काळोख पांघरून
काळोख पांघरून
आज अकरा वर्षांनी ती अत्रे कुटुंबियांना भेटणार होती. ते तिचे या गावातील जुने घरमालक. खरेतर अत्रेंच्या दारुबाज मुलामुळे, नानामुळे तिला त्यावेळी त्यांच्याकडे रहायची इच्छा नव्हती. कारण लग्न झाल्यानंतर खूप मुश्किलीने तिने नवऱ्याला, अविनाशला दारूपासून दूर करून कामधंद्यांवर लक्ष द्यायला भाग पाडले होते. नानामुळे तो पुन्हा व्यसनाधीन होण्याची शक्यता होती.
अविनाशच्या व्यसनाबद्दल गावात माहिती असल्याने त्याला स्थानिक जागी काम मिळेना. मिळाले तर वेतन अगदी अत्यल्प. तो हिंमत हारायचा. रिकामपणाचे हे नैराश्य त्याला पुन्हा व्यसनाकडे वळवेल की काय अशी भीती तिला वाटायची. मग धीर देत तिने त्याला मुंबईला जायचे सुचविले.
त्याला मुंबईलाही पाठवताना धाकधूकच होती. मोठे शहर, मोठी प्रलोभने. कमकुवत मेंदू पुन्हा वाईट गोष्टींच्या आहारी जायला वेळ लागणार नव्हता. पण आता कुठेतरी रिस्क घ्यायचीही वेळ आली होती. या गावात कमाईचा काहीच मार्ग दिसत नव्हता.
तो मुंबईला गेल्यावर ती गावी एकटीच असल्याने त्यांनी त्यांचा मोठा ब्लॉक सोडून अत्रेंच्या दोन खोल्यात बस्तान हलविले. या जुनाट घराचा किरायाही पुष्कळ कमी होता. तसेच एकटे राहताना नानाच्या पत्नी आणि आईची सोबतही होणार होती. नाना अत्रेमुळे ती रहायला नाखूषच असली तरी त्याची पत्नी व इतर सदस्य छान सज्जन, मनमिळावू होते. ती तिथे रमली. नानाच्या दारू पिण्याचा तिला काहीही त्रास झाला नाही.
तिचा बराचसा वेळ तिच्या छोट्या नोकरीत व अत्रेंच्या अंगणातील मोठ्या बागेत जायचा. झाडांना पाणी देताना नानाची दोन लहान मुले तिच्याजवळ येऊन अंग ओले करू लागली. मग मातीभरल्या अंगाच्या त्या मुलांना ती सरळ न्हाणीघरात नेऊन बुडबुड गंगे करत स्वच्छ अंघोळ घालायची. काकू आपल्यासारखीच दंगा मस्ती करते हे पाहून ती मुलेही तिच्या अंगावरची झाली. परंतु तिला खरी सोबत हवी होती ते रात्री झोपताना. तिच्या मागच्या खोलीचे दार फारच ढिले होते. समोरच्या फाटकाला पक्के कुलूप लावले तरी कुंपणावरून उडी मारून कुणी आत घुसेल ही भीती वाटायची. त्यापायी ती रात्र रात्र दिवा पेटवून जागी असे.
तिला तसे जागताना पाहून "वर माझ्याकडे झोपायला येत जा" असे नानाच्या आईने सुचविले. एकदोन दिवस गेलीही ती वर झोपायला पण रात्री नाना आल्यावर, त्या पती-पत्नीची खोली वेगळी असली तरी तिला तिथे संकोच वाटू लागला. आता काय करावे?
मंदार ! तिच्यासमोर एकदम नानाचा सहा वर्षाचा मुलगा आला. सहा वर्षाचा असला म्हणून काय झाले? पुरुषजात आहे! स्त्रीला पुरुषजातीचीच सोबत हवी. पुरुष सबळ असतो. रात्रीबेरात्री काही संकट आले तर स्त्रीपेक्षा अधिक सक्षमपणे तोच सामना करू शकतो. पुरुषही पुरुषाला पाहून घाबरतो, असेच म्हणायची ना आई?
