कोकणाकडची वाट
कोकणाकडची वाट
मला आयुष्यात सगळ काही मिळालं आजपर्यंत न मागता. फक्त एकच गोष्ट आहे जी मला मिळाली नाही ती म्हणजे निसर्गसौंदर्याने व्यापलेली गावाकडची वाट. गाव म्हटलं की, हिरवळ, शेती, ढग- धुके, तिथलं मंत्रमुग्ध करणार वातावरण, तिथली गोड माणसं, सार काही चटकन नजरेत येत. माझ्या आजोळी शहरी विकास झाल्याने तिथे काही हा अनुभव मला आजवर मिळाला नाही. त्यामुळे माझ मन नेहमी ह्या गोष्टीवरून खट्टू व्हायचं. बाप्पाला कदाचित माझ्या मनाची घालमेल कळली असावी. म्हणून माझ्या मैत्रिणीला तिच्या गावी घेऊन जाण्याची बुद्धी दिली असेल..
तिच्या गावी लग्न असल्याने सगळे गावी जाणार होते. आधी मला अस कोणाच्या गावी कसं जाणार कसं राहणार हा प्रश्न येत होता पण मी हो नाही करता तयार झाले. तिच्या गावाची व्याख्या सांगायची गरज नाही. नावावरून ते दुसरं स्वर्ग म्हणजे आपलं कोकण. मगाशी जे गावाबद्दल वर्णन केल त्यापेक्षा ही सुंदर अश्या ह्या कोकणात मी आले. आले आणि तिकडचीच होऊन गेले.
शेणाने सारवलेल भल मोठ अंगण, त्यात पळत असलेल्या कोंबड्या आणि त्यांची पिल्ली, आंब्या पासून बनवलेले वेगवेगळे प्रकार, घराच्या मागे गोठा, सुंदर कौलारू घरं, आणि आंब्याची, फणसाची झाडे तर
कितीतरी होती! प्रत्येक घराच्या थोड्या अंतरावर दुसरी घरे होती. तिथली माणसं तर मी जणू ह्याच गावची असल्यासारखं माझ्याशी खुप आपलेपणाने बोलत होते. त्यादिवशी तिच्या आज्जीने मस्त जेवण तयार केलं होत त्यासोबत कोंबडीवडे यांचा बेत केला. दोन एक दिवसांनी आम्ही तिथे रेडी च्या गणपती बाप्पा च दर्शन घेतलं. तिथला अथांग समुद्र किनारा आजही माझ्या लक्षात आहे. आमच्या व्यतिरिक्त इतर कोणीच नव्हत तिथे हे पाहून तर मला आपली जुहू चौपाटी आठवली जिथे जेव्हा बघावं तेव्हा गर्दी! समुद्राच्या पाण्यात खेळत खुप मस्ती केली. लग्न, जत्रा, रात्रीच्या भुताच्या गोष्टींवर गप्पा, दुपार भर फिरणं, आंबे फणस खात राहणं अश्यात आठ दिवस वाऱ्या सारखे निघून गेले. अशी होती माझी पहिली कोकणाकडची सुंदर वाट.. काकूंना हट्ट करून अजुन चार दिवस थांबायला तयार केलं. तिथल्या सगळ्यांत इतकी समरस होऊन गेले की पुन्हा मुंबईत जायचं मन तयार नव्हतं.
शेवटी चार दिवसांनी सगळ्यांचा निरोप घेत निघालो पुन्हा मुंबईत.
तिथून जाताना गावच्या देवीचे पाया पडताना, पुढचा जन्म माझा कोकणाच्या मातीत च होऊ दे म्हणत, जाताना मी सार काही माझ्या डोळ्यांत साठवून घेत होते.