चेकमेट
चेकमेट
बुद्धिबळ.. आवडता खेळ दोघांचा. दोघंही खेळात निपुण होते. समोर कितीही मोठा प्लेअर का असेना नेहमी समोरच्याला बाद करायचे आणि जिंकायचे. ह्या खेळात कोणीही त्यांचा हात पकडू शकत नव्हते. दोघांना जिंकण्याची जणू काही व्यसन लागले होते.
एक दिवस असा आला की राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दोघांना बोलावणे आले. दोघांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. एका नंतर एक असे कित्येक स्पर्धक बाद करत दोघे अंतीम टप्प्यात पोहचले. तिथे दोघांना एकमेकांच्या विरूद्ध खेळावे लागले. दोघांना जिंकण्याचे वेध. स्पर्धा रोचक होऊ लागली. शेवटी खेळ तो. कोणीतरी हरल्याशिवाय दुसरे जिंकणार कसे. तिथेही हे
च झाले. ती जिंकली व तो हरला. नेहमी जिंकणारा आज तो खेळात हरला होता. ही गोष्ट काही त्याला सहन होईना. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. गोष्ट फार शुल्लक पण तो तिच्यापासून वेगळा झाला. इतक्या शुल्लक कारणावरून इतके मोठे रामायण होईल तिलाही वाटले नव्हते. तिने विनवण्या केल्या पण तो बधला नाही. मग तिनेही आपला स्वाभिमान जपत ज्या खेळामुळे इतके सारे घडले त्यालाच सोबत घेऊन वेगवेगळ्या उच्चस्तरीय स्पर्धेत सहभागी होत गेली.
दोघेही आज वेगळे होते पण खऱ्या आयुष्याच्या खेळात तो हरला होता. अन् ती मात्र जिंकत गेली. आणि आलेल्या अडचणींना सामोरं जात त्यांनाही चेकमेट करत गेली.