Deepali Thete-Rao

Abstract Inspirational

4.2  

Deepali Thete-Rao

Abstract Inspirational

स्त्री_शक्ति

स्त्री_शक्ति

2 mins
338


रमा कळा देऊन बेजार झाली होती.. अखेर सुटका झाली तिची. एका गोंडस मुलीला जन्म दिला होता तिने. नर्सने काही वेळानंतर बाळ तिच्या हातात दिलं. बाळाचा तो मखमली स्पर्श.. तो कोवळा गंध...... अन् किसनने आत प्रवेश केला. रागाने धुसफुसत होता तो. "मला पहिला मुलगाच पाहिजे होता. मग या मुलीला जन्मच कसा दिलास तू? मला तर हिचं तोंडही पहायचं नाही"त्यानंतर तो दवाखान्यात ही फिरकला नाही. दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती लेकीला घेऊन घरी आली. किसन तिला जवळ घ्यायच सोडा तिच्याकडे पहातही नव्हता. रमा दुसर्या मुलाबद्दल तिच्या निर्णयावर ठाम होती.. हिला शिकवायच, ही थोडी मोठी झाल्यावर, शाळेत जायला लागल्यावरच पुढला पाळणा. 

हळूहळू छोटी अंबिका मोठी होत होती. बापाच्या प्रेमाला मात्र पारखी होती. "अहो, माझं ऐका... अंबिकाला आता शाळेत घालायला हवं. तिला शिकवू, मोठं करू""मला फक्त मुलगा हवाय. हिच्यासाठी काही करणार नाही मी... " म्हणत किसन घराबाहेर पडला. त्याला देवीचं मंदिर सजवायचं काम मिळालं होतं. नवरात्र सुरू झालं. दररोज मंदिराच्या बाजूने फुलांची आरास करायची...काम पैसे मिळवून देणारं पण देवीची सेवा केल्याचं पुण्यही लाभणार होतं. मंदिर सकाळपासूनच लोकांनी गच्च भरून गेलेलं. माणसच माणसं. हार-फुलं, प्रसाद घेऊन देवीच्या दर्शनासाठी आलेली. कोणी केलेला नवस फेडत होती...

अचानक काय झालं कळलं नाही. आरडाओरडा, पळापळ.. चेंगराचेंगरी.. आवाज आवाज...... धक्क्याने खाली पडलेला तो गर्दीच्या पायाखाली तुडवला जाणार.."आता काही खरं नाही..मरणार मी.संपलं सगळं" तो जीवाच्या आकांताने किंचाळला. इतक्यात एक हात आधारासाठी पुढे झाला. झटकन त्याला बाजूला काढत 'वर्दीतली' ती गर्दी सावरायला वेगाने सरसावली... तो पहातच राहिला... 

...................... 

मी शिकवणार लेकीला. खूप मोठ्ठं करणार. चुकलो.. पण आता नाही.... तिच्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच त्याने 'काही' खरेदी केलं होतं.. घरी गेल्या गेल्या अंबिकाला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले त्यानं. त्या स्पर्शातून प्रेम, माया ओथंबून वहात होती. रमा नवऱ्याचं हे रूप अचंबित होऊन पहात असतानाच त्यानं लेकीच्या हातात तिच्यासाठी आणलेली भेट दिली. भराभरा त्यावरचं वेष्टन काढत तिनं ते पाहिलं अन् आनंदाने नाचू लागली...  राखाडी रंगाच्या पाटीवर सरस्वती काढून तिला भेट देताना... बापाने तिच्या शिक्षणाचा श्री गणेशा केला होता... तो राखाडी रंग..तिच्या बाबाने दिलेला....अंबिकाच्या मनात कायमचं घर करून गेला... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract