अक्षता कुरडे

Abstract

3  

अक्षता कुरडे

Abstract

स्वप्नांच्या दुनियेत...

स्वप्नांच्या दुनियेत...

3 mins
281


वास्तवात असूनही कायम स्वप्नांच्या दुनियेत हरवलेली प्रिती, स्वभावाने देखील खुप प्रेमळ आणि गोड होती. बुजऱ्या स्वभावाने मित्रपरिवार छोटा होता पण घनिष्ठ होता. वाचन करणं हा तिचा छंद होता. ती नेहमी तिच्या स्वप्नांच्या पलीकडच्या जगात खूष राहत. नेहमीप्रमाणेच ती प्लॅटफॉर्म वरच्या बाकावर बसून पुस्तक वाचत होती. आज डबेवाले सोडून तिथे कोणीच दिसत नव्हतं. काही वेळाने ते सुद्धा निघून गेले. प्रिती आता एकटीच त्या प्लॅटफॉर्म वर बसून पुस्तक वाचत होती. तितक्यात ट्रेन च्या आवाजाने तीच लक्ष वेधून घेतल. एक सुंदर रंगीबेरंगी ट्रेन तिथे येऊन थांबली. ती ट्रेन इतकी सुंदर होती की ती तिथून उठून उभी राहिली आणि एकटक त्या ट्रेन कडे पाहत राहिली. 


तितक्यात आपोआप त्या ट्रेन च दार उघडलं गेलं. दरवाज्यात एक उंच, धडधाकट माणूस उभा होता. त्याच्या पूर्ण पेहराव सफेद रंगाचा होता. सफेद ब्लेझर, सफेद बुट. डोक्यावरच्या टोपी मुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. प्रिती त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याने हात पुढे केला. तशी ती दोन पावलं मागे झाली. तिच्या मनातली भिती त्याने ओळखली. तो हळूहळू त्याच्या डोक्यावरची टोपी काढू लागला. तिच्या हृदयाची धडधड वाढली. टोपी काढताच तिला धक्का बसला. तो प्रणय होता. 


तिच्या डोळ्यापुढे झरझर मागचे प्रसंग येऊ लागले.


आयुष्याच्या वाटेवर चालताना तिला तिचा जोडीदार देखील मिळाला होता. त्याच नाव प्रणय. प्रणय अगदी तिच्या स्वभावाच्या विरुद्ध. जबाबदार आणि वर्तमानात जगणारा. आताचा क्षण मनमुराद जगून घ्यायचा. नंतर ला फार अंतर असतं. सतत तिला समजवायचा. पण अवखळ पाण्याप्रमाणे प्रिती, त्याच काही ऐकत नसे. तिच्या प्रवाहा बरोबर त्याला देखील तिच्या स्वप्नांच्या पलीकडले घेऊन जायची. त्या क्षणाला गंभीर स्वभावाचा प्रणय देखील तिच्या वेडेपणावर खळखळून हसायचा.


दिवसेंदिवस दोघांचं नातं घट्ट होत चाललं होतं. दोघांच्या कामाचं ठिकाण दादर ला च असल्याने, संध्याकाळी कधी कधी एकमेकांची सोबत व्हायची. दादर च्या प्लॅटफॉर्म क्रमांक. ४ वर मालवाहू आणि गावी जाणाऱ्या रेल्वे यायच्या. त्यामुळे तिथे जास्त वर्दळ नसायची. सकाळी कधी लवकर निघाले तर दोघे तिथल्या बाकावर बसून पुस्तक वाचत बसायचे किंवा गाणी ऐकायचे. त्या सकाळी प्रणयला उशीर झाल्याने त्याने तिला नेहमीच्या प्लॅटफॉर्म वर थांबायला सांगितले. प्रिती नेहमप्रमाणेच पुस्तक वाचत बसली होती. ती वाचण्यात इतकी मग्न झाली की, तिच्या कामाची वेळ झालीय हे देखील कळलं नाही. जेव्हा तिने घड्याळ पाहिल तेव्हा खुप उशीर झाला होता. आज लेटमार्क नक्की लागणार म्हणून ती पटकन तिथून निघाली. जाताना तिने प्रणयला ती पुढे जात असल्याचा मेसेज केला. दिवसभर कामाच्या व्यापात असल्याने फोनकडे पाहण्याचा वेळ सुद्धा नाही मिळाला. संध्याकाळी निघताना तिने प्रणय ला आठवणीने फोन केला पण फोन बंद येत होता. 


घरी आल्यावर ती फ्रेश झाली आणि पुन्हा त्याला तीन चार वेळा कॉल केला. शेवटी फोन उचलला गेला. त्याच्या फोनवर कोणीतरी वेगळी व्यक्ती होती. प्रणय बद्दल विचारताच त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकुन तिच्या पायाखालची जमीन सरकली.


सकाळी घाई गडबडीत निघालेला प्रणय माणसांनी गच्च भरलेल्या लोकल मध्ये चढला. डब्यात गर्दी इतकी झाली होती की पाठून धक्के येत होते. घामाने भिजलेला हात एका क्षणी पकडलेल्या दांड्यावरून निसटला. आणि तो लोकल खाली आला. प्रीतीला पुढचं काहीच ऐकू येत नव्हतं. तिच्या डोळ्या समोर सारखा प्रणय चा चेहरा समोर येत होता. तो काळ तिच्या साठी खुप वाईट ठरला होता. अचानक आलेल्या भयंकर वादळाला सामना करत करत ती त्या प्रसंगातून थोडीशी सावरली होती. त्याच्या सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांना मनात जपून ती जगत होती.


भूतकाळातील त्या वाईट दिवसांच्या आठवणीत हरवलेली प्रिती, त्याच्या आवाजाने भानावर आली. हे स्वप्न आहे की सत्य काही कळेना. त्याने त्याचा हात पुन्हा पुढे करून तिला त्याच्या सोबत स्वप्नांच्या पलीकडच्या जगात येण्यासाठी विचारताच तिने लगेच होकार कळवून आपला हात त्याच्या हातात दिला. आणि कधीच न संपणारा हा सुंदर प्रवास काल्पनिक दुनियेच्या दिशेने जायला निघाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract