* सवय *
* सवय *


एखाद्या माणसाच्या असण्याची किती पटकन सवय होते नाही आपल्याला? म्हणजे, त्याचे गुण-दोष, काही एकत्र घालवलेले सुखद क्षण, काही अश्रू, एकत्र ढाळलेले. ह्या सगळ्याचा काही संबध नसतो आपल्या "सवय होण्या"शी. तरी "सवय" होतेच आपल्याला त्याची. त्याचं अस्तित्व बोलतं, तो नसताना आपल्याशी. तोच संवाद खूप जास्त matter करतो कुठल्याही नात्यात. त्याच्या बोलण्या-चालण्याचे पडसाद, तो माणूस तिथं नसला, तरी उमटत राहतात आपल्या आजूबाजूला. एखाद्या गुहेत जाऊन ओरडल्यावर आपलाच आवाज आपल्यालाच परत ऐकू येतो ना, तसंच त्याच्याबरोबरचे संवाद पुन्हा पुन्हा ऐकू येतात आपल्याला आतून..
खरंच गरज आहे का, इतक्या पटकन एखाद्याची सवय करुन घेण्याची? पटकन सोडता येऊच शकत नाही का आपल्याला एखाद्याचं अस्तित्व?
जाणवतोय तो आहे आपल्या आजूबाजूला, तरी त्याच्याकडे पाठ फिरवणं, जमेल का मला ?
आणि कोणी सवयीची झालेली व्यक्ती अचानक मला सोडून गेली तर?
तिची सवय मला सोडताच आली नाही तर? सवय मोडण्याच्या दुःखाचीही सवय व्हायला हवी आता! मी स्वतःला बजावलं.
मग माझ्या लक्षात आलं. माझ्या असण्याचीही किती सवय झाल्ये ना मला!
खरंच, एखाद्या माणसाच्या असण्याची किती पटकन सवय होते नाही आपल्याला!