती. पण हवेलीतल्या कुणाचेच शब्द त्याच्या कानापर्यंत पोहचत नव्हते. शेवटी भावनातिरेकाने त्याची शुद्ध हरपली तेव्हा शेख कुटुंब घाबरले. त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञाला पाचारण केले.
डॉक्टर, मानसोपचार तज्ञांनी जे सांगितले ते ऐकून शेख नवराबायको भयंकर रडवेले झाले. "याला जिथून आणले त्या वास्तूत परत नेऊन सोडा".. त्यांनी आमिरच्या तोंडाकडे खूप आशेने पाहिले पण त्यांना त्यांचा आमिर कुठेच गवसेना. त्यांच्या पुढ्यात केवळ बालाजीच होता. पंडित दाम्पत्याचा बालाजी. या बालाजीच्या अंतरंगात त्यांचा आमिर कधीचाच लुप्त झाला होता आणि तो काही केल्या त्यांना मिळत नव्हता. निरुपयाने मनातला कल्लोळ दाबत त्यांनी जराही वेळ न दवडता पंडितांच्या घराचा मार्ग धरला.
कित्येक दिवसांच्या तहानल्या रोपट्याला पाणी द्यावे नि त्या रोपट्याने जीव धरावा तसे पंडित पती-पत्नीला बघून बालाजीला झाले. तो आईच्या पदराआड धाय मोकलून रडू लागला तेव्हा सगळे गावकरी गहिवरले.
"आपका बेटा है, आपकी अमानत है भाभीजी, कभी कभी हमसे मिलने लाया किजीए पर" शेख साहेबांची बेगम रुद्ध कंठाने पंडित पत्नीला म्हणाली. इतक्या वर्षांनी मिळालेल्या मुलाला हृदयावर दगड ठेवून पंडितांच्या हवाली करताना शेख साहेबांचाही गळा भरून आला. पंडित दाम्पत्याच्या डोळ्यांत त्या हळव्या मातापित्याच्या अनोख्या जगावेगळ्या कृतीने कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले. कुणालाच काहीच बोलवेना. सारे निःशब्द झाले.
आपण अजून जास्त वेळ इथे रेंगाळलो तर आमिरला सोडून जाणे महाकठीण होईल. त्याला पंडित दाम्पत्याला कायमचा सोपवायचा आपला निर्णय दुबळा पडेल या भीतीने शेख नवरा-बायकोने आसवांचा पूर पापणीतच अडवला. अनपेक्षितपणे सापडलेला आपला हरवलेला मुलगा सदासाठी तिथेच सोडून जातांना त्या मायबापाचा उर कमालीचा कापत असतांनाही त्यांनी भरभरून दुवा देत हसण्याचा प्रयत्न करत बालाजीला अलविदा म्हटले.
