हल्ली तो तिथे एकटाच असतो.
हल्ली तो तिथे एकटाच असतो.


'हल्ली तो तिथे एकटाच असतो... गरज नाही राहिली फार कोणाला त्याची...' दूर काळ्या आकाशाकडे बघत माझ्या डोक्यात विचार चालू होते...
'जसजसे मोठे होत जातो नं आपण, तसतसे आपल्यावर असे काही प्रसंग येतात की, आई-बाप आपलीच लहान मुलं होतात आणि आपण त्यांचे आई बाप होतो... मग आपल्याला त्यावेळी आई बापाची position fill up करू शकेल अशा कोणाचीतरी नितांत गरज असते..
पूर्वी म्हणूनच कदाचित खूप गर्दी व्हायची त्याच्यापाशी..
असंच काहीतरी घडलं म्हणून आज संध्याकाळी खूप अस्वस्थ होतो.. आजूबाजूला बघताना मला त्याचा कळस दिसला.. तेव्हा हे जाणवलं.. हा माझा बाप आहे... पण हल्ली याच्यापाशी गर्दी नसते... लगेच गेलो त्याच्यापाशी.. पाया पडलो, शांत झालो...
आताही त्याच शांततेत गॅलरी मध्ये त्याचा कळस निरखत उभा आहे...
स्वयंपाकघरातून ही आली. नुकतीच घासलेली ओली भांडी कोरडी करायला गॅलरी मध्ये ठेवून गेली सुद्धा..
बायकांचं एक बरं असतं ना... त्या स्वतः कामातच इतक्या व्यग्र असतात की, डोक्याला त्रास देणारे विचार डोक्यात घोळत ठेवायला वाव कमी असतो त्यांना...
तिला कळलंही नाही, मी काहीतरी विचारात गढून जाऊन समोर बघत नुसताच उभा आहे गॅलरी मध्ये ते... तिनं आपली भांडी ठेवली, निघून गेली..!'
आत जायला मागे वळलो तेव्हा दिसलं.. त्या भांड्यांवर एक कोरडं फडकं ठेवलं होतं तिनं.. तिचा संदेश माझ्या लक्षात आला. भांडी पुसायला घेतली.. मग विचार गेले, कुठच्या कुठे पळून..
तेव्हा माझ्या लक्षात आलं...
तिच्या या नुसतंच भांडी ठेवून न बोलता स्वयंपाकघरात जाण्यालाही खूप अर्थ होता....!