धर्माला ग्लानि
धर्माला ग्लानि
(मणिपूर मधील घटनेवर आधारित)
अजून किती ग्लानि यायची आहे धर्माला ?
आमच्याच अंतःकरणात वसलेले सुदर्शनधारी भगवान श्रीकृष्ण, हनुमंत, तांडव करणारे भगवान शंकर हे सगळे कधी जागे होणार आहेत का ? जागे झाले तरी कधी कार्य करणार आहेत का ? की आम्ही फक्त म्हणत राहणार, "राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या!!"
"कशाला या ?" - म्हणजे आमचं सगळं तुम्ही बरं करून द्या !
"आणि तुम्ही काय करणार?" - काही नाही, तुमची सेवा !
"म्हणजे काय?" - शिवजयंतीला तुम्हाला फुलं वाहणे, आचकट विचकट आवाज काढत रात्रीअपरात्री मोकळ्या रस्त्यावरून तुमच्या कृष्णा घोडीला लाजवेल अशा गतीने bike वरून भरधाव जाणे, तुमचं नाव घेण्याआधी माणसं 'छत्रपती' म्हणत नसतील तर त्यांची नाचक्की करणे, तुमच्या इतिहासाबद्दल जातीपातीचं राजकारण करणे, तुमचे मावळेही ज्या गडांवर अगदी आवश्यक नसलं तर गेले नाहीत अशा जीवघेण्या लिंगाण्यावर अनवाणी जाऊन भलतंच शौर्य दाखवणे, आणि सरकार मध्ये कोणी काही बोललं न तुमच्याबद्दल, मग तर काय विचारूच नका... !
"हो पण रयतेत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं अधर्माचं काय ?" - त्यासाठीच तर तुम्ही या, ते बघवत नाही हो आम्हाला !
म्हणजे ५० वर्षे ज्या देहाची अक्षरशः चाळणी होईपर्यंत कष्टविला, कंबरेच्या काट्याचा चुराडा होईपर्यंत घोडस्वारी करून स्वराज्याची लगबग केली, अगणित तलवारी अंगावर झेलल्या, अगणित रात्री उपाशीपोटी काढल्या, अगणित वेळा समोर मरण पाहिलं, अगणित बांधव-सखे या स्वराज्य यज्ञात गमावले तरी ३५० वर्षांनी पुन्हा त्याच देहाला आम्हाला पृथ्वीवर आणून कष्टवायचं आहे !
किती कौतुक करावं नाही का आपल्या शिवभक्तीचं जेव्हा आपण अगदी अभिमानाने लिहितो आपल्या कारच्या मागे, "राजे, पुन्हा जन्माला या!" ?
' परित्राणाय साधूनाम् ' आणि ' विनाशाय दुष्कृताम् ' आमच्या अंतःकरणात वसलेल्या शिवाजी महाराजांना आम्ही कधी जन्म घेऊ देणार आहोत की नाही ? कधी अवतरणार नरसिंह आमच्या देहरूपी खांबामधून आणि फाडणार समाजातल्या हिरण्यकश्यपूंची पोटं....?
अहो! तो अवतरतच आहे, सतत पोटातली आग कृतीत उतरवण्यासाठी, समाजकंटकांना नामोहरम करून धर्माचं, नितीचं राज्य
प्रस्थापित करण्यासाठी आमच्यातल्या 'प्रेरणा'रूपाने तोच अवतरतच आहे! तो ओळखता आम्हाला येत नाही याला काय म्हणावं ! ओळखला तरी त्याला अडवतोय आम्ही कारण आम्हाला ते पाहायचं नाहीये ! कारण - आमच्याच मेंदूचं जाड्य ! काही काळ गेल्यावर सगळं विसरून माफ करून पुन्हा गुण्या-गोविंदाने नांदायची आमची सद्गुणविकृती !
"आपण इथे बसून काय करणार?" या नावाखाली ढिम्म काहीही न करणे आणि मग स्वतः, "तिथलं सरकार, राजकारण, आणि मग मे महिन्यात ही घटना घडूनही आत्ता संसदेच्या अधिवेशनाच्या वेळी ही का प्रसृत होत्ये/" असल्या निस्तेज, निरर्थक आणि क्लिब विषयांमध्ये गप्पा मारून तर्क काढत बसून ते समाजात मांडून, आपण अगदी आपल्या तार्किकपणाची (आणि निर्लज्जतेची) कशी परिसीमा गाठली आहे याचा मोठा पुरुषार्थ सगळ्यांसमोर मांडत फिरणे ! संपला आमचा ऋणानुबंध त्या विषयाप्रतीचा !
आजही समाजात शत्रू तेच आहेत, मात्र सत्वाचा माज नाही, जो शिवशाहीत होता, रामराज्यात होता !
राक्षसी प्रवृत्ती तशीच आहे पण आमच्या घरी रामकृष्णादि अवतारांची फक्त पूजा शिकवली जाते, त्यांचं ओज, शौर्य, वीर्य ह्याचं काय? त्यांच्यातल्या ज्ञानात्मक सद्गुणांसोबत त्यांच्या हातातली शस्त्र घ्यायला आम्ही शिकणार आहोत की नाही ?
आज पूजा ही फक्त आणि फक्त "उत्कट बळ ते तुंबळ खळबळली सेना" याचीच व्हायला हवी. केवळ सामर्थ्याची पूजाच आम्हाला यातून बाहेर काढू शकेल. मणिपूर मधल्या घटनेनंतर आपल्यातलं रक्त उसळून जर ते कृतीत उतरलं, तर तेवढीच श्रद्धांजली शिवाजी महाराजांना पुरेशी आहे!
त्यासाठी आवडो न आवडो - प्रत्येक मुलीला लहानपणापासून combat training दिलं जाणं आणि प्रत्येक मुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराकोटीच्या चारित्र्यसंपन्नतेचे धडे ठसवणं ही आजच्या काळाची मूलभूत गरज आहे, असं वाटतं. स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेलं काहीतरी 'मूलभूत' , 'विरोचित' कार्य करूया. आजच्या तरुणांमध्ये, त्यांना घेऊन, त्यांच्या मनाच्या मशागतीसाठी काम करूया !
भारतीयांनो, उठा ! जागे व्हा ! आई भवानीच्या तलवारीची कूस जशी आपल्या राजाने धन्य केली, तिनेच आपल्यालाही जन्म दिला आहे.. राजांचा आदर्श घेऊन कामाला लागूया !
- तोषा..