ती एकटीदुकटी कुठेही जातांना दिसली की आई धाव्वत येऊन तिच्या लहान भावाचे बोट तिच्या हाती द्यायची. "याला सोबत घेऊन जा गं" म्हणायची. कधी तिचा भाऊ यायला तयार नसला तर शेजारपाजारच्या लहान मुलांना "सोबत घे" म्हणायची, अगदी शेंबड्या सहा महिन्याच्या एखाद्या मुलाला तरी तिच्या कडेवर द्यायची. "पुरुष सोबत असावा, म्हणजे आपण निर्धास्त असतो" हे आईचे लाडके पालुपद. त्यावेळी ती आणि तिच्या बहिणी आईच्या भित्र्या मनोवृत्तीवर खूप हसत. पण जेव्हा या अशक्त दाराच्या घरात तिला रात्रीबेरात्री एकटीने रहायची वेळ आली तेव्हा तिचीही पंढरी घाबरली. ती मंदारला खाली झोपायला चल म्हणून विनवू लागली. वेगवेगळ्या खाऊचे आमिष दाखवले. शेवटी तीनचार दिवसांनी मंदार तिच्याकडे झोपायला राजी झाला. तिला हायसे वाटले.
रोज रात्री अविनाशचा फोन यायचा. जवळ असताना अनेक गोष्टींवरून त्यांचे वाद व्हायचे पण दूर गेल्यावर अंतर जाणवून काळजात भेग पडली.
"हाय, झोप येते का?" तो विचारायचा.
"हो मग, माझा पुरुष आहे ना माझ्याजवळ" ती मंदारच्या जवळ सरकत उद्गारायची.
मंदार झोप चाळवून किलकिल्या डोळ्यांनी तिच्याकडे पहायचा. कसे दिसायचे रात्रीच्या अंधारात त्याचे डोळे? बुभुळे चमकल्यासारखे. तिला एकदम गल्लीतल्या रात्री उशिरा ओरडणाऱ्या कुत्र्यांची चर्या आठवे. काळोखात दुरून श्वापदांचे डोळे असेच चमकत, मग दडलेला जनावर दिसे. ती बोलणे थांबवून मंदारकडे पहात राही. इतका कोवळा निरागस पोर असा कसा दिसतो म्हणून सरर्कन दिवा लावी. "काकू दिवा बंद कर गं", मंदार कुरकुरे . ती बोलता बोलता दिवा विझवून त्याच्या छोट्याशा गुंडाळीला न्याहाळत राही.
वर्षभरात अविनाश मुंबईला व्यवस्थित स्थिरावला. तिनेही गाव सोडून मुंबईला जायची तयारी केली.
"मुलांना खूप आठवण येईल गं तुझी", नानाची बायको तिला जातपर्यंत म्हणाली.
मुलांनाच कशाला तिला सुद्धा त्या सर्वांची खूप आठवण येणार होती. त्यांनी तिला खूप माया लावली होती. जातांना रडवेल्या छकुली, मंदारने तिचा "नको जाऊ काकू" म्हणत गच्च हात धरला तेव्हा तिलाही रडू आले.
कितीतरी आठवणी तिच्या या घराशी निगडित होत्या. ती घाईघाईत आत शिरली. तिला बघताच छकुली बिलगली. मंदार दुरूनच बघत होता. इतक्या मोठ्या मुलाला जवळ कसे घ्यायचे म्हणून तीही थबकली. आपल्यासाठी तो अजूनही लहान बाळ आहे पण त्याला जुनी ओळख स्मरते की नाही? तिने विचारलेही चहा घेताना त्याला तसे. "हो" म्हणत मान डोलावली त्याने. लहानपणी अखंड बडबड करणारा मंदार शांत शांत वाटत होता.
मंदारला मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचे कळले. महाविद्यालय ती राहते त्या वस्तीपासून जवळ होते तेव्हा "तू आमच्यासोबतच चल, मी तुला रूम बघून देते" असे आश्वासन तिने मंदार आणि अत्रे कुटुंबियांना दिले. मुंबईला जातांना नाना आणि मंदार तिच्यासोबतच आले. तिच्याच घरासमोरची एक छोटी नीटनेटकी खोली तिने मंदारसाठी पक्की करून दिली. लवकरच मंदारचे कॉलेज सुरू झाले. तो आवश्यक सामान घेऊन तिथे रहायला आला.
आता येताजाता रोजच मंदारच्या भेटी होत. मंदारचे वागणे अचानक प्रौढ झाल्यासारखे वाटायचे. त्याच्या देहयष्टीत दडलेला पुरुष अधिक वेगाने बाहेर येतो आहे असा भास व्हायचा. कित्येकदा मंदार दारात उभा राहून तिच्या घराकडेच बघताना दिसे. सुरुवातीला असेल सहज म्हणून तिने दुर्लक्ष केले. मग आपल्या मुलीला बघतोय की काय अशी शंका येऊन मनोमन हसलीही ती. पण या दोन्ही शक्यता नसून तो आपल्यालाच निरखत असतो हे ध्यानात आल्यावर थोडे विचित्रच वाटले तिला. त्याच्या वर्गात किती सुंदर सुंदर मुली असतील, त्याला आकर्षण वाटायचे तर त्यांचे वाटेल. आपले कसे वाटणार? आपले त्याचे नाते कायम काकू पुतण्यासारखे म्हणजेच आई मुलासारखे राहिलेय. तो आपल्याबद्दल असा कसा विचार करणार? ती गोंधळूनच गेली.
या अडनिड्या वयात मंदार असे काय वेडेवाकडे विचार घेऊन बसला तिला समजेना. हा नाजूक तिढा कसा सोडवावा हाही पेच होता. आपण कधी कुठे चुकलोय का? ती खूप आठवून पहायची. तसे वावगे काहीच स्मरायचे नाही. सहा वर्षाच्या मंदारला ती आत्ता अकरा वर्षांनी भेटत होती. यापलीकडे काहीच घडले नव्हते.
हं, आपण मंदारला सोबत म्हणून झोपायला बोलवत असू त्यावेळी रात्री उशिरापर्यँत आपण अविनाशशी बोलत असू. कित्येकदा ते बोलणे शारीरिक पातळीवर यायचे.आपले त्याच्याशी लग्नच झाले असल्याने त्याच्या लाघट बोलण्याला तसा प्रतिसाद देताना आपल्याला काहीच गैर वाटत नसे. "तेच ते" बोलणे मंदारच्या मनात रुतले का? माय गॉड हा जागाच असायचा का त्यावेळी संभाषण ऐकत?
"माझ्याजवळ माझा पुरुष आहे ना, आता मला भीती नाही वाटत एकटीने झोपायची" असे कित्येकदा मंदारचे गोबरे गाल लाडाने कुरवाळत आपण अपरात्री अविनाशला फोनवर सांगत असू....
ती गपगारच झाली ते आठवून. आज मंदारच्या मनात कुठेतरी असे अनैसर्गिक आकर्षण निर्माण व्हायला आपण कारणीभूत आहोत का हा प्रश्न तिला भेडसावू लागला.
संध्याकाळी ती दाराला कुलूप लावून बागेत निघाली तेव्हा मंदारही फुटबॉलच्या प्रॅक्टीससाठी चालला होता.
"काकू सोडून देऊ?" त्याने विचारलेही.
"नको रे.." म्हणत ती पायीच निघाली. परत येऊन स्वयंपाकाची घाई नव्हती. मुलगी शाळेतर्फे ट्रिपला गेली होती. अविनाशही ऑफिस टूरवर होता.
ती घरी परतली तेव्हा चांगलाच अंधार झाला होता. हिवाळ्यामुळे अधिकच गडद वाटत होते. दिवेही गेलेले होते. बुधवार नाही का? लोडशेडिंग असणार. तासभर अंधारातच रहावे लागणार. कुठला ना कुठला खर्च येतो नि इन्व्हर्टर घ्यायचे राहूनच जाते.
ती कुलुपाशी खटपट करत होती. अंधारात किल्ली नीट फिरतही नव्हती. चाळीशी आली. डोळे तपासायला हवे. चष्मा लागला असेल ....तिच्या मनात विचार येत होते. तोच तिला मागे हालचाल जाणवली. ती दचकून वळणार तितक्यात तिच्या हातातली किल्ली घेत मंदार म्हणाला,"दे मी उघडून देतो...." खेळून आलेल्या मंदारच्या घामाचा वास आणि घोघरा आवाज तिला चरचरला. ती निमूट बाजूला सरकली.
त्याने दार उघडताच ती घाईघाईत घरात शिरली. तहान लागली होती. आतून पाण्याचा प्याला घेऊन येईपर्यंत मंदार गेला होता वाटतं. समोरच्या खोलीत निरव अंधार पसरला होता. असे कसे? तिने तर समोरचे दार उघडे ठेवले होते. रस्त्यावरच्या महानगरपालिकेच्या दिव्याची तिरीप पुढच्या खोलीत यायची. त्या प्रकाशात ती मेणबत्ती शोधणार होती. टॉर्च मुलीने नेला होता. इमर्जन्सी लॅम्प आतल्या खोलीत होता. तिथे अंधारात जायची तिला भीती वाटत होती.
समोरच्या शोकेसमध्ये ठेवलेली मेणबत्ती व आगपेटी काढायला ती डावीकडे वळली आणि पार थिजूनच गेली पुढे जाता जाता. अंगावर भयानक काटे आले. अंधारात दोन डोळे चमकत होते. काळोख पांघरून कुणी पुरुष उभा होता. तिच्या हातापायातले सगळे बळच नाहीसे झाले. तोंडातून शब्दही फुटेना.

